कोल्हापूर येथे जनप्रबोधनानंतर असंख्य भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कुंडाऐवजी वहात्या पाण्यात !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम’ !

कोल्हापूर महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या मूर्तीदान मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद !

फलक हातात घेऊन प्रबोधन मोहीम राबवतांना धर्मप्रेमी

कोल्हापूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबला येथील पंचगंगा घाटावर राबवलेल्या ‘आदर्श गणेशोत्सव मोहिमे’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविकांचे प्रबोधन केल्यानंतर ‘आम्ही गणेशमूर्ती दान न करता वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करणार आहे’, असे भाविकांनी सांगून मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. दुसरीकडे ‘कोल्हापूर महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१८’ या मूर्तीदान मोहिमेत गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी संवर्धन समितीकडे केवळ २ सहस्र अशा अल्प प्रमाणात मूर्ती दान झाल्या. पंचगंगा घाटावर सकाळी १० वाजल्यापासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचे उद्घाटन विहिंपचे श्री. अशोक रामचंदानी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले, तर हिंदुत्वनिष्ठ श्री. सावंत यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून औक्षण केले. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘अशास्त्रीय मूर्तीदान करू नका, ‘मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हा अपप्रचार थांबवा’ ‘वर्षभर पंचगंगा नदीचे प्रदूषण होत असतांना केवळ हिंदूंच्या सणांच्याच वेळी प्रदूषणाचा कांगावा कशाला ?’ अशा प्रकारचे प्रबोधन फलक हातात धरण्यात आले होते. भाविकांना शास्त्रानुसार वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्याचे ध्वनीक्षेपकावरून आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे असंख्य भाविकांनी मूर्तीदान करण्याऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.

मोहिमेतील सहभागी हिंदुत्वनिष्ठ

प्रबोधनकक्षाचे उद्घाटन करतांना विहिपचे श्री. अशोक रामचंदानी

 

१. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने उभारण्यात आलेला मंडप आणि व्यासपीठ

या मोहिमेत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, विहिंपचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, वन्दे मातरम् युथ फेडरेशनचे श्री. अवधूत भाट्ये, पंतजली योग शिक्षक श्री. घनश्याम पटेल, धर्मप्रेमी श्री. देवराज सहानी, कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगवेकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सौजन्याने व्यासपीठ आणि फलक लावण्यात आले !

पंचगंगा घाटावर शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या सौजन्याने मंडप, व्यासपीठ, ध्वनीक्षेपक आणि विद्युत्जनित्र अशी सुविधा करून देण्यात आली होती, तसेच ‘श्री गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत’ या नावाचा मोठा फलक लावण्यात आला होता.

प्रायव्हेट हायस्कूल येथे कायलीत गणेशमूर्ती विसर्जन बंद करण्यास हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले !

येथील प्रायव्हेट हायस्कूल येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक पोल्हादे यांनी शाळेच्या मैदानात एक ठिकाणी कायली सिद्ध केली होती. या कायलीत त्यांनी गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे भाविकांना आवाहन केले. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी एका स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने दीपक पोल्हादे यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून कायलीत गणेशमूर्ती विसर्जन करणे बंद करण्यास भाग पाडले.

वैशिष्ट्यपूर्ण…

१. कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध गावांत धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. या धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी ‘गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून शास्त्रानुसार आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’, असे भाविकांना फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅप या संकेतस्थळाच्या माध्यमातून आवाहन केले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भाविकांनी गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.

२. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पंचगंगा घाटावरील भूमीत मंडप उभा करून व्यासपीठ सिद्ध केले होते. या मंडपाच्या वरील आकाशातील ढगामध्ये श्री गणेशाच्या आकाराची आकृती उमटली होती. एकप्रकारे श्री गणेशाने मोहिमेतील साधकांना या माध्यमातून आशीर्वाद दिला होता.  १० लाख रुपये खर्च करून मूर्तीदानाच्या प्रसारासाठी मंडप !

दान केलेल्या मूर्ती खणीवर घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेने ८ ट्रॅक्टर ट्रॉली, २ डंपर ठेवले होते. तसेच विसर्जनासाठी २ मोठे कुंड सिद्ध केले होते. भाविकांचा प्रतिसाद नसल्याने गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी ट्रॅक्टर टॉली आणि विसर्जन कुंड यांची संख्या अल्प होती. महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीने अंदाजे १० लक्ष रुपये खर्च पंचगंगा घाटावर भव्य मंडप उभा केला होता. (हा पैसा वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वापरला असता, तर संवर्धन समितीवर श्री गणेशाची कृपा झाली असती ! – संपादक) तेथे ६ विसर्जन कुंड सिद्ध करण्यात आले होते. या समितीचे १५ कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान करवून घेत होते. महापालिकेचे कामगार भाविकांकडून आलेले निर्माल्य एका कुंडात जमा करत होते. महानगरपालिकेने निर्माल्य ट्रकमध्ये टाकण्यासाठी जेसीबीची व्यवस्था घाटावर केली होती.

 

मूर्तीदानासाठी नेलेल्या गणेशमूर्ती भंग पावून त्यांची विटंबना !

मूर्तीदान केल्यावर दिसणारे दुष्परिणाम जाणा !

भाविकांनी मूर्तीदान केल्यानंतर त्या मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीत घालून इराणी खणीत विसर्जित करण्यात येत होत्या. संवर्धन समितीचे कार्यकर्ते ट्रॉलीत मूर्ती अयोग्य पद्धतीने ठेवत असल्याने अनेक मूर्ती भग्न पावल्या.

तथाकथित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या मोहिमेकडे भाविकांनी पाठ फिरवली !

कोल्हापूर महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने घाटावर भव्य मंडप उभा करून भाविकांना ध्वनीक्षेपकावरून मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते; मात्र या मोहिमेकडे भाविकांनी पाठ फिरवली. भाविकांनी मूर्तीदान केल्यानंतर संवर्धन समितीकडून मंडळांना ‘विसर्जन कुंडामध्ये मूर्तीविसर्जन करून पुढील पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण दिलेल्या उत्स्फूर्त योगदानाविषयी असे प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येत होते. या प्रमाणपत्रावर पंचगंगा घाट संवर्धन समितीचे अध्यक्ष, महापौर आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांची स्वाक्षरी आहे. (अशी धर्मद्रोही कृती करून संवर्धन समिती आणि महानगरपालिका यातून काय साध्य करत आहे. धर्माचरण कसे करावे आणि धर्मशास्त्राची माहिती नसल्याने संवर्धन समितीकडून अशी चुकीची कृती होत आहे. – संपादक)

क्षणचित्रे

१. ‘वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करा’, या आवाहनाला प्रतिसाद देऊन असंख्य भाविक मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करून घरी जात असतांना मोहिमेतील साधकांना ‘आम्ही वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन केले आहे’, असे आवर्जून सांगत होते. यंदाच्या वर्षी प्रदूषण गणेशमूर्ती विसर्जनामुळे नव्हे, तर कारखान्यांतील सांडपाण्यामुळे होते, हे भाविकांना चांगल्या तर्‍हेने लक्षात आले आहे, असे जाणवले.

२. अनेक भाविक जात असतांना एकाग्रतेने प्रबोधन फलकांवरील माहिती वाचत होते.

३. ‘वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करा’, असे आवाहन केल्यानंतर अनेक भाविक महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीने ठेवलेल्या पटलावर श्री गणेशाची आरती करून मूर्ती मात्र नदीत विसर्जन करत होते.

४. भाविक नदीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी जात असतांना पंचगंगा घाट संवर्धन समितीचे कार्यकर्ते त्यांना अडवून ‘मूर्तीदान करा आणि प्रमाणपत्र घ्या’, असे सांगत होते.

५. ध्वनीक्षेपकावरून ‘अशास्त्रीय मूर्तीदान करू नका, गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा, मूर्तीदान करून गणेशाची अवकृपा ओढवून घेऊ नका, गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून गणेशाची कृपा संपादन करा’, असे आवाहन करण्यात येत होते.

६. या वेळी ‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्यपरिणाम’ या अंकाचे विनामूल्य वितरण करण्यात आले, तसेच ‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याविषयीचे हस्तपत्रकेही भाविकांना देण्यात आली.

७. छोट्या गाड्यांवर एकाच वेळी १५ ते २० गणेशमूर्ती घेऊन भाविक आले होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन करून त्यांना वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात