सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यामुळे समाजात जागृती होत आहे ! – गणेशमूर्तीकार, देवगड

हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव प्रबोधन मोहीम

गणेशमूर्ती शाळेत आलेल्यांना सनातनचा श्री गणपति हा ग्रंथ देतांना उजवीकडे श्री. दत्तात्रय आचरेकर

 

श्री गणेशमूर्ती बनवतांना श्री. सुधीर दहिबांवकर

देवगड – गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. रविकांत नारकर, सनातनच्या सौ. ज्योत्स्ना नारकर आणि श्री. अशोक करंगुटकर यांनी तालुक्यातील काही गणेशमूर्ती शाळांना भेटी दिल्या. या वेळी गणेशोत्सव प्रबोधन मोहिमेच्या अंतर्गत गणेशमूर्तीकारांना त्यांनी विविध सूत्रे सांगून प्रबोधन केले. या वेळी गणेशमूर्तीकारांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्मप्रसाराचे कार्य चांगले आहे. अशी जागृती झाल्यास हिंदूंना धर्मपालन करण्यास साहाय्य होईल, असे मत व्यक्त केले.

सनातनचे गणपतिविषयीचे ५० लघुग्रंथ विकत घेऊन
गणेशमूर्तींसह इतरांना देणारे श्री. दत्तात्रय पुरुषोत्तम आचरेकर !

विष्णुनगर, जामसंडे येथील श्री. दत्तात्रय पुरुषोत्तम आचरेकर गेली ६४ वर्षे केवळ शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवतात. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय असून सध्या ते ५० मूर्ती बनवतात. प्रबोधन मोहिमेच्या अंतर्गत त्यांना माहिती दिल्यावर त्यांनी मूर्तीशाळेत सनातनचा गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी, हा फ्लेक्स लावण्यास अनुमती दिली. तसेच गणपति आणि गणेश पूजाविधी हे दोन लघुग्रंथ त्यांना दाखवण्यात आल्यावर त्यांनी त्यातील काही मजकूर वाचून पाहिला आणि त्यानंतर गणेशमूर्तीसह ग्रंथ देण्यासाठी एकूण ५० ग्रंथ विकत घेतले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यासाठी कितीही मूल्य दिले तरी मी त्या करणार नाही, असे श्री. आचरेकर यांनी सांगितल्याचे डॉ. नारकर यांनी सांगितले.

शाडूमातीच्या मूर्तीपासून चैतन्य आणि सात्त्विकता मिळते ! – सुधीर दहिबांवकर

जामसंडे, तरवाडी येथील श्री. सुधीर सदानंद दहिबांवकर ४२ वर्षे मूर्ती बनवण्याची सेवा करत असून त्यांना त्यांच्या बंधूंकडून प्रेरणा मिळाली आहे. प्रारंभी स्वत:साठी एकच मूर्ती बनवत होते; मात्र नंतर मूर्तींच्या संख्येत वाढ होत आता ती ४० वर पोहोचली आहे. श्री गणेशाप्रती असलेला भक्तीभाव आणि मूर्तीकला जोपासली जावी, यासाठी मूर्ती बनवत असल्याचे श्री. दहिबांवकर यांनी सांगितले.

गणेशोत्सव प्रबोधन मोहिमेच्या अतंर्गत श्री गणेशमूर्तीविषयी शास्त्रीय माहिती दिल्यावर श्री. दहिबांवकर म्हणाले, हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करते हे १०० टक्के बराबेर आहे. लोकांनी विविध रूपांतील श्री गणेशमूर्तींची मागणी केल्यास प्रथम मीच त्यांचे प्रबोधन करतो. तरीही ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्यास नाईलाजास्तव मूर्ती बनवून द्यावी लागते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती लोकांना जे धर्मशिक्षण देत आहे, ते खरोखरच महान कार्य आहे. याद्वारे लोकांना योग्य काय आणि अयोग्य काय, हे समजल्याने धर्मपालन करण्यास साहाय्य होणार आहे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. श्री गणेश या कार्यातील अडथळे दूर करो !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींविषयी श्री. दहिबांवकर म्हणाले, हा व्यवसाय पैसे कमावण्यासाठी करत नाही, तर मातीपासूनच्या मूर्ती बनवणे ही आपली परंपरा आहे. त्यातून अधिक सात्त्विकता मिळते. ती सात्त्विकता सर्वांना मिळावी, हा यामागील उद्देश आहे. लोभापायी मी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणार नाही. मातीच्या मूर्तीपासून मला चैतन्य मिळते.

डॉ. नारकर यांनी श्री. गणपत केशव वारीक, वारीकवाडी, पडेल; श्री. बाबीराम शांताराम माळगवे, शेवडीवाडी, पडेल, तसेच सडेवाघोटन येथील श्री. मनोहर वानिवडेकर आणि श्री. राणे यांच्या मूर्तीशाळांना भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत सनातनच्या सौ. ज्योत्स्ना नारकर आणि श्री. अशोक करंगुटकर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात