चिपळूण येथे सनातनबंदीच्या विरोधात निषेध मोर्चा !

‘आम्ही सारे, सनातन सनातन’ या घोषणेने चिपळूण शहर दुमदुमले !

सनातनवरील बंदीचा कुटील डाव समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
छातीचा कोट करून हाणून पाडतील ! – वारकरी संपद्रायाची चेतावणी

मोर्च्याला ५५० हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती ! निषेध मोर्चा शिस्तबद्धरित्या पार पडला !

चिपळूण – सनातन संस्था नि:स्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रसार करून हिंदु धर्मियांना खर्‍या अर्थाने जागृत करत आहे. हिंदूंमध्ये राष्ट्रप्रेम वृद्धींगत करत आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी सनातनला अपकीर्त करून सनातनवर बंदी लादण्याचा तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी यांचे षड्यंत्र दिसून येत आहे. सनातनवर बंदी आणण्याचा कुटील डाव समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना छातीचा कोट करून हाणून पाडतील, अशी चेतावणी वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी आज ६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनबंदीच्या विरोधातील निषेध मोर्चाप्रसंगी दिली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांवर अन्वेषण यंत्रणांकडून होणारी अन्याय्य कारवाई आणि सनातन संस्थेच्या बंदीच्या मागणी विरोधात चिपळूण येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा पार पडला. या मोर्च्यामध्ये वारकरी संप्रदाय, विविध देवस्थानांचे विश्‍वस्त, शिवसेना, मनसे, विश्‍व हिंदु परिषद, योद्धा प्रतिष्ठान, चिपळूण तालुका नाभिक संघटना, राजे सामाजिक प्रतिष्ठान, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदी संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

सनातन बंदीचे षड्यंत्र हाणून पाडू ! – ह.भ.प. अभयमहाराज
सहस्रबुद्धे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे तेजःपुंज देवमाणूस असून धर्माचे जागरण करून हिंदु धर्म हा जगाचा गुरु व्हावा, या उद्देशाने अहोरात्र झटत आहेत. अशा तपस्वी वयोवृद्ध संतांची चौकशीची मागणी, तसेच हिंदु धर्माचे उत्थान करण्यात सनातन संस्था अग्रणी असल्यानेच सनातन बंदीची मागणी तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी करत आहेत. हिंदु धर्म संपवण्याचे हे षड्यंत्र आहे, ते आम्ही सर्व संप्रदाय, सर्व मंदिरांचे प्रमुख आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मिळून हाणून पाडू. त्यासाठी प्रसंगी छातीची ढाल करून सनातनच्या पाठीशी आम्ही उभे राहू.

… प्रसंगी रस्त्यावर उतरून शिवसेना ठामपणे
विरोध करील ! – प्रतापराव शिंदे, चिपळूण तालुकाप्रमुख, शिवसेना

सनातन सातत्याने देशहिताचे आणि हिंदुत्व रक्षणाचे कार्य करते. असे असूनही हिंदूबहुल देशात राष्ट्रहित आणि धर्महित जपणार्‍या सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात मोर्चे काढावे लागणे, हे दुर्दैवी आहे. सनातनचे साधक हे स्वत:च्या आयुष्याचा बहुमूल्य वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सातत्याने देत आहेत. संपूर्ण हिंदु समाजाला ते जागृत करत आहेत, हे अभिमानास्पद आहे. शिवसेनेने सतत हिंदुत्वाची कास धरली आहे. सनानतसारख्या धर्मप्रेमी संघटनेच्या पाठीशी रहाण्याचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांचे आम्हाला आदेशच आहेत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी आणि सनातन संस्थेवर बंदीचा घाट घातला गेल्यास त्याला प्रसंगी रस्त्यावर उतरून शिवसेना ठामपणे विरोध करील. सनातनच्या पाठीशी चिपळूण तालुक्यातील सर्व शिवसैनिक ठामपणे उभे आहेत.

शाम मानव यांची ‘नार्को टेस्ट’ केल्यास डॉ. दाभोलकर यांची हत्या कोणी केली
याचे सत्य बाहेर येईल ! – ह.भ.प. भगवान कोकरे महाराज, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ

सोने जेवढे जाळले जाते तेवढी त्याला झळाळी येते, त्याप्रमाणे खर्‍या हिंदूंची परीक्षा संघर्ष केल्यानंतरच होते. सनातनची सत्याची बाजू असूनही सनातनसारख्या निष्पाप साधकांचा छळ केला जात आहे. तो त्वरित थांबवण्यासाठी सत्ताधार्‍यांनी पुढाकार घ्यावा. येत्या वारकरी महामंडळाच्या अधिवेशनात १४ वारकरी संघटना एकत्र येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना ‘सनातनवर बंदी लादू नये’, अशी मागणी करणारा ठराव करून पाठवणार आहोत. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठांचे सरकार येण्यात सनातनचा सिंहाचा वाटा आहे, हे त्यांनी विसरू नये. नास्तिकतावादी तथाकथित पुरोगामी यांच्या षड्यंत्राला बळी पडून राष्ट्रप्रेमी सनातनवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सत्तेच्या खुर्चीवर खाली खेचण्यासही आम्ही मागेपुढे पहाणार नाही.

सनातन संस्थेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत ! – राजेंद्र घाग, खेड तालुका उपाध्यक्ष, मनसे

हिंदूंच्या सण आणि उत्सवांच्या वेळी नियम लावून त्यांना बंधने घातली जातात; मात्र दिवसातून ५ वेळा बांग देणार्‍यांना मात्र सूट दिली जाते. दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी जशी मनसे ठामपणे उभी राहिली आहे, तशीच हिंदूंना जागृत करून संघटित करणार्‍या सनातन संस्थेच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहिली. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना चर्चासत्रात वृत्तवाहिन्या पक्षपाती वागणूक
देत असल्याने समाजासमोर सत्य बाहेर येत नाही ! – गजानन दीक्षित, विश्‍व हिंदु परिषद, गुहागर

संपूर्ण देशभरातील संत मंडळी, शंकराचार्य हे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचे कौतुक करतात. असे असतांना एका खोलीत बसून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य न अभ्यासता सनातन संस्थेच्या विरोधात एकांगी चर्चा घडवून आणणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांचा आम्ही जाहीर निषेध करतो. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करणारे कार्यक्रम वृत्तवाहिन्या स्वतःच्या वाहिनीचा ‘टिआरपी’ वाढवण्यासाठी करत आहेत. हिंदुत्वनिष्ठांना चर्चेसाठी बोलावून त्यांना जाणीवपूर्वक पक्षपाती वागणूक दिली जात आहे. त्यामुळे समाजासमोर सत्य जात नाही.

सनातन संस्थेचे साधक कोणतेही गैरकृत्य करणार नाहीत, याची
आम्हाला खात्री आहे ! – ह.भ.प. गणपत येसरे महाराज, सचिव, खेड तालुका वारकरी संघटना

प्रत्येक हिंदु हा सनातन आहे, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यायला हवे. सनातनच्या प्रत्येक साधकाची तळमळ आणि कार्य पाहिल्यास त्यांचा जेवढा उदोउदो करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी आम्हाला सनातन संस्था हाक मारेल तेव्हा निःसंकोचपणे आम्ही महाराष्ट्रातील सर्व वारकरी एकजूटीने त्यांच्या पाठीशी उभे राहू.

‘सत्यमेव जयते’ या वचनावर आमचा पूर्ण विश्‍वास असून अखेर सत्याचाच
विजय होणार आहे, याची आम्हाला निश्‍चिती आहे ! – परेश गुजराथी, सनातन संस्था

नालासोपारा येथील घटनेचा संदर्भ लावून सनातनवर बंदी घालण्याची मागणी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरोगामी हे करत आहेत. हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो, हा अन्याय आहे. खरे तर या प्रकरणाचा तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे. आतंकवादविरोधी पथक आणि राज्याचे गृहमंत्री यांनी या प्रकरणात कोणत्याही संघटनेचे नाव पुढे आलेले नाही, हे स्पष्ट केले आहे; मात्र वृत्तवाहिन्या सनातनच्या साधकांना जणू गुन्हेगार असल्याचे वातावरण निर्माण करून सनातनची अपकीर्ती करत आहेत. वृत्तवाहिन्यांचे निवेदक स्वतःला न्यायाधिशाची भूमिकेत राहून न्यायव्यवस्थेचा आणि पर्यायाने लोकशाहीचा अवमानच करत आहेत.

ज्या ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अन्याय होईल त्या त्या वेळी हिंदु विधीज्ञ
परिषद त्यांच्या पाठीशी उभी राहील !- अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेने आतापर्यंत अनेक राजकीय नेते, अंनिससारख्या संघटना आणि शासनाच्या कह्यात असलेली मंदिरे यांमधील भ्रष्टाचार उघड केला आहे. त्यातून अंनिसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ही सर्व मंडळी त्यांच्या दुष्प्रवृत्ती उघडकीस झाल्याने अस्वस्थ झाली आहेत आणि पूर्वग्रहापोटीच सनातनवर बंदीची मागणी करत आहेत.

सनातनच्या साधकांना धर्मप्रसार कार्यासाठी सहस्रो
हातांचे बळ मिळाले ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

आजच्या निषेध मोर्च्यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे सनातनच्या साधकांना धर्मप्रसारकार्यासाठी सहस्रो हातांचे बळ मिळाले आहे. सनातनबंदीची भाषा करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. सूर्याचे तेज कोणीही नष्ट करू शकत नाही. तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी यांनी हे लक्षात घ्यावे !

सनातनवरील संभाव्य बंदी टाळण्यासाठी आपण असेही प्रयत्न करू शकता

सनातनवरील बंदीच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांचे अर्थात् ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, देवस्थान, मंडळे, विविध संघटना, संप्रदाय इत्यादींचे ठराव करून शासनाला पाठवू शकतो. तसेच वैयक्तिक स्तरावर ‘पोस्टकार्ड’ही शासनाला पाठवू शकतो.

क्षणचित्रे

१. मार्कंडी येथील श्री स्वामी समर्थ मठ आणि छत्रपती संभाजी चौक येथील श्री साई मंदिर येथे पुष्पहार अन् श्रीफळ अर्पण करून निषेध मोर्च्याला प्रारंभ करण्यात आला.

२. नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नगरसेवक श्री. भगवान बुरटे यांनी पुष्पहार अर्पण केला.

३. मोर्चा मार्कंडी-बाजारपेठ-मध्यवर्ती बसस्थानकामार्गे-पंचायत समितीसमोर विसर्जित करण्यात आला. तेथे मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.

४. निषेध मोर्च्याची सांगता भगवान श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणून झाली.

५. त्यानंतर सनातनबंदी विरोधातील निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे चिपळूणच्या प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

६. सूत्रसंचलन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.

विशेष

मोर्चा भोगाळे येथे आल्यावर पावसानेही उपस्थिती लावली. तरीही सर्वजण मोर्च्यात दृढनिश्‍चयाने मार्गक्रमण करत राहिले.

निषेध मोर्च्यात सहभागी झालेले संत, विविध संघटना आणि मान्यवर

फुरुस येथील ह.भ.प. शांताराम महाराज नवेले, सोनगाव येथील ह.भ.प. नारायण महाराज पवार, सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेश देवळेकर, नगरसेवक श्री. शशिकांत मोदी, नगरसेवक श्री. भगवान बुरटे, तालुका सचिव श्री. दिलीप चव्हाण, युवासेनेचे श्री. विकी नरळकर, शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. संजय रेडिज, सोनगावचे गाव कमिटीचे अध्यक्ष श्री. सुभाष कदम आणि उपसरपंच श्री. नितीन खेराडे, ग्राहक संरक्षण सेनेचे तालुकाप्रमुख श्री. दीपक महाडिक, मनसेचे श्री. नाना चाळके, चिपळूण तालुका नाभिक संघटनेचे श्री. शंकर चव्हाण, राजे सामाजिक प्रतिष्ठानचे श्री. प्रशांत पोतदार, योद्धा प्रतिष्ठानचे श्री. महेंद्र साळुंखे, फुरुस येथील ग्रामदेवस्थानचे अध्यक्ष श्री. शांताराम कदम, धामणवणे येथील ग्रामदेवस्थानचे श्री. सुरेश लाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवव्रत तांबे, रावळगावचे सरपंच श्री. सुरेश जाधव, उधळे येथील ह.भ.प. चंद्रकांत पंडम, ह.भ.प. अनंतराव घोलप, नांदगाव येथील ह.भ.प. दत्ताराम मुंढेकर, पेढेचे सरपंच श्री. प्रवीण पाकळे, काडवली येथील श्री. वसंत रामाणे, चिपळूण येथील धर्मप्रेमी श्री. अरुण डाकवे, रत्नागिरी येथील धर्मप्रेमी सर्वश्री गणेश गायकवाड, अभिजित गिरकर, सुशील कदम, साखर येथील श्री. गणेश उतेकर, जालगाव येथील शिवसेना विभागप्रमुख श्री. मंगेश पवार, सनातनचे सर्वश्री केशव अष्टेकर, ज्ञानदेव पाटील, डॉ. हेमंत चाळके, सौ. पल्लवी लांजेकर, हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) श्रेया कदम, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर आणि श्री. संतोष घोरपडे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात