(म्हणे) ‘आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून शासन सनातन्यांना साहाय्य करत आहे !’

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सनातन संस्थेवर एकही गुन्हा नाही; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर हत्या, खंडणी, बलात्कार, कोट्यवधींचे घोटाळे आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे गुन्हेगार कोण आहे, हे जनता चांगली ओळखून आहे !

मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) – आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड हे हिटलिस्टवर आहेत. त्यांच्या घराची रेकी करण्यात आली होती, असे सांगितले असतांनाही राज्य गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाचा हा गलथानपणाचा कारभार आहे कि सनातन्यांना साहाय्य करणे हा उद्देश आहे ?, याविषयी माझ्यासहित अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे, असे पत्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ५ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. (जितेंद्र आव्हाड यांचे नाव आरोपपत्रामध्ये घुसडल्यावरून न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते, हे धनंजय मुंडे यांना ठाऊक नाही का ? – संपादक)

या पत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, आमदार आव्हाड यांना उघडपणे धमक्या आल्या आहेत. सांगली आणि पुणे येथे त्यांच्यावर जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. अशा घटना मागील अनेक दिवसांपासून घडत असतांना शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही किंवा एक विधानसभा सदस्य म्हणून त्यांची साधी विचारपूस करण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही. (जितेंद्र आव्हाड यांनी आतंकवादी इशरत जहाँची भलावण केली तेव्हा त्यांची कानउघाडणी करण्याचे सौजन्य धनंजय मुंडे यांनी दाखवले होते का ? – संपादक) आमदार आव्हाड यांच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व शासनावर राहील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात