विश्‍वासार्हता गमावलेली प्रसारमाध्यमे म्हणे लोकशाहीचा चौथा स्तंभ !

आतंकवादविरोधी पथकाने ‘माध्यमांमध्ये विविध कथा प्रदर्शित होत आहेत’, असे सांगणे हे माध्यमांना लज्जास्पद वाटत नाही, हे लक्षात घ्या !

२१ ऑगस्ट या दिवशी झालेल्या आतंकवादविरोधी पथकाच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी नालासोपारा प्रकरणी प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध होत असल्याविषयी खेद व्यक्त केला. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी ‘आरोपींनी वापरलेल्या ‘कोड’ शब्दांपैकी काही तरी कोड शब्द सांगा’, अशी अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलकर्णी यांना वारंवार विनंती केली; मात्र कुलकर्णी यांनी अन्वेषणाच्या दृष्टीने शब्द सांगण्यास नकार दिला. तेव्हा काही पत्रकारांनी ‘तुम्ही केवळ ‘कोड’ शब्द सांगा. पुढील स्टोरी आम्ही बनवतो’, असे सांगितले. पत्रकारांच्या अशा वक्तव्यांवरून ते कशा प्रकारे उथळ आणि कपोलकल्पित बातम्या निर्माण करतात, हेच स्पष्ट झाले. संस्थेविषयी पोलिसांनी कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिलेली नसतांना अशा प्रकारच्या कपोकल्पित बातम्या देऊन एखाद्याची मानहानी आणि अपकीर्ती करणे, हा पत्रकारितेला लागलेला कलंक आहे. यातून सध्या चालू असलेली पीतपत्रकारिता उघड होते.

या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी ‘अन्वेषणामध्ये गुन्हेगारांना साहाय्य ठरतील, अशी कोणत्याही प्रकारे माहिती प्रसिद्ध करू नये’, असे आवाहन पत्रकारांना केले.

 

एखाद्या प्रश्‍नावर राळ उठवून त्यातील सत्य समजून घेण्याची वेळ आल्यावर मात्र
त्याविषयी उदासीनता दाखवून स्वतःला हवे तसे फिरवून वृत्त देणारी वाहिन्यांची पीत पत्रकारिता !

‘आवश्यकता भासल्यासच डॉ. आठवले यांची चौकशी होणार’, असे आतंकवादविरोधी पथकाने सांगूनही ‘डॉ. आठवले यांची चौकशी होणार’, असे वृत्त देणार्‍या खोटारड्या वाहिन्या !

१७ हून अधिक दिवस नालासोपारा प्रकरणी आणि त्याला जोडून पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणी केवळ आणि केवळ सनातनवर रोख ठेवून अक्षरशः गदारोळ माजवला गेला. या पार्श्‍वभूमीवर ‘सनातन दोषी आहे किंवा नाही’, हे सांगणार्‍या आतंकवादविरोधी पथकाच्या पत्रकार परिषदेचे वृत्त खरेतर ‘ब्रेकींग न्यूज’ म्हणून येणे अपेक्षित होते; परंतु वार्ताहर आणि वाहिन्या यांना अपेक्षित असे ‘सनसनाटी’ म्हणजेच सनातनला आरोपी किंवा दोषी ठरवणारे त्यात विशेष काहीच नव्हते; उलट आतापर्यंत वाहिन्यांनी केलेले धादांत खोटे आरोप त्यात फेटाळण्यात आले होते ! त्यामुळे हे वृत्त ‘ब्रेकींग न्यूज’ झाले नाही.

खरे तर मोठ्या प्रमाणात या सर्व वाहिन्यांचे वार्ताहर उपस्थित होते; परंतु या पत्रकार परिषदेमध्ये वार्ताहरांनी त्यांना अपेक्षित असे काहीच मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी प्रश्‍न विचारला ‘आठवले यांची चौकशी होणार का ?’ त्यावर आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘आवश्यकता वाटल्यास करू.’ मात्र ‘टीव्ही ९’ ने बातमी करतांना मूळ वृत्त देण्याचे टाळून ‘आठवले यांची चौकशी होणार’ अशी तळपट्टी देऊन ‘ब्रेकींग न्यूज’ केली. त्यानंतर सर्व वाहिन्यांनी तसेच वृत्त दाखवणे चालू केले. प्रत्यक्षात त्या पत्रकार परिषदेत आतंकवादविरोधी पक्षाचे प्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले होते की, ‘कोणत्याही संघटनेचे नाव अद्याप घेतलेले नाही.’ तसेच हिंदुविरोधी नेत्यांनी केलेले आरोपही या पत्रकार परिषदेत खोडून काढण्यात आले होते; मात्र त्याविषयीही वृत्त देण्याचे वाहिन्यांनी टाळले.

 

कथित विचारवंत कुमार सप्तर्षी यांची जातीद्वेषी गरळओक आणि संमोहनाविषयी पाजळलेले अज्ञान !

पुढील विधाने करून सप्तर्षी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि त्यांचे राज्यकारभारी यांचा अवमान केला आहे ! त्यासाठी समस्त शिवप्रेमींनी त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे !

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील ‘लक्षवेधी’ या चर्चासत्रातील चर्चा

‘शिवाजी महाराज’ म्हटले की मराठा मुले लगेच बुद्धीने शरण जातात. त्यांना संमोहित करू शकतो, असा प्रयोग भिडे यांनी करून दाखवला. ‘हरहर महादेव’ म्हणत मेंदूत शिरायचे आणि ब्राह्मणांचा मेंदू म्हणून वापरायचा. याच्या पुढची पायरी म्हणजे सनातन संस्था आहे. आमच्या पूर्वाजांनाही संमोहितच केले गेले होते. आम्हाला स्वाभिमान असता, थोडी सतर्कता, तर्कबुद्धी असती तर कोणी जातीव्यवस्था मान्य केली नसती. संमोहनाचा प्रकार कीर्तनातून आणि प्रवचनातून वापरला जातो. हाच संमोहनाचा वापर डॉ. आठवले वापरत आहेत. पूर्वी संमोहित झालेले किंवा संमोहनाला बळी पडलेले संमोहनातच रहाणारे म्हणजे अंधश्रद्धा असणारे लोक, जे डोके वापरतच नाहीत, अशा लोकांना त्यांना संमोहित करून यांच्याकडून गैरकृत्य करून घेतात. ज्यांचा सारासार विवेक जागृत असेल, त्यांच्यावर हिंदुत्ववादाचा कोणताच परिणाम होणार नाही.

संमोहनतज्ञांनी पुढील गोष्टी पूर्वीच वाहिन्यांवर स्पष्ट केल्या आहेत !

१. एखादी व्यक्ती एवढ्या मोठ्या समूहाला सातत्याने संमोहित करून कृती करवून घेऊ शकत नाही.

२. एखाद्या संमोहित व्यक्तीला कुणी ‘खून करायला जा’ असे सांगून ती जाऊन खून करेल, असे कधी होत नाही.

त्यामुळे ‘संमोहित केलेलेे बहुजन अन्याय सहन करतात’ असे म्हणणे हेही हास्यास्पद आहे. तसेच ‘पू. भिडेगुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले संमोहित करून कार्य करत आहेत’ ही विधानेही अत्यंत अवैज्ञानिक आणि संमोहनाविषयी अज्ञान प्रकट करणारी आहेत.

 

‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीवरील चर्चासत्रात जातीयवादी माजी
न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी हिंदुत्वनिष्ठांना उद्देशून केलेली विद्वेषी विधाने !

एका जाहीर कार्यक्रमात माजी न्यायमूर्तींसारखी व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्ये करते, यावरून त्यांची हीन मनोवृत्ती दिसून येते.

१. मनुवादी मुख्यमंत्री निवडणुकांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांना ‘क्लिनचीट’ देणार आणि त्यांचे ‘रेकॉर्ड’ उजळून टाकणार ! (असे असते, तर भाजपच्या राज्यात सनातनविषयी गरळओक करण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते आणि पूर्वीच्या प्रकरणात सनातनच्या साधकांना अटकही झाली नसती ! – संकलक)

२. केवळ जातीयवाद नव्हे, आर्यभटांनो, तुम्ही सर्वांचे वाटोळे केलेले आहे. (माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झाल्याने ते सातत्याने जातीयवादी गरळओक करतात. अशांमुळे होणारे वैचारिक प्रदूषण समाजासाठी घातक ! – संकलक)

३. आमची दिशाभूल हजारो वर्षे करत आहात. (सहस्रो वर्षे कुणी कुणाची दिशाभूल करू तरी शकते का ? – संकलक)

४. आठवले यांना कोणीही हात लावणार नाही. वरही मनुवादी यांचे सरकार आहे आणि खालीही त्यांचेच राज्य आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले निर्दोष आहेत; म्हणून त्यांच्या पर्यंत कोणीही पोहोचू शकत नाहीत, हेच सत्य होय. – संकलक)

५. हरामखोर, तुम्हाला लाज वाटायला हवी, हरामजादे, तुम्ही समाजाला बिघडवले. (हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांना उद्देशून हे शब्द वाहिनीवर वापरल्याने या संदर्भात ते कायदेशीर साहाय्य घेत असल्याचे त्यांनी कळवले आहे. – संकलक)

 

‘प्रसिद्धीमाध्यमांचा मास्टरमाईंड’ कोण ?’, याचे सर्वांना ‘गूढ’ !

वाहिन्यांवर सातत्याने नालासोपारा किंवा पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांचा ‘मास्टरमाईंड’ (सूत्रधार) कोण ?’ असे दाखवण्यात येत होते. त्यामुळे ३ आठवडे सकाळ-संध्याकाळ इतकी कपोलकल्पित कथा रचणारी, हिंदूंची अपकीर्ती करणारी, बहुतांश अर्धवट माहितीच्या आधारावर सिद्ध केलेली खोटी वृत्ते देण्याचा जो सपाटा वाहिन्यांनी लावला होता, तो पाहून ‘प्रसिद्धीमाध्यमांचा मास्टरमाईंड कोण ?’ असा प्रश्‍न पडल्यावाचून राहिला नाही !

 

चातुर्मासात निंदा करणे, हे महापाप !

धर्मशास्त्रात सांगितले आहे की, परनिंदा करणे हे पाप आहे आणि चातुर्मासात परनिंदा केल्यास महापाप लागते ! सर्व वाहिन्यांनी चातुर्मासात अध्यात्माचा प्रसार करणार्‍या सनातनसारख्या संस्थेवर यथेच्छ चिखलफेक करून तिला सुळाच्या टोकावर उभे केले आणि तिची निंदा करण्याचा परमोच्च बिंदू गाठला. त्यामुळे वाहिन्यांना त्याचे पाप लागले असणार, यात शंका नाही !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात