नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे हीच आजची धर्मनिरपेक्षता का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील
अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ भिवंडी आणि कल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

कल्याण, ११ सप्टेंबर (वार्ता.) – नालासोपारा येथील कथित स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरणी गेल्या महिनाभरात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदी करत आहेत. काही प्रसारमाध्यमे सनसनाटी आणि दिशाभूल करणारी वृत्ते प्रसारित करून ‘हिंदु आतंकवादा’चा ढोल बडवत आहेत; मात्र दुसरीकडे कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना सोयीस्करपणे पाठीशी घातले जात आहे, हा दुटप्पीपणा आहे. हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणायचे आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘मानवाधिकार कार्यकर्ते’ म्हणून उदात्तीकरण करायचे हीच आजची धर्मनिरपेक्षता का ?, असा प्रश्‍न विचारत पुरो(अधो)गामी संघटना आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या प्रसारमाध्यमांचा येथे झालेल्या  आंदोलनात निषेध करण्यात आला. भिवंडी आणि कल्याण येथे ९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

 

भिवंडी

भिवंडी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला उपस्थित धर्माभिमानी

धर्माच्या बाजूने लढणार्‍यांचा विजय निश्‍चित आहे ! – प्रशांत सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनो, तुम्हाला कोणासमवेत जायचे हे ठरवण्याची हीच वेळ आहे. धर्मपरायण सत्यनिष्ठ सनातन संस्थेच्या बाजूने यायचे कि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व यांचा बुरखा पांघरून नक्षलवाद्यांना समर्थन करायचे ? धर्माचे रक्षण करणार्‍यांचेच धर्म अर्थात ईश्‍वर रक्षण करतो, धर्माच्या बाजूने लढणार्‍यांचा विजय निश्‍चित आहे, हे लक्षात घ्या आणि सनातन संस्थेच्या पाठीशी खंभीरपणे उभे रहा.

राजकारणी आणि पुरो(अधो)गामी संघटनांची भ्रष्टाचाराची प्रकरणे
उघड केल्याने सनातन संस्थेवर बंदीचे षड्यंत्र ! – महेश पवार, धर्माभिमानी

कोणताही राष्ट्रभक्त कधीही आतंकवादी कृत्य करत नाही. सनातन संस्था लोकांना धर्मशिक्षण देऊन जागृत करत आहे, तर राजकारण्यांची आणि पुरो(अधो)गामी संघटना यांची विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करत आहे. सनातन संस्थेवर बंदी आणून भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाज हे पुरो(अधो)गामी दाबू पहात आहेत. सनातन संस्थेवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी संघटित होऊन विरोध करण्यास सिद्ध व्हा.

भिवंडी येथील आंदोलनात स्वामी गंभीरानंद आश्रमाचे श्री. विनोद मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. त्रिलोकचंद जैन, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. पोलीस ‘सनातन सत्यदर्शन’ हा सनातनची सत्य बाजू मांडणारा विशेषांंक मागूून घेत होते.

२. गोपनीय खात्यातील एका अधिकारी म्हणाले, ‘‘तुमचे हिंदुत्वाचे कार्य चांगले आहे. त्याविषयी आम्ही काही बोलू वा करू शकत नाही.’’

३. स्वाक्षरी देण्यासाठी अनेक जण स्वतःहून पुढे येत होते.

 

कल्याण

कल्याण येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला उपस्थित धर्माभिमानी

नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी केंद्र सरकाने कठोर
कायदा करण्याची आवश्यकता ! –  डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

लोकशाही मार्गाने निवडून आलेले मोदींचे सरकार पडण्याचा, तसेच मोदींची हत्या करण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचे तपासातून कळले आहे, अशा नक्षलवादी लोकांना या देशात रहाण्याचा हक्क नाही. यांचे समर्थन करणारे नेते, अधिवक्ता, विचारवंत यांची कसून चौकशी करावी, नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी केंद्र सरकाने कठोर कायदा करण्याची आज आवश्यकता आहे.

पीतपत्रकारितेमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची
विश्‍वासार्हता अल्प होत चालली आहे ! – विजय ठाकरे, पत्रकार

हिंदुत्वनिष्ठांना अटक केली की ‘हिंदु आतंकवाद’ म्हणून राळ उठवणारी प्रसिद्धमाध्यमे ज्या वेळी नक्षलवादी पकडले जातात; त्या वेळी मात्र ‘तथाकथित नक्षलवादी’ असा शब्द वापरतात. वृत्तवाहिन्या चर्चासत्रे प्रसारीत करून नसलेले हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसतात; पण त्याच वाहिन्या नक्षलवादी कसे चांगले आहेत, हे मांडण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडतांना आपण पहातो. पीतपत्रकारितेमुळे लोकशाहीच्या या स्तंभाची विश्‍वासार्हता अल्प होत चालली आहे.

हिंदु धर्म ईश्‍वरनिर्मित आहे, हे धर्मावर आघात
करणार्‍या प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे ! – दयानंद पाटील, धर्माभिमानी

हिंदु धर्म हा आदर, प्रेम, संस्कार आणि संस्कृती शिकवणारा धर्म आहे, त्यामुळे  हिंदूंना आतंकवादी म्हणणे चुकीचे आहे. हा प्रसिद्धी माध्यमांनी सिद्ध केलेला शब्द आहे. हिंदु धर्माला नष्ट करण्याचे मोठे षड्यंत्र असलेतरी तो नष्ट होऊ शकत नाही; कारण तो ईश्‍वराने निर्माण केलेला आहे हे धर्मावर आघात करणार्‍या प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणी नजरकैदेत असलेल्यांच्या घरी जाऊन समर्थन
करणार्‍या राजकारण्यांवर कडक कारवाई करायला हवी ! – गणेश पवार, धर्माभिमानी

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश मिळाल्यानंतर काही राजकीय नेत्यांनीही नजरकैदेत असलेल्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली. हे आमचे दुर्दैव असून या सर्वांवरही नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याविषयी कडक कारवाई करायला हवी.

कल्याण येथील आंदोलनांच्या वेळी बजरंग दल, श्रीराम हिंदू सेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदि संघटना सहभागी झाल्या होत्या.

क्षणचित्रे

१. लोक स्कायवॉकवर उभे राहून विषय ऐकत होते.

२. ‘सनातन सत्यदर्शन’ हा सनातन संस्थेचा विशेषांंक लोक मागून वाचत होते.

३. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

४. शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनाविषयी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात