सनातनला खोट्या गुन्ह्यांत अडकवून तिची अपकीर्ती करण्याचे मोठे षड्यंत्र ! – आमदार अनिल परब, शिवसेना

डावीकडून सागर चोपदार, सुनील घनवट, निवेदन स्वीकारतांना आमदार अनिल परब

मुंबई, ४ सप्टेंबर (वार्ता.) – सनातनचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदुत्वाच्या कार्यात सनातनचे पुष्कळ मोठे योगदान आहे. हे काही लोकांना आवडत नाही. त्यामुळेच सनातनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर मी काही लोकांकडून माहिती घेतली. ज्या लोकांशी चर्चा केली, त्यांच्या बोलण्यातून एकच गोष्ट लक्षात आली आणि ते माझेही मत आहे की, सनातनला खोट्या गुन्ह्यांत अडकवून अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र चालू आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार श्री. अनिल परब यांनी केले. पुरोगामी मंडळी आणि काही राजकीय पक्ष यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची करण्यात येत असलेली अपकीर्ती, तसेच सनातन संस्थेवर करण्यात येत असलेली बंदीची मागणी या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे समन्वयक श्री. सुनील घनवट, मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी आमदार श्री. अनिल परब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी आमदार श्री. अनिल परब यांनी ‘याविषयी मी स्वत: लक्ष घालीन. जर सनातनबंदीचा विषय विधानभवनामध्ये आला, तर त्याला कडाडून विरोध करीन’, असे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात