सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी विविध वार्तापत्रे आणि वृत्तवाहिन्या रात्रंदिवस गदारोळ करत असतांना तिचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले त्याविषयी एक शब्द का बोलत नाहीत ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वरील प्रश्‍न अनेक जणांना पडतो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

१. समाजाची सात्त्विकता वाढावी आणि येणार्‍या पिढीला धर्म शास्त्रीय भाषेत कळावा; म्हणून माझे प्रयत्न चालू असतात. प्रसिद्धीमाध्यमांना सनातन संस्थेची जी काही भूमिका समजून घ्यायची असते, ती मांडण्यासाठी सनातन संस्थेचे प्रवक्ता सदैव सिद्ध असतात. त्यामुळेही मी स्वतः भूमिका मांडणे आवश्यक नाही.

२. माझे प्रयत्न पुढील प्रकारचे आहेत. आतापर्यंत धर्म आणि साधना या विषयांवर मी संकलित केलेल्या देश-विदेशांतील विविध भाषांतील ३१० ग्रंथांच्या ७२ लक्षांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या असल्या, तरी ७००० हून अधिक ग्रंथांचा मजकूर माझ्या संग्रही आहे. पुढच्या पिढ्यांना त्यांचे संकलन करतांना साहाय्य व्हावे; म्हणून अधिकाधिक ग्रंथांचा मजकूर थोडाफार संकलित करण्यात माझा दिवसभरातील बहुतेक सर्वच वेळ जातो.

या आध्यात्मिक ग्रंथांसोबत देवतांची सात्त्विक चित्रे अन् मूर्ती, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या ध्वनीचित्रफिती इत्यादी अनेक विषयांच्या संदर्भात कार्य प्रलंबित आहे.

सनातनवरील बंदीचा प्रश्‍न तात्कालिक आहे. या विषयाला महत्त्व देण्याऐवजी वयाच्या ७६ व्या वर्षी प्रकृती ठीक नसतांना माझ्या वरील कार्यांना महत्त्व देणे मला योग्य वाटते.

३. अनेक संतांनीही माझ्या कार्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. सनातनचे कार्य धर्माचे, म्हणजेच ईश्‍वराचे पवित्र कार्य आहे. तो त्या कार्याची निश्‍चित काळजी घेईल. पूर्वीच्या काळी संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्या वेळी संत तुकाराम महाराज निश्‍चल राहून पांडुरंगाच्या स्मरणात तल्लीन राहिले. निंदकांनी बुडवलेले अभंग पाण्यावर तरंगण्याची किमया भगवंताने करून दाखवली. त्याचप्रमाणे सध्याच्या स्थितीतही भगवंताला सनातनचे रक्षण करायचे असेल, तर सनातन संस्थेवर बंदी घालून तिला संपवण्याचा विरोधकांनी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना ते शक्य होणार नाही.

वरील सर्व कारणांमुळे सनातन संस्थेवर बंदी येण्याविषयी मी एक शब्द बोलत नाही. एवढेच नाही, तर त्याचा विचारही करत नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले