धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्रासाठी कार्याला साधनेची जोड देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन !

उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना श्री. सुनील घनवट, सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, सौ. क्षिप्रा जुवेकर
अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ३० सप्टेंबर या दिवशी जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. अधिवेशनास जळगाव शहरासह जिल्ह्यातील धरणगाव, भुसावळ, बोदवड, यावल, चोपडा या तालुक्यांतील हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिवेशनास शंखनादाने आरंभ झाला. दीपप्रज्वलन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. व्यासपिठावरील वक्ते सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान बोदवड येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पंढरी रहाणे यांनी केला तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार जय मातादी ग्रुपचे श्री. ऋषि लुल्ला यांनी केला. अधिवेशनाचे प्रास्ताविक समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्रासाठी कार्याला साधनेची जोड देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

चांगले जीवन जगण्यासाठी आदर्श असे रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे. सध्या समाजात अनीती, भ्रष्टाचार, अनाचार, दंगली, बलात्कार यांनी थैमान घातले असून न्याय व्यवस्थाही धर्माच्या विरोधात गेली आहे. कलम ३७७, कलम ४९७, शबरीमला प्रकरणात मोकळीक देऊन धर्मव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्रासाठी कार्याला साधनेची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नामजप, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करून व्यष्टी साधना करणे आवश्यक आहे. धर्मावरील आघात, धर्महानी रोखून, धर्माविषयी प्रेम, अभिमान, जागृती करणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे विचार प्रभावीपणे आणि जलदगतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा ! – सुनील घनवट

आज समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेचे विचार प्रभावीपणे आणि जलदगतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी संवैधानिक मार्गाने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करणे, ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करणे, त्या माध्यमातून कार्यकर्ते जोडणे, धर्मजागृती सभांचे आयोजन करणे आवश्यक आहे. यामुळे हिंदूंमधील स्वाभिमान जागृत होऊन आत्मविश्‍वास वाढायला साहाय्य होत असते. साधनेमुळे देव साहाय्य करत असल्याने अल्प लोकांमध्येही धर्मसभांचे आयोजन केले जाऊ शकते.

या वेळी त्यांनी मालेगाव, पुसद, श्रीरामपूर येथील धर्मजागृती सभांचे अनुभवकथन केले. अखेरीस धर्मजागृती प्रसाराच्या दृष्टीने गटचर्चा घेण्यात आली.

क्षणचित्रे

१. पद, पक्ष, संप्रदाय बाजूला ठेवून सर्व हिंदुत्वनिष्ठ अधिवेशनात सहभागी झाले होते.

२. प्रतिमास होणार्‍या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या विषयाचे निवेदन जिल्ह्यातील १० हून अधिक तालुक्यांत देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात