धर्मशास्त्र समजून घेऊन गणेशोत्सव साजरा करा आणि उत्सवाचा अध्यात्मदृष्ट्या लाभ करून घ्या ! – विवेक पेंडसे, सनातन संस्था

गोवा दूरदर्शनवरील लाईव्ह फोन ईन
कार्यक्रमात गणेशोत्सवामागील धर्मशास्त्राविषयी प्रबोधन !

सनातन संस्थेचा प्रमुख सहभाग

श्री. विवेक पेंडसे

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – धर्मशास्त्र समजून घेऊन गणेशोत्सव साजरा करावा आणि उत्सवाचा अध्यात्मदृष्ट्या लाभ करून घ्यावा, असे आवाहन सनातनचे साधक श्री. विवेक पेंडसे यांनी गोवा दूरदर्शनवर लाईव्ह फोन ईन कार्यक्रमात गणेशोत्सवामागील धर्मशास्त्राविषयी माहिती देतांना केले.

गोवा दूरदर्शन पर्यावरण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, शिक्षण, उत्सव आदी अनेक विषयांवर समाजाशी थेट संवाद साधण्यासाठी लाईव्ह फोन ईन कार्यक्रमाचे आयोजन करते. या कार्यक्रमात संबंधित क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. विज्ञानाने आज झपाट्याने प्रगती केलेली आहे. याचा परिणाम प्रत्येक सणावर दिसतो. त्यामुळे योग्य गोष्ट कोणती आणि अयोग्य कोणती हे ठरवण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशभक्तांच्या वतीने सौ. शुभा सावंत यांनी श्री. विवेक पेंडसे यांना गणेशोत्सवाविषयी अनेक प्रश्‍न विचारून भक्तांच्या मनातील गणेशोत्सवामागील शास्त्राविषयी शंकांचे निरसन केले. अनेक भक्तांनी कार्यक्रम चालू असतांना फोन करून गणेशोत्सवाविषयी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना श्री. विवेक पेंडसे यांनी उत्तरे दिली.

या वेळी श्री. विवेक पेंडसे यांनी पुढील सूत्रांविषयी माहिती दिली.

१. कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती अशास्त्रीय आणि पर्यावरणाला बाधक का ?

२. प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती पूजणे योग्य आहे का ?

३. श्री गणेशाची मूर्ती दीड दिवसानंतर विसर्जित करण्यामागील कारण काय ?

४. कोणत्याही कार्यारंभी गणपतीचे पूजन का करतात ?

५. विविध वस्तूंपासून गणपतीची मूर्ती बनवणे चुकीचे का ?

६. उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा गणपति यांतील भेद !

७. लाल फूल आणि दूर्वा श्री गणेशाला वाहण्यामागील शास्त्र !

८. गणपतिला २१ मोदक वाहण्यामागे अंकशास्त्र !

९. मूर्ती भंग झाल्यास काय करावे ?

१०. शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे योग्य कसे ?

(कार्यक्रमातील प्रश्‍नोत्तरांविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात