सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांची फोंडा येथे निषेध फेरी !

नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि
हिंदुत्वनिष्ठांना हिंदु आतंकवादी म्हणायचे, हीच आजची धर्मनिरपेक्षता ! – डॉ. मनोज सोलंकी

फोंडा – नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरणी गेल्या महिनाभरात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदी करत आहेत. काही प्रसारमाध्यमे सनसनाटी आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून हिंदु आतंकवादाचा ढोल बडवत आहेत; मात्र दुसरीकडे कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना सोयीस्करपणे पाठीशी घातले जात आहे, हा दुटप्पीपणा आहे. हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना हिंदु आतंकवादी म्हणणार्‍यांचा आणि नक्षलवाद्यांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून उदात्तीकरण करणार्‍यांचा खरा चेहरा समोर आला आहे. हिंदूंनो, तुम्हाला कोणासमवेत जायचे, हे ठरवण्याची हीच वेळ आहे ! धर्मपरायण सत्यनिष्ठ सनातन संस्थेच्या बाजूने यायचे कि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व यांचा बुरखा पांघरून नक्षलवाद्यांचे समर्थन करायचे ?, असा प्रश्‍न करत धर्माचे रक्षण करणार्‍यांचेच धर्म अर्थात ईश्‍वर रक्षण करतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी या वेळी केले. नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ आणि सनातन संस्थेवर अन्याय्य मागणीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी फोंडा येथे ९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी फोंडा शहरात एका निषेधफेरीचे आयोजन केले होते. फेरीचे रूपांतर सभेत झाल्यानंतर समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी उपस्थितांना संबोधित करत होते.

 

हिंदुत्वनिष्ठांच्या फोंडा येथील निषेध फेरीनंतरच्या
सभेत मान्यवरांनी मांडलेले विचार आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अशी झाली फेरी !

फेरीला राजीव गांधी कला मंदिर, बेतोडा रोड, फोंडा येथून शंखनाद करून प्रारंभ झाला. यानंतर फेरी वरचा बाजार, दादा वैद्य चौक या मार्गाने गेल्यानंतर तिचे तिस्क, फोंडा येथील कॉमर्स सेंटरजवळ एका सभेत रूपांतर झाले. या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदी म्हणणार्‍यांचाही निषेध करण्यात आला. तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लक्ष्य करणार्‍या षड्यंत्राचे अन्वेषण करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. हिंदूंना एक न्याय आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना वेगळा न्याय का ? या सर्वांवरही देशद्रोही नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याविषयी कडक कारवाई करणारा कायदा बनवावा अन् शहरी नक्षलवादासह देशभरात रुजलेला नक्षलवाद संपवण्यास सैन्य आणि पोलीस यांना सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी केले. फेरीला ४५० हिंदूंची उपस्थिती होती.

फेरीमध्ये सहभागी संघटना

हिंदवी स्वराज्य संघटना, राजस्थान राजपूत समाज, शिवयोद्धा संघटना, साखळी शिवप्रेमी संघटना, मये भूविमोचन कृती समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, पतंजली योग समिती, शिरसई गुढीपाडवा समिती; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; महिला स्वयंसाहाय्य गट

फेरीमध्ये सहभागी महनीय व्यक्ती

अधिवक्ता सर्वश्री सत्यवान पालकर, सतीश बोरकर (हिंदवी स्वराज्य संघटना), वीरसिंग सौदा (राजस्थान राजपूत समाज), माधव विर्डीकर (शिवयोद्धा संघटना), उमेश पाटील, (साखळी शिवप्रेमी संघटना), सखाराम पेडणेकर (मये भूविमोचन कृती समिती), धर्माभिमानी श्रीधर मणेरीकर,  साईनाथ चोडणकर (पतंजली योग समिती), पवन शेट्टी, सत्यवान म्हामल (शिरसई गुढीपाडवा समिती), राजाराम मालवणकर (रा.स्व.संघ), सौ. हेमश्री गडेकर (महिला स्वयंसाहाय्य गट), राजेंद्र केरकर, उद्योजक, मडकई.

क्षणचित्र

सभेचे मुसलमान व्यक्तींनी चित्रीकरण केले. तसेच वृत्तसंकलन करणार्‍याच्या मागे उभे राहून बातमीचेही निरीक्षण केले. या व्यक्तींनी श्री. रमेश नाईक यांचे भाषण जवळून चित्रित केले. (अशीच फेरी मुसलमानांनी काढली, तर एकतरी हिंदु अशा प्रकारे त्या फेरीचे चित्रीकरण करण्यास धजावेल का ? – संपादक)

हिंदूंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासठी सनातन संस्था टिकली पाहिजे ! – अधिवक्ता सत्यवान पालकर, सावईवेरे

शेकडो वर्षांपूर्वीपासून हिंदुस्थान आणि हिंदु धर्म यांना संपवण्याचे कारस्थान चालू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तरी हे कारस्थान चालूच आहे. राजकारण्यांना केवळ मते दिसतात. राजकारणी हिंदूंना खुळे समजतात. देशात धर्मांधांनी हैदोस माजवला असतांना त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. उलट सनातन संस्थेसारख्या धर्माभिमानी संस्थेवर बंदी घालण्यासाठी धडपड करतात. अशा सर्वपक्षीय राजकारण्यांचा मी निषेध करतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक आचरण करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. हिंदु धर्मियांचे हेच हक्क अबाधित ठेवण्यासाठी सनातन संस्था प्रयत्न करत आहे. तरीही सनातन संस्थेला संपवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. वास्तवात हे सनातन संस्थेला संपवण्याचे कारस्थान नसून हिंदूंना संपवण्याचे कारस्थान आहे; म्हणून हिंदूंचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी सनातन संस्थेचे अस्तित्व टिकले पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी प्राण अर्पण करण्याची सिद्धता ठेवली पाहिजे.

