हिंदु धर्माचे तेजस्वी कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र विफल ठरेल ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, वारकरी संप्रदाय

(डावीकडून) श्री. राहुल कोल्हपूरकर, ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज आणि श्री. पराग गोखले

सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून सनातन संस्थेची अपर्कीती चालू आहे. यातूनच समाजाची दिशाभूल करून अन्वेषण भरकटवले जात आहे. यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि संघटना यांनी संघटित व्हायला हवे. या समवेत सनातनवर होणार्‍या खोट्या आरोपांचा पर्दाफाश करून वस्तुस्थिती समाजासमोर आणावी. यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला षड्यंत्राचे ‘लक्ष्य’ करण्यात आले. हिंदु धर्माचे तेजस्वी कार्य करणार्‍या सनातन संस्थेला खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याचे षड्यंत्र विफल ठरेल, असे उद्गार ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी येथे काढले. ८ सप्टेंबरला येथील गोडोली नाक्याजवळील ‘लेक व्ह्यू’ उपाहारगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसंवाद सभे’त ते बोलत होते. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ, पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. संस्थेत भगवंताची भक्ती, साधना आणि राष्ट्रप्रेम शिकवले जाते. त्यामुळे पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून बंदी आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न आपण संघटितपणे मोडून काढायला हवेत. वारकरी संप्रदाय याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाही.’’

या वेळी सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे म्हणाले, ‘‘नालासोपारा कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नाही. असे असतांना ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदींकडून केली जात आहे.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता श्री. गोविंद गांधी, हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि अधिवक्ता श्री. दत्ता सणस, भाजपचे श्री. अभय घोडके, विश्‍व हिंदू परिषदेचे सातारा शहर मंत्री श्री. जितेंद्र वाडेकर आणि श्री. राहुल मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सारंग कोल्हापूरे, गोरक्षक श्री. विकास चव्हाण, योग वेदांत सेवा समितीचे श्री. सतीश केसकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मोहनानंद महाराज, सेवानिवृत्त कॅप्टन विजयकुमार मोरे, व्यसनमुक्ती युवक संघाचे श्री. धनंजय शिंदे, सातारा पेन्शन संघटनेचे श्री. शिवाजी निकम, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शेखर जाधव यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. रजत नाईक आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सनातनचा तेजस्वी धर्मप्रसार सहन न झाल्यानेच विरोध ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धर्म न मानणार्‍या पुरोगाम्यांना सनातनचा तेजस्वी धर्मप्रसार सहन होत नाही, हे सनातनला होणार्‍या विरोधाचे खरे कारण आहे. धर्माला विरोध आणि अल्पसंख्यांक यांचे राजकारण करणार्‍यांसाठी सनातन संस्था हे ‘सोपे लक्ष्य’ (सॉफ्ट टार्गेट) आहे.

सातारा येथे झालेल्या जनसंवाद सभेचे फेसबूक लाईव्हद्वारे प्रक्षेपण केले. त्याद्वारे ही सभा १ सहस्रांहून धर्माभिमान्यांनी पाहिली आणि ६ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी शेअर केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात