सध्या तरी सनातनवर बंदीचा कोणताही विषय समोर नाही, आला तर निश्‍चित मुख्यमंत्र्यांशी बोलीन ! – आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजप

भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सांगली, ३ सप्टेंबर (वार्ता.) – आपण जेव्हा चांगले कार्य करतो, तेव्हा आरोप करणारेही असतात. अशा आरोपांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नाही. केरळ, कर्नाटक राज्यांत भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यावर कोणी बोलत नाही. सध्या तरी सनातनवर बंदीचा कोणताही विषय समोर नाही, तसा विषय आला, तर निश्‍चित मुख्यमंत्र्यांशी बोलीन, असे मत सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. विविध राजकीय पक्ष आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून होत असलेल्या सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असता, ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि श्री. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

कृत्रिम तलावाच्या संदर्भात आयुक्तांशी बोलू !

सांगली महापालिका क्षेत्रात श्री गणेशमूर्तीदान, तसेच कृत्रिम हौद ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी आमदार श्री. गाडगीळ यांना निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्तांनी या वेळी कृत्रिम तलाव करणार असल्याचे सूतोवाच केल्याचे आमदारांच्या कानावर घातल्यावर ‘त्या संदर्भात आयुक्तांशी बोलू’, असे आश्‍वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. या वेळी भाजप नगरसेवक श्री. प्रकाश ढंग यांनाही गणेशोत्सवाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात