असत्य वार्तांकन करणारी प्रसारमाध्यमे !

राजकारण्यांप्रमाणे ‘कारवाई करण्यात आलेले सनातनचे साधकच’ या पूर्वग्रहाने वृत्ते देणारी माध्यमे !

नालासोपारा प्रकरणी अटक झालेले हिंदुत्वनिष्ठ हे सनातनचेच साधक आहेत, असे गृहित धरूनच माध्यमे आरंभीचे ३ दिवस वार्तांकन करत होती ! ‘वैभव राऊत, अविनाश पवार आणि श्रीकांत पांगारकर यांच्या स्वतःच्या संघटना आहेत, ते सनातनचे साधक नाहीत’, असे वारंवार सांगितल्यावरही ‘ते सनातनशी संबंधित आहेत, त्यामुळे संशयाची सुई सनातनकडेच जाते’, असे सांगण्यात येत होते. यातील कळसकर, अंधुरे, सुरळे बंधू आणि रेगे यांची नावेही सनातनने प्रथमच ऐकली !

 

सनातनने स्वत:ची सत्य बाजू सांगितल्यावर ‘सनातनने हात झटकले’ असा मिथ्यारोप करणारी खोडसाळ माध्यमे !

वरील सूत्र हे पहिल्या दिवसापासून सर्व माध्यमांमध्ये आणि प्रसिद्धीपत्रकांद्वारे स्पष्ट करूनही माध्यमे १८ दिवसांनंतरही ‘तुम्ही हे आधीच का सांगितले नाही ?’, ‘सनातनने हात झटकले’ अशा प्रकारची हास्यास्पद विधाने करत होती. सनातनच्या पत्रकार परिषदेनंतर ‘टीव्ही ९ मराठी’ने अशी तळपट्टी देणे चालू केले.

‘एबीपी माझा’ वाहिनीवर सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना ‘कोर्टमार्शल’ या कार्यक्रमात ‘तुम्ही १८ दिवसांनंतर पत्रकार परिषदेत ‘ते साधक नाहीत’, असे का सांगत आहात ?’ असा हास्यास्पद प्रश्‍न विचारला ! त्यावर श्री. राजहंस यांनी प्रथम दिवसापासूनच आम्ही हे सांगत असल्याचे आणि प्रसिद्धीपत्रके प्रसिद्ध केल्याचे स्पष्ट केले !

 

माध्यमांचे ‘सोर्स’ (सूत्रे) कोण ?

सनातन संस्थेवर केले जाणारे सर्व आरोप हे ‘एटीएस्’ आणि ‘सीबीआय’ या अन्वेषण यंत्रणांकडून अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हणजेच ‘सूत्रांकडून मिळालेल्या माहिती’वरून केले जात आहेत, असे वृत्तवाहिन्या सांगत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते की, या प्रकरणी कुठल्याही विशिष्ट संघटनेचे नाव घेतलेले नाही. पोलीस तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्‍न निर्माण झाला की, या सर्व बातम्यांच्या मागे नेमके कोणते ‘सूत्र’ (‘सोर्स’) आहे ?

 

वृत्तवाहिन्यांकडून काही तरी खुसपट काढून त्यांना ‘कट्टरवादी’, ‘आतंकवादी’ दाखवण्याचा आटापिटा !

‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीकडून गोरक्षक श्री. वैभव राऊत जनप्रबोधन करत असतांना त्यांची ध्वनीचित्रमुद्रित केलेली जुनी चलचित्रे (व्हिडिओ) स्वरूपात दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात येत होती. हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेची वृत्ते देतांना जणू ते ‘आतंकवादी’ आहेत, ‘हिंदु अतिरेक्यांना अटक’, ‘हिंदु कट्टरवाद्यांना अटक’, अशा आशयाचे वृत्तांकन होत होते; मात्र नक्षलवाद्यांचे अटकसत्र चालू झाल्यावर ‘एबीपी माझा’चे निवेदक प्रसन्न जोशी यांनी त्यांचा ‘कथित नक्षल समर्थक’ असा उल्लेख केला !

 

सनातनच्या विरोधात काही ‘सनसनाटी’ मिळत नसल्याने ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी कशा प्रकारे कपोलकल्पित कथा रचून सनातनच्या साधकांची अपकीर्ती करते, याचे हे बोलके उदाहरण !

आतापर्यंत झालेल्या अटकसत्रांनंतर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. विवेक नाफडे, तसेच इतर संशयित हे सध्या अंडरग्राऊंड (भूमीगत) आहेत. ते देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे धादांत खोटे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने २६ ऑगस्ट या दिवशी दिले.

(या पूर्वी २ दिवस आधी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वाहिनीवर ‘अभय वर्तक कुणाला भेटायला जातात ?’ असे संबोधून त्यांचे वृत्त दिले होते.)

 

न्यायाधिशाच्या भूमिकेतून सनातनला आरोपी घोषित करून तिची मानहानी करणारी माध्यमे !

एकाही यंत्रणेने अधिकृतपणे सनातनचा संबंध असल्याचे सांगितलेले नसतांना तळपट्ट्या, वृत्त आणि चर्चासत्रे या माध्यमांतून मराठी वृत्तवाहिन्यांनी सनातनची मोठ्या प्रमाणावर अपकीर्ती करून मानहानी केली. ही सनातनच्या सहस्रो साधक आणि हितचिंतक यांच्यासाठी वेदनादायी होती. यामुळे सनातनचे सहस्रो साधक आणि लाखो हितचिंतक यांचीही समाजात मानहानी झाली.

 

‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीवरील सनातनविषयीच्या ‘मनघडण कहाणी’तील काही वाक्ये !

१. पत्रकार, पुरोगामी यांच्यावर बदनामीचे खटले टाकणे हा सनातनच्या रणनीतीचा भाग आहे !

२. पालकांच्या तरुण मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारी होत्या, ते पालक या आश्रमाबाहेर ताटकळत असायचे. या तक्रारी आल्यावर या तरुणांची परस्पर लग्न लावून दिली !

३. सनातन दरवर्षी कडवे हिंदु धर्म संमेलन भरवते. तिथे धर्माला विरोध करणार्‍यांची नावे पुकारून टार्गेट ठरवली जातात !

४. धर्मादाय आयुक्तांकडे संस्था नोंदणीकृत असतांना त्याची चौकशी करण्याची हिंमत धर्मादाय आयुक्त दाखवत नाही !

५. या आश्रमात कुणालाच प्रवेश नाही. गावकर्‍यांनाही या आश्रमात काय चालते याचा पत्ता लागत नाही. इथला सगळा कारभार संशयास्पद आहे. सनातन प्रभात मुख्यालयात संस्थेच्या ध्येयधोरणाचे वेळापत्रक आहे. आता कुणालाही सनातनमध्ये प्रवेश नाही. नोंदणी काही वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. आता चालू आहे, दुर्जनांचा नाश करण्याचा टप्पा !

६. सनातनमध्ये ब्रेन वॉशिंग चालते कि त्यांना उच्च जीवनाचा मार्ग दाखवला जातो, हे शोधण्याचे आव्हान तपासयंत्रणांसमोर आहे !