सनातन संस्थेवर बंदी घालावी म्हणून दबाव आणणार्‍या काँग्रेस, जेडीएस् यांच्यासारखे राजकीय पक्ष आणि विविध इस्लामी संघटना निर्दोष आहेत का ?

‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कोणत्यातरी प्रकरणात अडकवून त्यांना अपकीर्त करून लोकांमध्ये त्या संघटनांविषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. यातून डाव्या विचारसरणीचे लोक त्यांच्यावर बंदी घालण्याचे प्रयत्न करत असतात. त्याचे सध्याचे उदाहरण म्हणजे सनातन संस्था ! ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, म्हणून काही डाव्या विचारसरणीचे आंदोलक, त्यांच्याच पठडीचे लेखक, त्याच पातळीचे वार्ताहर यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांची भेट घेऊन सनातनवर बंदी घालण्याचा आग्रह केला. ‘बघू ! सनातन संस्थेविरुद्ध गौरी लंकेश हत्येमध्ये सहभागी असल्याचा काही पुरावा मिळाल्यास बंदी घालण्याविषयी विचार करू’, असे परमेश्‍वर यांनी उत्तर दिले.

१. राज्य सरकार हुडकत असलेले पुरावे कोणते ?

गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी परशुराम वाघमारे हा सनातनचा कार्यकर्ता आहे, असे म्हटले जाते. तो मुळात विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी येथील आहे. त्याला श्रीराम सेनेचा सक्रीय कार्यकर्ता, असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे एकूणच परशुराम आणि सनातन संस्था यांना जोडून सनातन संस्थेवर बंदीची प्रक्रिया झाली पाहिजे, असा डाव्यांचा दबाव आहे. मुळात परशुरामने गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे. ते सिद्ध न झाल्यास ‘तो कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे’, या विषयाला अर्थच उरणार नाही. यापूर्वी बॉम्बस्फोटाच्या एका प्रकरणात कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या ‘अभिनव भारत’वर आरोप करण्यात आला होता. नंतर हे दोघेही आरोपी नसल्याचे अन्वेषण यंत्रणांनीच न्यायालयाला सांगितले. त्यांच्यावर लादलेले आरोप आणि अपकीर्त करण्याचे प्रयत्न, या सर्वांचे उत्तर कोण देणार ? आताही तसेच ! परशुरामने गौरी लंकेशची हत्या केल्याचे सिद्ध होण्याआधीच सनातनचा कार्यकर्ता म्हणून बंदी घालणे शक्य आहे का ?

२. काँग्रेस, जेडीएसच्या प्रमुखांकडे शस्त्रास्त्रे सापडल्यास… ?

काँग्रेस, जनता दल (धर्मनिरपेक्ष), मुसलमान संघटनेच्या प्रमुखांच्या ‘सत्यवादी’पणाची अनेक उदाहरणे देता येतील. २३ ऑगस्ट २०१८ या दिवशी जनता दल (धर्मनिरपेक्ष)च्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अकबर अली यांच्या घरी ६ बंदुका आणि ३०० काडतुसे सापडली होती. यामुळे या पक्षाला ‘आतंकवादी पक्ष’ म्हणून घोषित करणे शक्य आहे का ? १० ऑगस्ट २०१८ या दिवशी मणीपूर येथील काँग्रेस शासक सैकुल यांच्या घरी ५६ पिस्तुले, २४.६ लक्ष रोकड, ४५ राऊंड इतकी काडतुसे सापडली. काँग्रेसला आतंकवादी संघटना म्हणून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे का ? कर्नाटकातील रामनगर येथे बांगलादेशी जमाते-इस्लामीचा आतंकवादी मुनीर याला ‘एन्.आय.ए.’ने अटक केली होती. त्याने ९ जणांना बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण दिले होते. इस्लामी कट्टरतावादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर २७ हत्यांची प्रकरणे, ८७ हत्यांचा प्रयत्न, १०६ दंग्याची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आतंकवादी संघटना म्हणून बंदी घालण्याचे सरकार धैर्य दाखवील ?

आजपर्यंत झालेल्या कोणत्याही प्रकरणात सनातनचा हात नसल्याचे एन्.आय.ए., सी.आय.डी., एस्.आय.टी., सी.बी.आय., ए.टी.एस्., या तपास यंत्रणांनी सांगूनही सनातनवर आतंकवादी संघटना म्हणून खोटा आरोप करणे, हे कितपत योग्य आहे ? डाव्यांना सनातनविषयी असलेली सर्वांत मोठी भीती म्हणजे संपूर्ण भारतात सनातनविषयी, तिच्या सौम्य दृष्टीकोनाविषयी, कोणत्याही राजकारणात न पडता हिंदुत्वाचे सार लोकांना पटवून देण्याच्या कार्याविषयी सर्वांना (सनातनविषयी) प्रेम अन् विश्‍वास वाढत आहे. त्यामुळे काहीतरी करून सनातनवर बंदी घातल्यास उरलेल्या मोठ्या हिंदुत्ववादी संघटना मौन होतील, अशी ‘दूरदृष्टी’ काँग्रेस तसेच डावे यांची आहे. त्या दृष्टीने ते यशस्वी होतील का ? हे काळच सांगेल.’

– श्री. हनुमंत कामत, श्री सेवांजली चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाटक.