ईश्‍वरनिष्ठ सनातन संस्था !

ईश्‍वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद असणारी सनातन संस्था गत २७ वर्षे धर्मप्रसाराचे तेजस्वी कार्य अव्याहतपणे करत आहे. मंदिर स्वच्छतेपासून सार्वजनिक उत्सवांतील अपप्रकार रोखण्यापर्यंत विविध पातळ्यांवर समाजोद्धाराचे हे कार्य चैतन्याच्या स्तरावर करणार्‍या सनातन संस्थेला अल्पावधीत मिळालेला जनाधार आणि तिच्या कार्याचा झालेला विस्तार ही तिला मिळालेली पोचपावतीच आहे ! सनातन संस्थेचा कोणताही उपक्रम आजवर अनुमतीविना घेतला, कोणत्याही कार्यक्रमात गोंधळ उडाला, कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागले, असे आतापर्यंत कधीही झालेले नाही. आजपर्यंत सनातन संस्थेच्या विरोधात एकही गुन्हा नोंद झालेला नाही. याचे कारण म्हणजे सनातन केवळ लोकशाही मूल्ये, न्यायव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था यांचा मान राखते. एवढेच नव्हे, तर त्यानुसार सनातनचे साधक आचरणही करतात. आज सनातनचे साधक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्या समाजातील सामान्य व्यक्तीपासून ते सनातनच्या फेर्‍यांसाठी येणार्‍या पोलिसांपर्यंत सर्वजण सनातनच्या साधकांच्या आचरणाचे आवर्जून कौतुकच करतांना दिसतात. ‘निरपेक्षता आणि नम्रता ही वैशिष्ट्ये असणारे सनातनचे साधक कोणतेही कायदाबाह्य कृत्य करणार नाहीत’, असा समाजाचा विश्‍वासच त्यांनी संपादन केला आहे ! छोटीशी कृतीही योग्य आणि वैध मार्गाने करणार्‍या सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेला नालासोपारा येथे कथित बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणात विनापुरावा उत्तरदायी धरणे आणि तिच्यावर अत्यंत अश्‍लाघ्य स्वरूपात चिखलफेक करून तिची मानहानी करत रहाणे, हा सनातनवरील घोर अन्यायच होय !

तथाकथित पुरोगामी, हिंदुविरोधी पक्षांचे नेते आणि प्रसारमाध्यमे यांनी गेल्या काही दिवसांत ‘पुरोगाम्यांच्या हत्या सनातननेच केल्या’, असे गृहीत धरूनच तिच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मिथ्यारोप केले आणि हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतला. प्रत्यक्ष गृहमंत्री आणि अन्वेषण यंत्रणा यांनी सनातनच्या सहभागाचा पुरावा अद्याप समोर आला नसल्याचे सांगूनही विरोधकांचे दोषारोपण थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळेच केवळ सनातनच्या अस्तित्वावर घाला घालण्याच्या उद्देशानेच हिंदुविरोधी शक्ती हे षड्यंत्र राबवत असल्याचा संशय खरा ठरत आहे ! प्रखर हिंदुत्वनिष्ठ सनातनला संपवण्यासाठी तिच्यावर बंदीची आवई उठवण्याचे धर्मविरोधकांचे कारस्थान कालमहिम्यानुसार त्यांच्याच राजकीय किंवा सामाजिक अस्तित्वावर घाला घालणारे आहे, हे त्यांच्या अद्याप लक्षात आलेले नाही.

अर्थातच ईश्‍वरी कृपा, धर्माचे अधिष्ठान आणि राष्ट्र-धर्म प्रेमी समाज यांच्या आधारावरच सनातनने येथपर्यंत वाटचाल केली आहे. ती अशीच ऐरावताप्रमाणे होत राहील, यात यत्किंचितही शंका नाही ! ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म (ईश्‍वर) रक्षण करतो’, या धर्मवचनानुसार ‘सनातन’ या संकटातूनही तावून सुलाखून बाहेर पडेल !