(म्हणे) ‘अशीच पत्रकार परिषद सनातनवरील आरोपांविषयी का घेतली नाही ?’ – राधाकृष्ण विखे पाटील

नक्षलवाद्यांच्या समर्थकांवरील कारवाईवरून राधाकृष्ण विखे पाटील यांना पोटशूळ !

मुंबई – विषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सरकारने पुढील निर्णय येईपर्यंत संयम बाळगायला हवा; या पश्‍चातही पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची भूमिका मांडली. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेण्याचे काहीच औचित्य नव्हते. याविषयी बोलायचेच होते, तर स्वत: मुख्यमंत्री किंवा गृहराज्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. त्याऐवजी परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घ्यायला ते सरकारचे प्रवक्ते आहेत का ? अशीच पत्रकार परिषद सनातनवरील आरोपांविषयी का घेतली नाही ? असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे उपस्थित केला. हा प्रकार राज्यशासनाच्या आदेशावरून चालू असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. (नालासोपारा प्रकरणानंतर आतंकवादविरोधी पथकानेही पत्रकार परिषद घेतली होती; मात्र या प्रकरणात सनातनचा कुठेही संबंध असल्याचे अन्वेषणात पुढे आलेले नाही, असे स्पष्ट त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे सांगितले आहे. असे असतांना सनातनला गुन्हेगार ठरवायचे आणि नक्षवाद्यांचे समर्थन करायचे, हा विखे पाटील यांचा सनातनद्वेषच होय ! याविषयी विखे पाटील यांची भूमिका संशयास्पद असून त्यांचेच अन्वेषण व्हायला हवे, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ? – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात