(म्हणे) ‘सनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन, तर ती माझ्या कामाची पावती आहे !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – विचारांचे विरोधक विचारांनी लढत असतात; मात्र ज्यांच्याकडे विचारच नाहीत, असे लोक सूत्रे सोडून गुद्दे आणि मारहाणीवर उतरतात. सनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन, तर ती माझ्या कामाची पावती आहे. आजवर मी जो लढा दिला, त्याला मिळालेले हे यश आहे, असे मी मानतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. (केस डायरीत आव्हाडांसह अन्य जणांची नावे नव्याने घुसडल्याने न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांनाच फटकारले आहे. आव्हाड यांना हे ठाऊक नाही का ? – संपादक)

आव्हाड पुढे म्हणाले की,

१. माझ्या घराची रेकी करण्यात आली होती. मी याविषयी पोलिसांना कल्पनाही दिली होती. त्या वेळी कदाचित पोलिसांना त्याचे गांभीर्य कळले नव्हते; परंतु मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केले आहे.

२. तालिबानी संघटनांपेक्षा हे मनुवादी विचारांचे लोक मागे नाहीत. महात्मा गांधींचीही हत्याच करण्यात आली होती; मात्र त्यांचे पुतळे उभारले गेले, त्यांचा विचार देशाने आणि जगाने स्वीकारला. नथुरामाचे पुतळे उभारण्यात आले नाहीत. माणूस मारता येतो. त्याचे विचार मारता येत नाहीत. (दादोजी कोंडदेव यांचा पुण्यातून पुतळा हलवला गेला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध केला, ही आव्हाड यांना तालिबानी वृत्ती वाटत नाही का ? – संपादक)

३. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, तरी त्यांचे विचार कसे संपवता येतील ? अभंग रूपातून ते विचार आजही आपल्यात आहेत. (संत तुकाराम यांच्या जीवनातील घटनांचा सोयीनुसार आधार घेणारे आव्हाड त्यांचे अज्ञान आणि बौद्धिक दिवाळखोरी प्रकट करत आहेत ! – संपादक)

४. ज्या ४ विचारवंतांना ठार करण्यात आले, ते सर्व हिंदू होते, हा विचारही यांनी करू नये ? सनातनी, मनुवादी हे पाकिस्तानात जाऊन हाफिज सईदला का संपवत नाहीत ? (सनातन संस्था वैचारिक प्रतिवाद आणि सनदशीर मार्गाने कार्य करते. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने होणार्‍या राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत पाकिस्तानविरुद्ध शासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी सनातन संस्थाही करते. पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणार्‍यांचा सनातन संस्था वैध मार्गाने निषेध करून शासनाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करते, तर सनातनद्वेष्टे आव्हाड आतंकवादी इशरत जहाँची भलावण करतात ! – संपादक) त्यांच्या रक्तात या लोकांविषयी चीड का नाही ? ज्या पुरोगामी महाराष्ट्राने समाज सुधारणेचा विचार देशात रुजवला, त्या देशात असे प्रकार घडतात, हे दुर्दैव आहे. (ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ पातशाह्या मोडून काढल्या, त्या महाराष्ट्रात इशरत जहाँ आणि नक्षलवादी यांचे समर्थन होणे, हेच दुर्दैव आहे ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात