धर्मप्रेमींचा पाठिंबा हीच सनातनची शक्ती !

नालासोपारा येथील घटनेनंतर तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, धर्मद्वेष्टे, सनातनद्वेेष्टे, प्रसिद्धीमाध्यमे, पुरोगामी, नास्तिकतावादी, जातीयवादी यांनी ‘सनातनवर बंदी घाला’, अशी कोल्हेकुई चालू केली. ज्याप्रमाणे ऐरावत चालत असतांना त्याच्यावर श्‍वानांच्या भुंकण्याचा काहीच परिणाम न होता तो ऐटीत मार्गक्रमणा करत रहातो, तद्वत सनातनचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. हिंदु धर्मप्रेमी आणि हिंदु धर्माभिमानी यांचा सनातनवर असलेला विश्‍वासही दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. त्याची प्रचीती खालील प्रसंगांवरून अनुभवता आली. – संजय जोशी, रत्नागिरी

प्रसंग  १

रत्नागिरी येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एक हिंदु धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘नालासोपारा येथील घटनेमध्ये वैभव राऊत यांना झालेल्या अटकेमुळे काही हिंदूंना असे वाटत आहे की, ते आंदोलनाला उपस्थित राहिल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल का ? मात्र असे काहींना जरी वाटत असले, तरी आम्ही निश्‍चितपणे आमच्या सहकार्‍यांसह या आंदोलनाला उपस्थित रहाणारच आहोत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य हे कायद्याच्या चौकटीत राहून वैध मार्गाने चालते, याची आम्हाला पूर्ण निश्‍चिती आहे.’’ या हिंदुत्वनिष्ठांनी बैठकीत सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या सहकार्‍यांसह स्वतंत्र वाहन करून आंदोलनाला उपस्थित राहिले.

प्रसंग  २

आंदोलनाला हिंदुत्वनिष्ठांना निमंत्रित करण्यासाठी आम्ही रत्नागिरी जवळील एका गावात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका पदाधिकार्‍याला भेटलो. (त्यांनी हिंदु जनजागृती समितीचा ‘मंदिर संस्कृती विशेषांक’ वाचल्यावर ‘मंदिरांचे सरकारीकरण होऊ नये आणि सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा हिंदु भाविक आणि भक्त यांच्या कह्यात द्यावीत’, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.) नालासोपारा येथील घटनेविषयी त्यांनी सांगितले ‘‘हिंदुत्वाच्या कार्यासाठी आमच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांना एकत्र आणणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना अडकवण्याचा हिंदु धर्मविरोधकांचा डाव आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. माझ्या भागातील ग्रामपंचायतींमध्ये सनातनबंदीच्या विरोधात ठराव करून मी शासनाकडे पाठवणार आहे.’’

प्रसंग  ३

नालासोपारा घटनेमध्ये श्री. वैभव राऊत यांना अटक झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी रत्नागिरी येथील मरुधर समाजाच्या अध्यक्षांचा एका साधकाला व्हॉट्सअ‍ॅपवर एक संदेश आला. त्यात त्यांनी म्हटले होते ‘आम्हाला सनातनची सभा आमच्या राजस्थानी बांधवांसाठी घ्यायची आहे. आम्हाला सनातनचा हिंदीतून बोलेल असा वक्ता हवा आहे. आमच्या समाजाच्या भवनामध्ये आम्ही ही सभा आयोजित करू.’

 

 

ईश्‍वरावरील अढळ श्रद्धेच्या बळावर पोलिसांच्या विरोधाला
न डगमगता तोंड देणारे सनातनचे साधक आणि नंतर सकारात्मक झालेले पोलीस !

१. साधकाने उपाहारगृहात परात्पर गुरु डॉ. आठवले
यांचे छायाचित्र लावणे आणि त्याविषयी पोलिसांनाही समजणे

‘श्री गुरुकृपेने माझा व्यवसाय असून माझ्या उपाहारगृहामध्ये (कॅफेमध्ये) मी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्र आणि सनातनने बनवलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र दर्शनी भागात लावले आहे. व्यवसायाचे ठिकाण एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या जवळ आहे. उपाहारगृहात येणार्‍या काही मुलांनी (ग्राहकांनी) सदर चित्रे पाहून सर्वत्र त्याविषयी सांगितले. कदाचित् त्यामुळेच ते पोलिसांना समजले असावे. त्यानंतर अचानक एके दिवशी साध्या वेशातील पोलीस उपाहारगृहात आले. त्यांनी वाचनासाठी ठेवलेला दैनिक सनातन प्रभात मागून घेतला आणि वाचू लागले.

२. सनातनचा साधक असल्याचे समजल्यावर पोलीस प्रतिदिन उपाहारगृहात येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र काढून टाकण्यास सांगणे; मात्र साधकाने त्यांचे न ऐकणे

पोलीस दिवसभर उपाहारगृहाच्या ठिकाणी बसून होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला, ‘‘सनातनमध्ये तुम्ही काय करता ?’’, असे विचारले. ‘आम्ही नामजप, प्रार्थना, दैनिक वाचन आणि प्रासंगिक सेवा इत्यादी करत असतो’, असे त्यांना सांगितले. त्यानंतर ते निघून गेले; पण त्यानंतर ते प्रतिदिनच येऊ लागले. दुसर्‍या दिवशी दोघा पोलिसांनी मला श्रीगुरूंचे छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र काढून टाकण्यास सांगितले; परंतु मी ऐकले नाही.

३. पोलिसांच्या दबावाला बळी न पडल्यामुळे अखेर त्यांनीही साधकासमोर हात टेकणे !

त्यानंतर तिसर्‍या आणि चौथ्या दिवशीही असेच झाले; पण मी लक्षच दिले नाही. पाचव्या दिवशी त्या दोघांसह तिसरा पोलीस आला आणि त्यानेही आल्या आल्या मला ती चित्रे काढून टाकण्यास सांगितली. तेव्हा आधीचे दोन पोलीस त्याला म्हणाले, ‘‘असू दे रे ती दोन छायाचित्रे. तो काढणार नाही. सांगून पाहिले; पण तो काढत नाही.’’

४. ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी प्रबोधनात्मक पत्रक लावल्यामुळे ग्राहक अल्प होतील’, असे
पोलिसांनी सांगणे; मात्र त्याच वेळी ४०-५० मुलांचा घोळका आल्याने पोलिसांना आपसूकच उत्तर मिळणे

नेमकी त्याच वेळी ‘व्हॅलेंटाईन डे’ विषयीची जागृती मोहिमेची सेवा चालू होती. त्यासंबंधीचे सेवेचे पत्रक बाहेरच्या भिंतीवर लावत होतो. त्यावेळी तिसरा पोलीस मला म्हणाला,‘‘अरे, आजकालच्या मुलामुलींना ‘व्हॅलेंटाईन डे’ आवडतो. तू तर असले पत्रक लावत आहेस, मग तुझ्याकडे मुले-मुली कशी येणार ? तुझा व्यवसाय कसा वाढणार ?’’ तो हे विचारत असतांना ४०-५० मुला-मुलींचा घोळका आत आला आणि त्याचे उत्तर त्यांना मिळाले.

५. पोलिसांनी न्याहारीचे पैसे देणार असल्याचे,
तसेच उपाहारगृहात बसल्यावर चांगले वाटत असल्याचे सांगणे

आतापर्यंतच्या अनुभवानुसार पोलीस कुठल्याही उपाहारगृहात गेल्यास पैसे देत नाहीत. माझ्या उपाहारगृहात पोलीस आले. त्या वेळी न्याहारी बनवणारा कर्मचारी आला नव्हता. मी त्यांना म्हणालो, ‘‘कर्मचारी आला नसल्यामुळे न्याहारी उपलब्ध नाही.’’ तर पोलीस स्वतःच म्हणू लागले,‘‘आम्ही पैसे देतो; परंतु न्याहारी द्या आणि नसेल तर येथे आम्हाला बसू द्या. तुमच्या येथे (उपाहारगृहात) बसल्यावर चांगले वाटते.’’

या सर्व प्रसंगातून मला, ‘गुरुदेव कशाप्रकारे साधकांची काळजी घेतात आणि गुरुकृपेची किमया कशी असते’, ते अनुभवायला मिळाले.’

– सनातनचा एक साधक