या वेळी अधिवक्ता सत्यवान पालकर यांनी अधिवक्ता म्हणून सनातन संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

…मग शिखांची हत्या करणार्‍या काँग्रेसवर बंदी का नको ? – रमेश नाईक, माजी गोवा राज्य प्रमुख, शिवसेना

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या काँग्रेसने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लक्षावधी निरपराध शिखांची हत्या केली. मग काँग्रेसवर बंदी का आणू नये ? याचे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि इतर काँग्रेसी नेत्यांनी द्यावे. ज्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केंद्राला पाठवला आहे, अशी संस्था गोव्यातील ४ शहरात रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मोर्चे काढते, तरी सरकार आणि पोलीस त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीत. उलट काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स त्यांना पाठिंबा देतात. देशात कुठेही हत्या झाली की, सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. उद्या मला अटक केली, तरी सनातनच्या साधकाला अटक केली म्हणून आवई उठवतील; पण मला त्याची पर्वा नाही. मी कडवट जाज्वल्य हिंदुत्वनिष्ठ आहे. असाच कडवटपणा हिंदूंनी आता बाळगला पाहिजे. हिंदूंना सहिष्णुतेची सद्गुण विकृती जडली आहे. अशा सद्गुणाने अफझलखानासारख्यांचे मनपरिवर्तन होत नसते. म्हणूनच अशा अफझलखानांना ठेचून काढण्यासाठी छत्रपती शिवरायांची नीतीच अवलंबावी लागते. आज सनातन संस्थेला विरोध करणार्‍यांनी कधीतरी सनातनचा आश्रम बघावा. त्या ठिकाणी विदेशातील नागरिक येऊन हिंदु धर्माची शिकवण घेत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. अशा संस्थेवर बंदी आणून हिंदूंना तिसरा नेत्र उघडायला लावू नका. आता हिंदू जागृत होत आहेत, हे राज्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे.

दंगली माजवणार्‍या धर्मांधांवर नाही; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या
सनातनवर बंदीची मागणी केली जाते ! – महेश पारकर, हिंदुत्वनिष्ठ साहित्यिक, शिरोडा

हिंदूंवर फार पूर्वीपासून अन्याय होत आहेत. परकियांच्या आक्रमणामुळे पूर्वीच्या अखंड हिंदुस्थानचे तुकडे झाले. त्या काळातही आमच्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून हिंदु धर्म टिकवून ठेवला. हिंदूंवरील अन्याय अद्याप थांबलेले नाहीत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेची स्थापना झाली असून या संस्थेच्या छत्राखाली हिंदू संघटित होऊ लागले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही देश किंवा समाज यांना तोडण्याची शिकवण दिली नाही. याउलट त्यांनी स्थापलेली सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना एकत्र आणत आहे. त्यांच्यात राष्ट्राभिमान जागृत करत आहे; मात्र ४-५ साम्यवादी विचारसरणीच्या साहित्यिकांच्या हत्येचा ठपका ठेवून सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. संकुचित वृत्तीच्या साम्यवाद्यांच्या तालावर नाचणारे सरकार आणि पोलीस सनातनवर बंदी आणण्याची धडपड करत आहेत. या विरोधकांनी कधी सनातनचा आश्रम बघितला आहे का ? हिंदुस्थानात धर्मांधांनी दंगली माजवल्या, पण त्यांच्यावर कोणी बंदीची मागणी करत नाही. उलट सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या विरोधात हिंदूंनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत झाले पाहिजे. याच प्रयत्नांतून वर्ष २०२३ मध्ये हिंदु  राष्ट्र स्थापन होईल, याची खात्री बाळगा.

स्वत:ची पापे लपवण्यासाठीच पुरोगामी, राजकीय पक्ष आणि
अंधश्रद्धावाले यांची सनातनवर बंदी घालण्याची मागणी ! – तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था

सनातन संस्था ही एक अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. याच जन्मात आनंदप्राप्ती म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती करून घेण्यासाठी समाजाला गुरुकृपायोगानुसार साधना सांगून ती करवून घेण्याचे ईश्‍वरी कार्य करणारी संस्था वर्ष १९९८ पासून करत आहे. अशा संस्थेवर हत्या करणे, अनधिकृत शस्त्रसाठा करणे, बाँबस्फोट करणारी संस्था अशी ओळख करण्याचे हास्यास्पद प्रयत्न भ्रष्टाचारी राजकारणी, राजकीय पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, संभाजी ब्रिगेड आदी करत आहेत. सनातन संस्था ही एक छोटी संस्था असल्याने तिला लक्ष्य केले जात आहे. स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बिनबुडाचे, हास्यास्पद आणि बालीश आरोप करणारे पुरोगामी, राजकीय पक्ष, अंधश्रद्धावाले सनातनवर बंदी घाला, अशी असंविधानिक मागणी करत आहेत.

विशेष – फेरीनंतर झालेल्या सभेच्या वेळी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यांना उद्देशून श्री. रमेश नाईक म्हणाले, ही हिंदूंची सभा आहे. या ठिकाणी कोणीही हिंसा करणार नाही. ती हिंदूंची वृत्तीच नाही. त्यामुळे इतका फौजफाटा ठेवण्याची आवश्यकता नाही, याची खात्री मी देतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात