हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’, तर माओवाद्यांना ‘विचारवंत’ संबोधणे, हाच खरा देशद्रोह ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेना हिंदूंच्या पाठीशी ठामपणे राहून देशहिताची भूमिका घेते, याचा हिंदूंना आधार वाटतो !

मुंबई – पोलिसांनी माओवाद्यांवर मोठे आक्रमण केले आहे. देशभरात छापे घालून मोठ्या प्रमाणात धरपकड केली आहे. ज्यांना अटक केली, त्या सगळ्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता आणि त्यांनी (भाजपची) सरकारे उलथवून टाकण्याचा कट रचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी समोर आणली आहे. पंतप्रधान मोदी यांना राजीव गांधी यांच्याप्रमाणे उडवायचा कट या मंडळींनी रचला होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तरीही या मंडळींचे समर्थन कसे काय होऊ शकते ? दुसर्‍या बाजूला काही हिंदुत्वनिष्ठ पोरे पकडली आणि त्यांच्यावर पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप ठेवल्याने हेच माओप्रेमी वेगळी नौटंकी करतात. हिंदुत्वनिष्ठांचा बीमोड केला पाहिजे, असे सांगतात. श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर वगैरे मंडळींना हिंदुत्वनिष्ठ ठार मारतील, अशी आवईसुद्धा उठवतात. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याचा कट रचत असल्याचे मान्य करायला मात्र माओवादी सिद्ध नाहीत. हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी, तर माओवादी म्हणजे विचारवंत, अशी दुटप्पी मांडणी करणे, हाच खरे तर देशद्रोह आहे, असे रोखठोक विचार शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ३ सप्टेंबरच्या दैनिक सामनामधील अग्रलेखातून व्यक्त केले आहेत.

श्री. उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की,

१. चिदंबरम् महाशयांनी आता तारे तोडले आहेत की, शहरी नक्षलवाद संकल्पना त्यांना मान्य नाही. चिदंबरम् यांना शहरी नक्षलवाद अमान्य आहे; मात्र याच महाशयांनी ‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना आणली आणि हिंदूंची अपकीर्ती केली.

२. कवी वरावरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, व्हरनॉन गोन्साल्वीस असे हे लोक विचारवंत आणि बुद्धीजीवी म्हणून गणले जातात अन् उच्चभ्रू वर्तुळात त्यांचा वावर आहे. थोडक्यात ही सर्व प्रतिष्ठित आणि वजनदार मंडळी आहेत. चीनमध्ये माओवाद वेगळ्या स्वरूपाचा आहे. तिथे सरकार स्थिर आहे. राज्य वगैरे उलथवून टाकण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांना तेथील कम्युनिस्ट सरकार विनाचौकशी कारागृहात डांबते आणि त्या व्यक्तीला गायब केले जाते. आपल्या देशात राजकारणी आणि विचारवंत यांची एक फळी या उद्योगी मंडळींच्या समर्थनासाठी उभी रहाते. राहुल गांधी यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत, प्रकाश आंबेडकर यांच्यापासून ते अखिलेश यादव यांच्यापर्यंत प्रत्येक जण पकडलेल्या माओवाद्यांच्या समर्थनासाठी छाती पिटत आहे.

३. दुर्गम भागात माओवाद्यांनी स्वतःची समांतर सरकारे चालवली आहेत; पण या सगळ्यांना वैचारिक बैठक देण्याचे काम शहरी भागातील ‘माओवादी’ करत आहेत. त्यांचे विचार हिंसक आणि विध्वंसक आहेत. त्यांना लोकशाही राज्यव्यवस्थेशी काही देणेघेणे नाही. राज्याराज्यांत अस्थिरता आणि अराजक निर्माण करणे, हाच त्यांचा उद्योग आहे. कोरेगाव भीमा येथे दंगल घडवून महाराष्ट्र पेटवण्यामागे हेच माओवादी होते आणि आग विझल्यावर आता त्यांना अटका झाल्या आहेत.

४. माओचा विचार घातक नाही; मात्र त्यातून निर्माण झालेला नक्षलवाद कश्मीरातील आतंकवादापेक्षा भयंकर आहे आणि देश पोखरत आहे. ‘कथित माओवाद्यांना अटक करू नये, त्यांना नजरकैदेत ठेवावे’, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला; मात्र हिंदु पोरांसाठी कुणी धर्मात्मा व्हायला सिद्ध नाही. सध्याच्या कारवायांत पाणी मुरते आहे, अशी शंका सगळ्यांनाच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात