(म्हणे) ‘सनातनचे साधक वहात्या पाण्यात विसर्जन करायला सांगत असल्याने वाद निर्माण झाला आहे !’

‘जय महाराष्ट्र’ संकेतस्थळावरील वृत्त

घटनेने प्रत्येक नागरिकाला धर्मप्रसार करण्याचा अधिकार दिला असून त्याचाच आधार घेऊन सनातनचे साधक मूर्तीविसर्जनाविषयीचे धर्मशास्त्र सांगतात ! असे असतांना प्रसारमाध्यमे मात्र विपर्यस्त वृत्त छापून सनातनची अपकीर्ती करतात ! अशी प्रसारमाध्यमे समाजाचे हित काय साधणार ?

मुंबई – सनातनचे साधक वहात्या पाण्यात श्री गणेशाची मूर्ती विसर्जन करायला सांगत असल्याने वाद निर्माण झाला आहे. पुण्यात ‘सनातन’चे कार्यकर्ते वहात्या पाण्यातच गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जित करावे, असा नागरिकांना आग्रह करत होते; मात्र हे सगळे होतांना महापालिका आणि पोलीस हतबल झालेले दिसले, असे वृत्त ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. (सनातन केवळ गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करायला सांगते. धर्मशास्त्रानुसार ते योग्य असल्याने सनातन तसा प्रसार करते. येथे कोणावरही तसे करण्यास दबाव आणला जात नाही, तर प्रबोधन केले जाते. असे असतांना धादांत खोटे वृत्त प्रसारित करणारे ‘जय महाराष्ट्र’चे संकेतस्थळ ! – संपादक)

‘खोटे बोल; पण रेटून बोल’ याच तत्त्वाने चालणारी अंनिस !

राज्य सरकारचा आदेश आहे की, वहात्या पाण्यात विसर्जन करू नये. असे असतांना संघटना कुठल्या धर्माच्या आधारे हे सर्व करत आहे ? यामुळे प्रदूषणाविषयीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत आणि महापालिकादेखील यात लक्ष घालत नाही, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केले आहे, असे या वृत्तात पुढे म्हटले आहे. (राज्य सरकारचा असा कुठलाच आदेश नाही की, वहात्या पाण्यात विसर्जन करू नये. असा आदेश असेल, तर अंनिसने तो पुढे येऊन सादर करावा. केवळ धादांत खोटे बोलून धर्मकार्यात खोडा घालायचा याशिवाय अंनिसला दुसरा उद्योग नाही ! गणेशमूर्ती विसर्जनाने कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, ‘सृष्टी इको रिसर्च’ आदी संस्थांनी सांगितले आहे. तरीही कुठलाही पुरावा नसतांना अशी खोटी गरळओक करायची, ते केवळ हिंदूंच्या धर्मप्रथांवर आघात करण्यासाठीच, असेच अंनिसचे धोरण आहे ! – संपादक)

सामान्य नागरिक मात्र वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास विरोध करत आहेत. भविष्यात नद्या स्वच्छ ठेवायच्या असतील, तर गणेशमूर्ती या हौदातच विसर्जित केल्या पाहिजेत आणि निर्माल्य कुंडीत टाकले पाहिजे, या मताचे सर्वसामान्य नागरिक आहेत. (हौदाचे पाणी शेवटी नदीतच सोडतात, मग प्रदूषण होत नाही का ? – संपादक)

मूर्तीशास्त्राप्रमाणे बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती
वहात्या पाण्यात विसर्जित करणे, हेच धर्मसंमत ! – सनातन संस्था

मुंबई – काही तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी नदीप्रदूषणाच्या नावाखाली ‘अमोनियम बायकार्बोनेट’ मिसळलेल्या कृत्रिम हौदांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देतात आणि प्रशासनही त्यानुसार कृती करते. मुळातच असे करणे धर्मशास्त्रविरोधी आहे. धर्मशास्त्रांत ‘श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली असावी, तसेच तिचे आणि निर्माल्याचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ आणि ‘मुद्गलपुराण’ या ग्रंथात म्हटले आहे. वहात्या पाण्यात विसर्जन केल्याने त्याचा लाभ सर्वदूर गणेशभक्तांना होतो आणि पूजकालाही आध्यात्मिक लाभ होतो. हिंदु धर्मशास्त्रांत सांगितलेले सर्व सण-उत्सव हे पर्यावरणपूरकच आहेत. सध्याचे उत्सवांचे पालटलेले स्वरूप मूळ धर्मशास्त्रीय स्वरूपाकडे नेल्यास धर्माचरण होऊन पर्यावरण रक्षणही होईल. असे असतांना कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा अट्टाहास का ?

गणेशमूर्ती विसर्जनासाठी असे अशास्त्रीय पर्याय देण्यापेक्षा शाडू माती आणि नैसर्गिक रंग यांविषयी प्रबोधन हेच पर्यावरणपूरक अन् धर्मशास्त्र सुसंगत होईल. याचसाठी सनातन संस्था गेली अनेक वर्षे प्रबोधन करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, वर्षभर शहरातील सांडपाणी नदी-नाल्यांत सोडले जात असतांना त्याविषयी निष्क्र्रिय असणार्‍या महानगरपालिका, तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी गणेशोत्सव आल्यावर मात्र प्रदूषण रोखण्यासाठी सक्रिय होतात. ‘गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’, असे विचित्र समीकरण मांडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हितसंबंधांतून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहे. या हौदांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून महापालिका नंतर त्या कचर्‍याच्या गाडीतून नेऊन पुन्हा नदीच्या पात्रातच फेकत असल्याचे पुण्यातील विविध प्रसिद्धीमाध्यमांनी छायाचित्रासह उघड केले आहे. सध्या प्रशासन चालवत असलेल्या अशास्त्रीय मूर्ती विसर्जन करण्याच्या भूमिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्रत्यक्षात पर्यावरणाची हानी ज्या गोष्टींमुळे होते, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे. नदी स्वच्छतेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही नदीची स्वच्छता केली जात नाही, तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या दिवशी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात येते; पण प्रशासन त्यावर कृती करत नाही. त्यामुळे नदीमध्ये पाणी सोडून धर्मशास्त्र आचरण्यास अनुकूलता निर्माण करण्यासाठी जनतेने प्रशासनावर दबाव आणायला हवा.

वैध मार्गाने धर्मशास्त्र सांगणार्‍या सनातन संस्थेची ‘मीडिया ट्रायल’ करण्याचा प्रयत्न निषेधार्ह !

सनातन संस्था राबवत असलेल्या मोहिमेमध्ये सनातनचे साधक नम्रपणे धर्मशास्त्र सांगून भाविकांचे प्रबोधन करत असतात. साधक निर्माल्य गोळा करून ते नदीमध्ये विसर्जन करण्यासारखी कोणतीही मोहीम राबवत नाहीत. असे असतांना प्रसिद्धीमाध्यमे ‘सनातनचे साधक नदीमध्ये विसर्जित करण्यास दबाव आणतात, धमकावतात’, ‘सनातनचे साधक निर्माल्य गोळा करून वहात्या पाण्यात विसर्जन करतात’, अशा खोट्या बातम्या दाखवून सनातनची मानहानी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे चुकीच्या बातम्या दाखवून ‘मीडिया ट्रायल’ घेणे निषेधार्ह आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात