(म्हणे) ‘सनातन या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही ?’ – धनंजय मुंडे

राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनने हिंसा केल्याचे एकतरी उदाहरण धनंजय मुंडे यांनी दाखवावे ! हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे. अशा पक्षाच्या नेत्याने एकही गुन्हा नोंद नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पदच !

मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) – पुरोगामी विचारवंतांच्या हत्यांसाठी उत्तरदायी असणार्‍या गुन्हेगारांचे धागेदारे आता अन्वेषणातून उकलत आहेत. सनातन संस्थेशी असलेले त्यांचे लागेबांधे सिद्ध होत असूनही या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही ? असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी केले आहे. ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्‍न, जबाव दो’, असे नमूद करत हा प्रश्‍न भाजपला करण्यात आला आहे. (आतापर्यंतच्या अन्वेषणामध्ये सनातन संस्थेचे नाव आलेले नाही, असे आतंकवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदतून स्पष्ट केले आहे. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनीही ‘अन्वेषणामध्ये सनातन संस्थेचा कोणत्याही प्रकारे हात असल्याचे पुढे आलेले नाही’, असे स्पष्टीकरण दिलेले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद असलले धनंजय मुंडे यांना मात्र हे ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? त्यामुळे पुनःपुन्हा सनातनच्या बंदीची मागणी करून मुसलमानांचे लांगूलचालन करायचे, हा एककलमी कार्यक्रम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी चालू केला आहे, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात