सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही !

विजयपूर (कर्नाटक) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

विजयपूर (कर्नाटक) – येथील श्री सिद्धेश्‍वर देवस्थानाच्या प्रांगणात सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी १ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. तथाकथित विचारवंतांच्या हत्यांचा आरोप करत सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. त्याला या आंदोलनाद्वारे विरोध करण्यात आला. ‘कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करणार्‍या सनातन संस्थेवरील बंदीची मागणी अन्यायकारक आहे आणि ती कधीही सहन केली जाणार नाही. सनातन संस्थेवर बंदी घालून हिंदुत्वाच्या विचारधारेचा नाश करण्याचे षड्यंत्र निश्‍चितच विफल करू’, अशी चेतावणी  हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी दिली.

आंदोलनानंतर विजयपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये श्रीराम सेना, योग वेदांत समिती, धर्मसेना, विश्‍व हिंदू परिषद, श्री छत्रपती शिवाजी फाऊंडेशन, करूनाड जनबेंबल वेदिके, कर्नाटक रक्षण वेदिके, हिंदू जागरण वेदिके, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

१. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद म्हणाले, ‘‘कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी ‘गौरी लंकेश यांच्या हत्येमधे सनातन संस्थेचा हात असल्याचे सिद्ध झालेले नाही’, असे सांगूनही ‘सनातन संस्था आतंकवादी संघटना आहे, त्यावर बंदी घालावी’, अशी म्हणून मागणी करणे यातून साम्यवाद्यांचा सनातन संस्थेविषयी असलेला द्वेष उघड होतो. सनातन संस्थेवर आरोप करणे म्हणजे अन्वेषण यंत्रणांवर दबाव टाकून अन्वेषणाची दिशा भरकटवण्याचे षड्यंत्र आहे. काँग्रेस पुढार्‍यांचे साखर कारखाने, शिक्षण संस्था, देवस्थान कार्यकारी समिती यांमधील भ्रष्टाचार सनातन संस्थेने उघड केले असल्याने द्वेषाचे राजकारण भ्रष्ट काँग्रेसचे पुढारी करत आहेत. हेच पुढारी सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यामागे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ५ शहरी माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्याविषयी कोणीच बोलत नाही. केवळ सनातन संस्थेचा अपप्रचार करण्याचे षड्यंत्र आहे.’’

२. श्रीराम सेनेचे श्री. नीलकंठ कंदगल्ल म्हणाले, ‘‘सनातनविषयी खोट्या बातम्या छापून सनातनचा अपप्रचार करणे स्वार्थी, हिंदुद्वेषी राजकारण्यांचे षड्यंत्र आहे. देशात बॉम्बस्फोट, आतंकवाद, धर्मांतर आदी देशविरोधी कृत्य करणार्‍या धर्मांध संघटनांवर बंदी घालण्याची मागणी कोणीच करत नाही; परंतु राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे निषेधार्ह आहे. धर्मप्रसाराचे कार्य वैध मार्गाने करणारी सनातन संस्था हिंदु समाजाला आधारस्तंभ वाटते. सध्या लोकांच्या मते विचारवंत म्हणजे हिंदुविरोधी, असहिष्णुतेविषयी बोलणारे, अल्पसंख्यांकांपर्यंत सीमित असलेले आहेत. ‘नासा’सारख्या वैज्ञानिक संस्थेने रामसेतूविषयी सांगितले; परंतु काही पुरोगामी त्याच श्रीरामाविषयी विडंबनात्मक बोलतात आणि शिवलिंगाची अवहेलना करतात.

क्षणचित्र : आंदोलनासाठी काही हिंदुत्वनिष्ठ ६० ते १२० कि.मी. प्रवास करून आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात