हिंदूंना तिसरे नेत्र उघडण्यास भाग पाडू नका ! – रमेश नाईक

म्हापसा येथील पत्रकार परिषदेत हिंदुत्वनिष्ठांची सनातनद्वेष्टे आणि पुरो(अधो)गामी यांना चेतावणी !

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, श्री. रमेश नाईक आणि श्री. प्रसाद दळवी

म्हापसा, ५ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते. ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात राष्ट्राभिमान शिकवला जातो. सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांचा मी धिक्कार करतो. सनातन संस्थेवर आम्ही कदापि बंदी आणू देणार नाही. याविषयी हिंदूंना तिसरे नेत्र उघडण्यास भाग पाडू नका, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ तथा शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक यांनी सनातनद्वेष्टे आणि पुरो(अधो)गामी यांना दिली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी राज्यातील काँग्रेसचे नेते, तसेच समाजातील काही घटकांकडून केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील सुहास हॉटेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचचे माजी पदाधिकारी श्री. प्रसाद दळवी यांची उपस्थिती होती.

श्री. रमेश नाईक यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा विविध उदाहरणांद्वारे सनातनद्वेष आणि हिंदुद्वेष उघड केला. ते म्हणाले, सनातनच्या साधकांवर बॉम्ब ठेवल्याचे आरोप झाले; परंतु कोणत्याही न्यायालयात हे आरोप सिद्ध झालेले नाहीत. विविध प्रकरणांमध्ये सनातनला अडकवण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा कट आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्याकांडामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग होता; मात्र त्यावेळी काँग्रेसवर बंदी का घातली नाही ? आतंकवादाशी संबंध असलेल्या रोहिंग्यांच्या समर्थनार्थ गोव्यात झालेल्या फेर्‍यांमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसवर बंदी का घालू नये ?

सनातनचे कार्य दीपस्तंभासारखे सर्वांना प्रेरणादायी !
– चंद्रकांत (भाई) पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

सनातन संस्था गेली २६ वर्षे सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत कार्य करत आहे. मराठी भाषेचे रक्षण करणे, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे, पाश्‍चात्त्य संस्कृतीला विराध करणे, हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला विरोध करणे, मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि मंदिरांचे रक्षण करणे, आदी क्षेत्रांत सनातन संस्था कृतीशील आहे. गोव्याच्या संस्कृतीला पूरक असे कार्य सनातन करत आहे. हिंदूंनी धर्माचरण करावे, हिंदु संस्कृतीचे पालन करावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आदी हिंदूंच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी सनातन संस्था धडपड करत आहे. सनातन संस्थेचे साधक तळमळीने कार्य करत आहेत. सनातनचे कार्य दीपस्तंभासारखे सर्वांना प्रेरणादायी आहे. सनातन संस्थेला अनेक साधूसंतांचे आशीर्वाद लाभले आहेत. अनेक लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या पाठीशी उभे आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राची स्थापना हे एक ध्येय आहे आणि हे ध्येय पूर्ण होणारच आहे. सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य वाढत असल्याने याला विरोधकांचा विरोध होणे स्वाभाविक आहे. आज हिंदुविरोधी शक्ती संघटित होऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करत आहेत. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना आतंकवादी, तर नक्षलवादाशी संबंध ठेवणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना विचारवंत असे संबोधले जात आहे. असे संबोधणे हा एक देशद्रोह आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे, हे एक षड्यंत्र आहे. सनातनविषयी खोटी वृत्ते प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती करणे, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. सनातनला अपकीर्त करणारे स्वार्थी आणि हिंदुद्वेषी आहेत. असत्याचा कितीही धुरळा उडाला, तरी सत्य कधीही लपणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात