(म्हणे) ‘सनातनवाल्यांनी आतंकवादी उंदीर-घुशी कालव्यात सोडले नाहीत ना ?’

पुणे येथील मुठा कालव्याची बातमी दाखवतांना सनातन
संस्थेला ‘आय्.एस्.आय्.’च्या पंक्तीत उल्लेख करून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न

‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीला सनातनद्वेषाची कावीळ

अशी पीतपत्रकारिता समाजाला काय दिशादर्शन करणार ?

मुंबई – पुणे येथील मुठा कालव्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचे २९ सप्टेंबर या दिवशी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीवर ‘बुलेटिन’ या सदरात वृत्त दाखवण्यात आले. या वृत्तामध्ये ‘टीव्ही ९’च्या पुणे येथील प्रतिनिधींनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये जलसंपदामंत्री महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी पोखरल्यामुळे कालव्याची भिंत कोसळली, असे विधान केले. त्यांच्या या विधानावर टीपणी देतांना सनातनचा या विषयाशी काहीही संबंध नसतांना ‘टीव्ही ९’च्या प्रतिनिधीने ‘हे उंदीर, घुशी, खेकडे पाकिस्तानातून आले नाहीत ना ? हे उंदीर, घुशी ‘आय्.एस्.आय्.’चे हस्तक तर नाहीत ना ? कि नक्षलवादी, सनातनवाल्यांनी हे आतंकवादी उंदीर, घुशी कालव्यात सोडले, तर नाहीत ना ?’, असा उल्लेख करून सनातन संस्थेला ‘आय्.एस.आय्.’, आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्या पंक्तीत बसवण्याचा निषेधार्ह प्रयत्न केला. (जसे मोगलांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, तसेच टीव्ही ९ ला कोठेही काही घडले, तरी त्यांना सनातन दिसते. – संपादक)

यापूर्वीही ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीकडून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा विडा घेतला असल्याप्रमाणे सातत्याने सनातनच्या विरोधात खोट्या बातम्या दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे सनातन संस्थेकडून ‘टीव्ही ९’ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. याविषयी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींनी सनातनची अपकीर्ती करणार्‍या अशा प्रकारच्या टीपणीविषयीही कायदेशीर कारवाईसाठी आम्ही अधिवक्त्यांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले. (सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था असून तिचे साधक अध्यात्म आणि धर्मप्रसाराचे कार्य निरपेक्ष आणि कर्तव्य भावनेतून करत आहेत; मात्र ते समजून न घेता द्वेषभावनेतून केली जाणारी पत्रकारिता समाजाची दिशाभूल करत आहे. ही पत्रकारिता हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या सनातनला संपवण्यासाठी पैसे घेऊन तर चालू नाही ना, याविषयी शंका येते. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात