प्रसिद्धीमाध्यमांचा विरोध आणि खंडण !

प्रसिद्धीमाध्यमांच्या ‘मीडिया ट्रायल’ला सडेतोड उत्तरे !

परनिंदेने प्रसारमाध्यमे पापांची भागीदार !

नालासोपारा येथे कथित बॉम्ब मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी सनातन संस्थेचे नाव कुठेही घेतले नसतांना माध्यमे, पुरोगामी आणि काँग्रेस यांनी सनातनवर बंदी आणण्याची आवई उठवली. आतंकवादविरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन याविषयी खुलासा करूनही सनातनच्या विरोधात रान उठवणे चालूच होते. यामुळे सनातन संस्थेला २७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेणे भाग पडले. सनातन संस्थेने वारंवार प्रसिद्धीपत्रके प्रसारित करून, तसेच त्यांच्या प्रवक्त्यांनी केलेले खंडण येथे देत आहे.

२७ ऑगस्टला सनातनने पत्रकार परिषद घेऊनही
‘पडलो तरी नाक वर’ ही म्हण सार्थ करणारी वाहिन्यांची वृत्ते आणि तळपट्ट्या !

पत्रकार परिषदेत सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सर्व आरोपांना तर्काधारित आणि सूत्रबद्धपणे उत्तरे दिली. असे असतांना पत्रकार परिषदेनंतर काही तुरळक अपवाद वगळता माध्यमांनी अर्थाचा अनर्थ करून समाजाची दिशाभूल करण्याचा काही माध्यमांनी जणू विडाच उचलल्याप्रमाणे ‘सनातनने हात झटकले’, अशी ओरड चालू केली.

आरोप

या प्रकरणात सनातनचे साधक सहभागी नसल्याचे १८ दिवसांनंतर का सांगत आहात ?

खंडण

प्रत्यक्षात पहिल्या दिवसापासूनच सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर, तसेच अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सर्व वाहिन्यांवर ‘ते आमचे साधक नाहीत’, हे प्रतिक्रिया देतांना वारंवार सांगितले होते. स्वतःच्याच वाहिनीवरील वृत्ते नीट न पहाता वरीलप्रमाणे आरोप करून आणि प्रश्‍न विचारून वाहिन्यांनी स्वतःचे हसे करून घेतले.

आरोप

तुम्ही आतापर्यंत जे जे या प्रकरणात अडकले आहेत ‘ते आमचे साधक नाहीत’, म्हणून हात झटकलेत !

खंडण

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अटक झालेले डॉ. वीरेंद्र तावडे, पानसरे प्रकरणी अटक झालेले श्री. समीर गायकवाड हे सनातनचे साधक आहेत, हे सनातनने कधीच नाकारलेले नाही. पुरो(अधो)गामी पत्रकार हे सत्य का नाकारतात ?

आरोप

गोवा येथील अधिवेशनामध्ये कुणाला लक्ष्य करायचे, याचा कट शिजतो !

खंडण

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात हिंदु संघटनांचे परिचय, कार्याचे-विचारांचे आणि अनुभवांचे आदानप्रदान, हिंदुत्वाच्या कार्याचे अभिनव उपक्रम, देशाच्या सद्यस्थितीत हिंदु राष्ट्राचा प्रसार कसा येईल अशा विविध विषयांवर मंथन होते.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, बांगलादेश-श्रीलंका येथील हिंदूंच्या समस्या, मंदिरांचे पावित्र्यरक्षण, गोहत्याबंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्याचे प्रयत्न, गंगारक्षण आदी विषयांवर चर्चा होते. समान सूत्री कार्यक्रम सिद्ध होतो. राष्ट्रीय हिंदू आंदोलन, धर्मजागृती सभा हे समानसूत्री कार्यक्रम आहेत.

या अधिवेशनाला पत्रकार उपस्थित असतात. असे असतांनाही पत्रकारांनी असे खोटे आरोप करणे संतापजनक.

आरोप

तुम्ही युवकांना शस्त्र प्रशिक्षण देता !

खंडण

कुलाब्यामध्ये पद्मसिंग पाटीलांकडे ५० तलवारी सापडल्या होत्या. एका बड्या राजकारण्याचे संबंध असल्याने हे प्रकरण बासनात गुंडाळले गेले. त्याविषयी ‘जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत याविषयी काही बोलता येणार नाही’, हे तत्कालीन गृहमंत्री आर्.आर्. पाटील यांनी सांगितले होते. आज तुम्ही कुठल्या प्रशिक्षणाच्या संदर्भात चर्चा करत आहात ? स्वरक्षणवर्ग सर्वत्र चालतात. स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यायला नको का हो ? गुंड, बलात्कारी आणि दंगेखोर यांपासून सामान्य खरंच सुरक्षित आहेत का ? काश्मीरमध्ये तर १९९० मध्ये हिंदूंचे कोणीही रक्षण न केल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागले होते. पोलीसयंत्रणाविषयी अविश्‍वास नाही; पण त्यांच्या संख्येला मर्यादा आहेत. त्यामुळे नागरिक सक्षम होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यास सांगितले होते.

आरोप

हिंदुत्ववादी विचारांचे शासन असतांना ते आणि तपासयंत्रणा तुम्हाला लक्ष्य का करतील ?

खंडण

पुरो(अधो)गामी सरकारवर दबाव आणतात, असे चित्र पहायला मिळते. त्यामुळे खरे आरोपी मिळत नाहीत; म्हणून तपासयंत्रणांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा भाग चालू आहे, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ?

आरोप

सनातन संस्थेचे नाव वारंवार अशा प्रकरणांत का येते ?

खंडण

शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना अटक झाल्यानंतरच यांची नावे प्रथमच आम्ही (सनातनने) ऐकली. गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्या होईपर्यंत आम्हाला त्यांची नावेही ठाऊक नव्हती; पण आम्हाला या प्रकरणांमध्ये हेतूपूर्वक टार्गेट केले जात आहे; कारण आम्ही हिंदु धर्माचे कार्य करतो. हिंदू संघटनांना एकत्रित आणतो. आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’ आहोत. यापूर्वी संघ टार्गेट होता. आता संघप्रणीत शासन सत्तेमध्ये आहे. त्याची शक्ती वाढल्याने आता छोट्याशा सनातनला लक्ष्य केले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात