सनातन संस्था धर्मशास्त्र सांगून समाजाचे प्रबोधन करते ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील ‘माझा हस्तक्षेप’ या कार्यक्रमातील चर्चासत्र

पुणे महानगरपालिका १५ वर्षांपासून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती करते. २ दिवसांनी या मूर्ती आणि हौदातील पाणी नदीमध्ये सोडते, असा एक रिपोर्ट ‘पुणे मिरर’ या दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. प्रशासन अशा प्रकारे भक्तांची दिशाभूल करत आहे. तसेच या मूर्ती ट्रॅक्टरमध्ये भरतांना त्यावर उभे रहाणे, तोडणे अशा प्रकारच्या कृती प्रशासनाकडून करून त्या मूर्ती खाणीमध्ये कशाही प्रकारे फेकल्या जातात. प्रशासनाला भक्तांच्या भावनांचा कोणताही विचार नाही, हे त्यांच्या कृतीतून लक्षात येते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील ‘माझा हस्तक्षेप’ या कार्यक्रमात मध्यंतरी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक दा.कृ. सोमण, सामाजिक समरसताचे महाराष्ट्र निमंत्रक रमेश पांडव, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत हेही चर्चासत्रासाठी उपस्थित होते. ‘एबीपी’च्या नम्रता वागळे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

भक्तांच्या भावनांचा विचार नसल्यानेच प्रशासनाकडून वारंवार
गणेशभक्तांची दिशाभूल केली जाते ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. घनवट पुढे म्हणाले…

श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.

१. प्रदूषणाची आवई उठवून इकोफ्रेन्डली मूर्ती बनवा, असे सल्ले दिले जातात. तसेच ‘अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करा’, असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात वर्षभर नदीच्या पाण्यामध्ये सांडपाण्याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते; परंतु त्याविषयी कोणी काहीच कृती करत नाही आणि श्री गणेशमूर्तीपासून प्रदूषण होत नसूनही प्रदूषण होते, असे सांगितले जाते.

२. अंनिसने ‘कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवा’, असे सांगून प्रशासनाला हाती धरून हा उपक्रम राबवला आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय हरित लवादाच्या अहवालानुसार कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे सर्वाधिक प्रदूषण होते. त्यामुळे चुकीची माहिती सांगून समाजाची केलेली दिशाभूल, तसेच पर्यावरणाची झालेली हानी ते कसे भरून काढणार आहेत, याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे.

सनातन संस्था धर्मशास्त्र सांगून समाजाचे प्रबोधन करते ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

सौ. नयना भगत

सनातन संस्था आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, तसेच श्री गणेशाचे पूजन आणि विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, याविषयी प्रबोधन करते. श्री गणेशाची मूर्ती शाडू मातीची असावी, प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी, असे आमचे मत आहे. विधीवत् पूजा केलेल्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, असे शास्त्र आम्ही सर्वांना सांगतो.

सनातन संस्थेच्या मोहिमेचा उद्देश समजून न घेता सनातनची
अपकीर्ती करण्याच्या हेतूने नम्रता वागळे यांनी बोलतांना केलेला हेकेखोरपणा !

१. श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात न करता वहात्या पाण्यातच करा, असा हेकेखोरपणा सनातन संस्थेने याही वर्षी थांबवला नाही. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाला सनातन संस्थेचा विरोध का ? यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे.

२. सामाजिक संस्था, प्रशासन असे अनेकजण हौदात विसर्जन करण्यास सांगतात आणि सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन धर्माचा ठेका मिळाल्याप्रमाणे हौदात मूर्तींचे विसर्जन करू नका, असे सांगितले आहे.

३. धर्म काळानुरूप पालटला नाही, तर धर्म ही मनुष्याच्या पायातील बेडी होईल. धर्म मनुष्याने मनुष्यासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे यामध्ये कालानुरूप पालट व्हायला हवेत. अन्यथा गणेशोत्सव हा आपल्यासाठी आनंदाचा सोहळा रहाणार नाही.

‘सांडपाणी असलेल्या नदीमध्ये मूर्तीचे विसर्जन करायचे का ? हा एकच प्रश्‍न नम्रता वागळे पुनःपुन्हा विचारत होत्या. प्रत्यक्षात नदी कशामुळे प्रदूषित झालेली आहे, हे सौ. नयना भगत सांगत होत्या; मात्र वागळे ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हत्या.

धर्मशास्त्राची माहिती नसतांनाही त्यावर बोलणारे पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक दा.कृ. सोमण !

(म्हणे) ‘वहात्या पाण्यात विसर्जन करायला सांगणारे धर्मग्रंथ कालबाह्य झाले !’

१. धर्मशास्त्रानुसार किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये वहात्या पाण्यात गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करा, असे सांगितलेले नाही. एखाद्या ग्रंथामध्ये वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करा, असे पूर्वी सांगितलेले असले, तरी त्या काळी मूर्तींची संख्या अल्प होती.

२. आज नद्या अस्वच्छ झालेल्या आहेत. त्यामुळे तेथे मूर्तींचे विसर्जन करायला नको. वहाते पाणी सर्वत्र नसते. आपण गणेशाचे विसर्जन करत नसून मूर्तीतील देवत्व काढून विसर्जन करतो. कृत्रिम तलावामध्येच मूर्तींचे विसर्जन करायला हवे.

३. सण हे निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाहीत. पर्यावरणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुढील पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

४. मूर्तीची विटंबना होता कामा नये. समुद्रामध्ये मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी सर्व भग्न अवस्थेतील मूर्ती किनार्‍यावर आलेल्या असतात. प्रदूषण करून सण साजरे करायला नकोत. मूर्तींचा विनियोग नीट व्हायला हवा.

५. नदीचे पाणी स्वच्छ असले, तरी त्या पाण्यामध्ये विसर्जन करू नये; कारण ज्या धर्मग्रंथांमध्ये हे लिहिलेले आहे, ते ग्रंथ आता कालबाह्य झालेले आहेत.

६. मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होऊन नदीतील जलचर प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

धर्म टिकण्यासाठी विज्ञानाची नव्हे, तर धर्मानुसार आचरण
करण्याची आवश्यकता आहे, हेही ठाऊक नसणारे रमेश पांडव !

(म्हणे) ‘आग्रह विज्ञानानुकूल ठेवल्यासच धर्म टिकेल !’ – रमेश पांडव, सामाजिक समरसताचे महाराष्ट्र निमंत्रक

१. अनेक गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन कोठे करणार ? वहाते पाणी संकल्पना पहायला मिळत नाही.

२. युरोपात नदीमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही, तेथे त्यांनी वहात्या पाण्यात विसर्जन कसे करायचे ?

३. धर्मशास्त्रीय व्यक्तींनी सामान्य व्यक्तींना धर्माची वाट करून दिली पाहिजे. सणांची अशा प्रकारे वाट लावायला नको. आपले आग्रह कालानुरूप, समयानुरूप, विज्ञानानुकूल ठेवायला हवेत. तसे केल्यासच आपला धर्म टिकेल.

मूर्तींची नंतर केली जाणारी विटंबना हे श्री. सुनील घनवट यांचे सूत्र योग्य आहे. यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात