श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रोक्त करण्याविषयीच्या प्रबोधन मोहिमेची ‘हेकेखोरपणा’ संबोधून हेटाळणी !

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीकडून हिंदु जनजागृती
समिती  आणि सनातन संस्था यांच्याविषयी विपर्यस्त वार्तांकन ‘

मूर्तीविसर्जनाविषयी धर्मशास्त्र सांगणार्‍या संस्थांची अशा प्रकारे हेटाळणी करून हिंदुद्वेषाचा कंड शमवणारी ‘एबीपी माझा’ वाहिनी !

पुणे – हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करावे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी वैध मार्गाने प्रबोधन मोहीम राबवण्यात येते. त्या अंतर्गत साधक आणि कार्यकर्ते हातात प्रबोधनात्मक फलक धरून वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याविषयी प्रबोधन करतात. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने या प्रबोधन मोहिमेची ‘सनातनचा हेकेखोरपणा’ अशा शब्दांत हेटाळणी करत विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध केले.

या वृत्तामध्ये ‘वहात्या पाण्यात विसर्जन म्हणजे धर्माचे पालन ! – सनातन’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसारित करण्यात येत होते. असे करतांना गणेशभक्तांनी नदीत मूर्तीचे विसर्जन करू नये, यासाठी जनमत निर्माण करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला. ‘नदीचे पाणी प्रदूषित असतांना वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचा आग्रह कशासाठी ?’, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला. (भारतात लोकशाही आहे. त्यानुसार प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आणि धर्मप्रसार करण्याची मुभा आहे. समिती आणि संस्था त्या आधारेच मूर्तीविसर्जनामागील धर्मशास्त्र सांगतात. त्यामुळे ‘एबीपी माझा’ला पोटशूळ उठण्याचे कारण काय ? इतरांना कायदा आणि घटना शिकवणार्‍या अशा वृत्तवाहिन्या हिंदूंना घटनेने दिलेल्या अधिकारांकडे डोळेझाक करते ! ही वृत्तवाहिनीने केलेली घटनेची पायमल्ली नव्हे का ? समिती आणि सनातन यांची हेटाळणी करणार्‍या या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात