अष्टांग साधना करून आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बना ! – सद्गुरु सत्यवान कदम

कुडाळ येथे हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींसह १. सद्गुरु सत्यवान कदम आणि २. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कुडाळ – हिंदु राष्ट्रासाठी समाजाचे संघटन करतांना स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती, अशी अष्टांग साधना करत आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनले पाहिजे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ईश्‍वरी अधिष्ठान महत्त्वाचे असते. यासाठी प्रतिदिन व्यष्टी साधना प्रामाणिकपणे करायला हवी, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांना साधना आणि कार्य यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी २९ आणि ३० सप्टेंबर या दिवशी येथील दामले मंगल कार्यालयात हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत हिंदु राष्ट्र संघटकांची आदर्श आचारसंहिता कशी असावी, याविषयावर मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम बोलत होते. या कार्यशाळेला सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना समजून घेतली पाहिजे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये म्हणाले, हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करतांना हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही जणांना हिंदूबहुल राष्ट्रात राहूनही आपण हिंदु राष्ट्राची मागणी का करत आहोत ? याचे आश्‍चर्य वाटते. आज हिंदु राष्ट्र शब्द आम्ही उच्चारला, तरी पुरोगामी, निधर्मी, प्रसारमाध्यमे हिंदु राष्ट्राची मागणी घटनाबाह्य आहे, असे सांगत थयथयाट करतात. राज्यघटनेचा अपूर्ण अभ्यास करणार्‍यांनी हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनात्मकच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

३० सप्टेंबर या कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ आध्यात्मिक नामजपादी उपाय याविषयी मागदर्शन आणि शंकानिरसन केले. याशिवाय या कार्यशाळेत हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यांतर्गत हिंदूसंघटनाचे विविध उपक्रम राबवणे आदी विषयांवर चर्चा झाली. कार्यशाळेत काही धर्मप्रेमींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. दैवेश रेडकर यांनी, तर आभारप्रदर्शन सनातनचे श्री. राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यशाळेची सांगता सौ. अंजली मणेरीकर यांनी म्हटलेल्या वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने झाली.

क्षणचित्र

कार्यशाळेतील विषय ऐकल्यानंतर धर्मप्रेमींनी हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या ग्रामबैठका, छोट्या सभा यांमध्ये, तसेच प्रबोधनात्मक हस्तपत्रकांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे, फलकप्रसिद्धी करणे आदी उपक्रमांमध्येही सहभागी होऊ, असा निर्धार व्यक्त केला.

हिंदु राष्ट्र संघटकांसाठी रामराज्याचा आदर्श आणि भगवद्गीतेचा
अभ्यास महत्त्वाचा ! – सत्यविजय नाईक, दक्षिण गोवा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करतांना आपल्याला समाजात जाऊन कार्य करावे लागणार आहे. यासाठी आपले आचरण आदर्श असले पाहिजे. तरच समाजाचा आपल्यावर विश्‍वास बसणार आहे. हिंदुत्वाचे हे कार्य करतांना आपल्यामध्ये वक्तशीरपणा हवा. आपली भाषा शुद्ध हवी. आपण अपशब्दांचा वापर टाळायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करतांना आपल्यासमोर रामराज्याचा आदर्श असणे, तसेच भगवद्गीतेचा अभ्यास करणे महत्त्वाचा आहे, असे  हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोव्याचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात