हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ बनून त्यांच्या क्षात्रतेजाला ब्राह्मतेजाची जोड देण्यास प्रवृत्त करणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि सनातनचे १४ वे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा परिचय

कान-नाक-घसा तज्ञ असलेले सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी वर्ष १९९६ मध्ये सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनेला प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनी अध्यात्मप्रसाराची सेवा केली. मिरज येथील सनातनच्या आश्रमात राहून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सांगली आवृत्तीच्या अंतर्गत येणार्‍या सेवांचे दायित्व त्यांनी कुशलपणे सांभाळले. सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भातील, तसेच साधक रुग्णांवर उपचार करण्याची सेवा आदी मनोभावे करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. वर्ष २०१२ मध्ये संतपद गाठून त्यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही जलदगतीने प्रगती होऊ शकते, हे सिद्ध करून दाखवले. वर्ष २०१२ पासून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. प्रत्येक गोष्टीवर चिंतन करणे, सेवा परिपूर्ण आणि ईश्‍वरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला हवे, यासंदर्भात साधकांना मार्गदर्शन करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे, हिंदुत्वाचे कार्य करतांना तत्त्वनिष्ठ राहून इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. बरेच संत एकाच योगमार्गाने वाटचाल करतात; मात्र सद्गुरु (डॉ.) पिंगळे ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करणारे आहेत !

हरियाणा राज्यातील धर्माभिमानी आणि प्रतिष्ठित मान्यवर यांच्याशी राष्ट्र अन् धर्म यांविषयी संवाद साधतांना १. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे ! (वर्ष २०१८)

उत्तर भारतातील प्रतिकूल भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीत ते साधना सांगणे, मार्गदर्शन करणे आणि हिंदु धर्माविषयी जागृती करणे आदी सेवा करत आहेत.

ज्ञानमार्गी असणार्‍या सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या साधनेची वैशिष्ट्ये !

  • अंतर्मुखता, अत्यंत नम्र स्वभाव, साधनेसाठी प्रामाणिक आणि कठोर प्रयत्न, स्वच्छ अन् उच्च दृष्टीकोन, साधकांना स्वतःहून साहाय्य करणे हे त्यांचे विशेष गुण आहेत.
  • ज्ञानमार्गी असल्यामुळे त्यांनी केलेले मार्गदर्शन नावीन्यपूर्ण असते. त्यात निरनिराळ्या दाखल्यांचा समावेश असतो. अध्यात्मातील कठीण सूत्रे सोप्या भाषेत मांडलेली असतात. एखाद्या विषयाचा सर्वदृष्ट्या अभ्यास ते सहजतेने मांडतात.
  • गंभीर शारीरिक व्याधींनाही त्यांनी श्रद्धेच्या बळावर तोंड दिले.
  • ते आवश्यकतेनुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अशा कोणत्याही स्तरावर भाषण करतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त भाषणांमुळे हिंदुत्वनिष्ठ समितीच्या कार्याशी जोडले जात आहेत.
  • स्वतःच्या साधनेतील उच्च दृष्टीकोनांच्या आधारे समवेतच्या साधकांनाही अध्यात्मात ते परिपक्व करत आहेत.

ज्ञानाच्या पातळीवरील क्षात्रधर्म करणारे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

१. आस्तिक-नास्तिक, बुद्धीप्रामाण्यवादी अशा सर्वांमध्ये राष्ट्र आणि धर्म जागृतीची चेतना जागृत करणे !

व्याख्याने, पत्रकार परिषदा येथे कुणीतरी बुद्धीप्रामाण्यवादी, डाव्या विचारसरणीचे पत्रकार विरोधासाठी विरोध करण्याचा, तसेच खोचक प्रश्‍न विचारून वक्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी क्षात्रवृत्तीने आणि अत्यंत समर्पक उत्तर देऊन समोरच्याला शांत करणे, हे सद्गुरु पिंगळेकाकांचे वैशिष्ट्य आहे. वर्ष २०१३ मध्ये प्रयागराज कुंभपर्वाच्या कालावधीत ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी लावलेल्या प्रदर्शनाला दीड लक्षाहून अधिकांनी भेट दिली. तेथील साधक सर्वांचे शंकानिरसन करू शकत नव्हते; पण सद्गुरु पिंगळेकाका त्यांच्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांविषयी चेतना जागृत करायचे. समोरचे लगेच ऐकण्याच्या स्थितीत यायचे. नंतर ‘काका जे सांगतात, ते योग्य असून आपले चुकीचे आहे’, असा साक्षात्कार झाल्याप्रमाणे ऐकत बसायचे. काही जण त्यांना चरणस्पर्श करायचे.

२. पत्रकाराला सडेतोड उत्तर देऊन केलेले शंकानिरसन !

याच काळात एक पत्रकार म्हणाला, ‘‘हिंदु धर्मात ३३ कोटी देव आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत, तर त्यांची पूजा का करायची ? देव दिसत नसतांना त्याला सत्य का मानावे ?’’ हे पत्रकार सद्गुरु काकांना भेटल्यावर त्यांचे पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

सद्गुरु काका : तुम्हाला भूक लागते ना ? मनात विचार येतात ना ? मग ते दाखवा. प्रोटोन, न्यूट्रॉन यांचे बॉम्ब असतात. ते घटक प्रत्यक्ष का दाखवत नाही ? मग देव नाहीच, हे ठामपणे कोणत्या आधारे म्हणता ? तो अनुभवण्यासाठी साधना करा. जसे विज्ञान प्रायोगिक शास्त्र आहे, तसे अध्यात्म हेही कृतीचे शास्त्र आहे.’’ त्यानंतर पत्रकार म्हणाला, ‘‘माझे प्रश्‍न संपले. मला नवीन दृष्टी मिळाली.’’

त्यानंतर ४ दिवसांनी त्याने सहकाऱ्यालाही प्रदर्शन दाखवले. नंतर सद्गुरु काकांना भेटून म्हणाला, ‘‘मला आता येथे वारंवार यावेसे वाटते. येथील प्रत्येक गोष्ट मला नीट अभ्यासावीशी वाटते. तुमच्यामुळे (सनातनमुळे) मी अध्यात्माकडे सकारात्मकतेने पाहू शकलो.’’

३. जातीयवादातून प्रश्‍न विचारणार्‍या संपादकांना त्यांच्या चुकीच्या कृत्याची जाणीव करून देणे

एकदा एक संपादक सनातनचे कार्य जातीयवादी असल्याचा पूर्वग्रह ठेवून प्रश्‍न विचारत होते. सद्गुरु काका म्हणाले, ‘‘तुमचा उद्देश चांगला असेल, तरी प्रश्‍न चुकीचा आहे. तो सरळ करून विचारा. वाईट असल्यास मी उत्तर देणार नाही. तुम्ही दुसरा प्रश्‍न विचारा.’’ संपादकांनी उद्देश सांगून क्षमा मागितली. – श्री. नित्यानंद भिसे, मुंबई

पितृतुल्य सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

  • साधकांना त्रासावर उपाय सांगणे आणि त्यांना प्रेमाने साहाय्य करणे, यांमुळे सद्गुरु काका साधकांना पितृतुल्य वाटतात.
  • अखिल भारतीय हिंदू अधिवेशनानंतर हिंदुत्वनिष्ठ सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची आदरपूर्वक भेट घेतात. त्यांना आलिंगन देतात, तर वाकून नमस्कार करतात. हिंदुत्वनिष्ठांच्या मनात सद्गुरु काकांविषयी पितृत्वाची आणि आदराची भावना जाणवते. ते देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभच झाले आहेत.
  • त्यांनी साधनेत केलेल्या मार्गदर्शनामुळे आज अनेक हिंदुत्वनिष्ठांची साधना आणि कार्य वेगाने चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात