सनातनवरील बंदीच्या मागे राजकीय स्टंट ! – आमदार अशोक पाटील, शिवसेना

डावीकडून सौ. नयना भगत, रमेश घाटकर, सुनील घनवट, निवेदन स्वीकारतांना आमदार अशोक पाटील

मुंबई – राष्ट्र-धर्म जागृतीचे कार्य करणारी सनातन ही एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना आहे. सनातनचे कार्य मी जवळून पाहिले आहे. सनातन पुष्कळ चांगले कार्य करत आहे. काही राजकीय पक्ष, कथित विचारवंत आणि हिंदुधर्म विरोधी लोक जी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत, त्यामागे राजकीय स्टंट आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे भांडुप (पश्‍चिम) विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. अशोक पाटील यांनी मांडले. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बेछूट आरोप करून त्यांची करण्यात येत असलेली अपकीर्ती यांविरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. अशोक पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या. एका राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनेला अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

या वेळी सनातन संस्थेवरील विश्‍वास आणि पाठिंबा व्यक्त करतांना आमदार अशोक पाटील म्हणाले, ‘‘मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समवेत सदैव आहे. खरे तर धर्मकार्यातील बहुमूल्य वेळ काढून तुम्ही मला निवेदन द्यायला आला नसतात, तरी चालले असते. केवळ दूरभाष केला असता तरी, ‘मी तुमच्या पाठीशी आहे’, असे सांगितले असते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात