‘राष्ट्र आणि धर्म रक्षण’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे ! – संजय राठोड, महसूलमंत्री, शिवसेना

डावीकडून श्री. दत्तात्रय फोकमारे, महसूलमंत्री श्री. संजय राठोड, सर्वश्री रवी देशपांडे, सुधाकर कापसे, कैलास सुरसे

यवतमाळ – राष्ट्र आणि धर्म रक्षण हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आमचे कार्य सनातन संस्था करत आहे, आम्हाला अभिमान आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा शिवसेनेचे नेते श्री. संजय राठोड यांनी केले.

‘राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य निःस्वार्थीपणे करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्यात येऊ नये आणि श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची संकल्पना राबवू नये’, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते श्री. संजय राठोड यांना ७ सप्टेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. यवतमाळ शहरातील कृत्रिम हौदामुळे होणारी श्री गणेशाची विटंबना थांबवण्यासाठी श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता दोन विहिरी उपलब्ध करून देऊ, तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करू, असे आश्‍वासन श्री. राठोड यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.  या वेळी आमदार श्री. राठोड यांनी समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत विस्तृत चर्चा केली. ‘समलैंगिकता’ या विषयावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर श्री. राठोड यांनी खेद व्यक्त करून ‘त्यामुळे संस्कृती नष्ट होणार आहे’, असे ते या वेळी म्हणाले.

निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कैलास सुरसे आणि श्री. दत्तात्रय फोकमारे, तसेच सनातन संस्थेचे श्री. रवि देशपांडे आणि श्री. सुधाकर कापसे हे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात