गोरक्षक वैभव राऊत यांच्या अटकेचे निमित्त करून काही राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी सनातन संस्थेची जाणीवपूर्वक अपकीर्ती करूनही सर्वसामान्य जनतेची संस्थेप्रती असलेली विश्‍वासार्हता !

१. काही राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी ‘सनातन संस्थेवर बंदी आणावी’,
अशी टीका करत असतांनाही संस्थेच्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे

‘गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना काही दिवसांपूर्वी ‘आतंकवाद विरोधी पथका’ने (‘ए.टी.एस्.’ने) अटक केली. तेव्हा काही राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी ‘श्री. वैभव राऊत हे सनातनचे साधक आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी आणावी’, अशी टीका चालू केली. अशी टीका झाली, तरी ‘या टीकेचा सनातन संस्थेच्या प्रसारकार्यावर थोडाही परिणाम झालेला नाही’, असे लक्षात आले. आमचा प्रसार नेहमीप्रमाणेच चालू आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यांनाही समाजातील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२. समाजात प्रसार करतांना सर्वसामान्य लोकांचा
सनातनला पाठिंबा आणि विश्‍वास कायम असल्याचे लक्षात येणे

या काळात साधकांना सेवेसाठी समाजात जातांना कसलाही ताण नव्हता. साधकांकडे या प्रकरणाविषयी नगण्य लोकांनी चौकशी केली. ‘प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्ते, चर्चासत्रे आदींद्वारे सनातनला कितीही विरोध केला, तरी सर्वसामान्य लोकांचा सनातनला पाठिंबा आहे आणि संस्थेवर विश्‍वासही आहे’, हे लक्षात आले.’

– सौ. अर्पिता पाठक, सनातन संकुल, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात