(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यावर आठवले याला अटक करणार !’ – प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघ

  • नक्षलप्रेमींचे समर्थन करणारे प्रकाश आंबेडकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या संतांच्या अटकेच्या वल्गना करणे आणि त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, यातून आंबेडकर यांची हीन मानसिकताच दिसून येते ! 
  • सनातनविरुद्ध नक्षलवादी भाषा वापरणारे प्रकाश आंबेडकर यांचेच खरेतर अन्वेषण होणे आवश्यक आहे !

नवी मुंबई – सनातन्यांचा रोल पानसरे, कलबुर्गी, दाभोलकर यांच्याविषयी दिसायला लागला, तरी अजूनही आठवल्याला (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पकडले का नाही ? आठवलेची अजून चौकशी का केली नाही ? आठवले आणि रा.स्व. संघाचा संबंध आहे;  म्हणून पकडत नाही का ? तुम्ही पकडले नाही, तर तुमची सत्ता उलटवून आमचे सरकार आल्यावर आम्ही त्यांना पकडून आणणार आहोत, अशी अर्वाच्च विधाने प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. वाशी येथे भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्यात भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर बोलत होते.

(परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अरे-तुरेची भाषा वापरणारे प्रकाश आंबेडकर सामान्य जनतेशी कसे वागत असतील, याची कल्पना येते ! अशांना सुज्ञ जनता निवडणुकीच्या वेळी योग्य ती जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही, असे कोणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

या वेळी प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,

१. विचारवंतांच्या हत्या प्रकरणात सरकार स्वतःहून कारवाई करत नाही. कर्नाटक पोलिसांनी सांगितल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली. ‘कर्नाटक पोलिसांच्या कारवाईत रा.स्व. संघाचे धागेदोरे सापडले, तर आपले सगळे बिंग फुटणार’, या भीतीपोटी काही जणांना पकडण्याचे नाटक केले आहे. त्यानंतर ‘या देशात नक्षलवादाचा धोका निर्माण झाला आहे’, असे वातावरण निर्माण केले आहे.

२. आता आपल्याला कळत नाही, सनातन्यांचे काय होत आहे ? सनातन्यांचा प्रमुख आठवले त्याला बघायला जाऊ, असे माने म्हणाले; पण पोलिसांनी त्याला पकडून आणले, तर आपण येथेच बघायला जाऊ. पोलिसांनी मला नक्षलवादी, माओवादी ठरवण्यापेक्षा, तेथे बसून तो आठवले लोकांना मारतो, त्याला पकडण्याचे धैर्य दाखवा. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

३.  रा.स्व. संघ येत्या २ मासांत आरक्षणावरून देश पेटवणार आहे. हे पुजार्‍यांच्या मानसिकतेतील सरकार आहे, पुजार्‍याचे तोंड केवळ हालत असते; पण त्याची नजर नैवेद्यावर असते. तशी हे स्वतःला पंतप्रधान म्हणवतात; पण याची नजर तिजोरीवर असते.

४. ज्या मध्यमवर्गाला हिंदु राष्ट्र पाहिजे, त्याला मी विचारतो, ‘आर्थिक सुबत्ता पाहिजे कि बेरोजगारी पाहिजे ?’, या सरकारला विरोध केला नाही, तर आपल्याला कंगाल करेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात