वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी उरबडव करणार्‍या सनातनद्वेष्ट्या पत्रकारांचा खरा चेहरा !

दैनिक सनातन प्रभातच्या जून २०१३ च्या एका अंकात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मक्रांतीची आवश्यकता विषद करणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका असल्याचा भास काही पत्रकारांना झाला आणि त्या सूत्रावरून आमच्यावर प्रश्‍नांचा भडीमार चालू झाला. आमचा आक्षेप प्रश्‍नांना नाही, तर प्रश्‍नांमागील हेतूचा आहे. त्यामुुळे आम्हाला प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकारांसाठी आमचेही काही प्रश्‍न आहेत.

१. ‘सनातन प्रभात’ला जाब विचारणार्‍या पुरो(अधो)गामी पत्रकारांना काही प्रश्‍न !

१ अ. वृत्तपत्र क्षेत्रात केवळ सनातन प्रभातलाच जाब विचारण्याची
पत्रकारांची मानसिकता वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारी नाही का ? :

श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात.

एका महिला पत्रकाराने दूरभाष करून वर उल्लेख केलेल्या लेखावरून मला जाब विचारला. असाच जाब एखाद्या हिंदुत्वनिष्ठाने त्या पत्रकाराला किंवा तिच्या संपादकाला विचारला असता, तर ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा किती मोठा कांगावा त्यांनी केला असता’, हे वेगळे सांगायला नको. एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मजकुराविषयी अन्य वृत्तपत्राने जाब विचारण्याची प्रथा नाही, उदाहरणार्थ ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ एकमेकांच्या मजकुराविषयी आक्षेप घेत नाहीत; कारण पत्रकारितेतील प्रचलित संकेतानुसार दोघांनाही एकमेकांचे स्वातंत्र्य जपायचे असतेे. सनातन प्रभातच्या संदर्भात मात्र हे संकेत पाळले जात नाहीत. आज केवळ ‘सनातन अडचणीत आहे’, म्हणून सनातन प्रभातमधील चार वाक्यांची मोडतोड करून चर्चा रंगवण्याची माध्यमांची इच्छा अधिक आहे. वृत्तपत्र समूहांनी एकमेकांना जाब विचारण्याची प्रथा चालू होणारच असेल, तर आम्हालाही ते हवेच आहे. त्यानिमित्ताने वृत्तपत्रांची बाजारू मानसिकता वाचकांसमोर मांडायची संधी मिळत असेल, तर त्याचे सोने करायला आम्ही सिद्ध आहोत. इतर प्रसारमाध्यमे यासाठी सिद्ध आहेत का ?

२. पाच वर्षांपूर्वी सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली होती, तर त्याच वेळी तक्रार का केली नाही ?

सनातन प्रभातमध्ये ‘धर्मक्रांती’विषयी प्रसिद्ध झालेला लेख जून २०१३ मधील आहे. हा लेख पत्रकारांकडे घेऊन येणार्‍या सुंभाला या पत्रकारांनी जाब विचारले का ? हा लेख राष्ट्रीय सुरक्षेसाठी इतका धोकादायक होता, तर ५ वर्षांपूर्वीच त्याची तक्रार का केली नाही ? देशाच्या सुरक्षेला धोकादायक (?) असलेल्या अंकाची प्रत ५ वर्षांपर्यंत घडी घालून ठेवणारी ही व्यक्तीही तितकीच गुन्हेगार ठरत नाही का ? त्या व्यक्तीविरुद्ध सनातन प्रभातला जाब विचारणार्‍या राष्ट्रप्रेमी पत्रकारांनी काय कारवाई केली ?

३. पुरो(अधो)गामी पत्रकार हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांचे वृत्तपत्र स्वातंत्र्य का नाकारतात ?

अलीकडेच पुण्यप्रसुन वाजपेयी आणि अभिसार शर्मा या नावाजलेल्या पत्रकारांनी ते कार्यरत असलेल्या वृत्तवाहिनीकडे त्यागपत्र सुपुर्द केले. अर्थात पत्रकारांनी एक वृत्तपत्र सोडून दुसर्‍या वृत्तपत्रात किंवा वाहिनीत रूजू होणे ही फार मोठी आश्‍चर्याची घडामोड नाही. तरीही या दोघांनी दिलेल्या त्यागपत्रांचे प्रकरण भलतेच गाजले. या द्वयींनी त्यांच्या ‘शो’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवल्यामुळे म्हणे ‘मोदीराज’ डळमळले आणि अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून या पत्रकारांची गच्छंती केली. अर्थात हे सर्व तर्क ‘माध्यमविरां’नी रंगवले होते आणि त्याला झालर होती वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेच्या मुस्कटदाबीची !

पुण्यप्रसुन वाजपेयी आणि अभिसार शर्मा यांच्या निमित्ताने आमच्या पत्रकार बंधूंनी तार स्वरात रंगवलेली ही चर्चा योग्य कि अयोग्य हा प्रश्‍न तात्पुरता बाजूला ठेवू. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नथीतून हिंदुत्वनिष्ठ मोदी सरकारवर वाक्बाण सोडणारे पुरो(अधो)गामी पत्रकार हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांचे वृत्तपत्र स्वातंत्र्य नाकारतात; म्हणूनच सनातन प्रभातमधील मजकुरांच्या बातम्या होतात. अर्थात आमच्यासाठी हे भूषणावह आहे; पण प्रसारमाध्यमे त्या मजकुराला विकृत रूपात मांडतात, हे आक्षेपार्ह आहे.

४. पुरो(अधो)गामी पत्रकारांनी थोडे आत्मपरीक्षणही करावे !

देशाच्या सुरक्षेचे देणेघेणे ना आम्हाला जाब विचारणार्‍या पत्रकारांना आहे ना ५ वर्षे अंक घडी घालून ठेवणार्‍यांना आहे. आज सनातन अडचणीत आहे; म्हणून आणखी अडचणीत आणण्याचे निमित्त ही मंडळी शोधत आहेत. आम्हीच शहाणे या अविर्भावात मिरवणार्‍या पत्रकार बंधूंनी मी दुसर्‍या पत्रकाराचे वृत्तपत्र-स्वातंत्र्य नाकारत तर नाही ना, याचे आत्मपरीक्षण करावे !’

संकलक : श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात