सनातनवर बंदीची मागणी हे षड्यंत्र ! – प्रमोद मुतालिक

श्रीराम सेनेच्या वतीने मंगळूरू येथे पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे पदाधिकारी

मंगळूरू, २ सप्टेंबर (वार्ता) – सीमेवर सैनिक हुतात्मा होत आहेत. आतापर्यंत भारतात सुमारे १० वैज्ञानिकांच्या हत्या झाल्या. प्रतिदिन हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. तशीच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; मात्र देशासाठी प्राणार्पण करणार्‍या सैनिकांच्या हौतात्म्याविषयी किंवा हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांविषयी कोणी बोलत नाही आणि केवळ एकाच हत्येवरून आंदोलने अन् मोर्चे काढण्यात येत आहेत आणि त्याद्वारे सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, अशा शब्दांत श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून तथाकथित पुरोगाम्यांचे वाभाडे काढले. या वेळी श्रीराम सेनेचे जिल्हा संघटन प्रमुख श्री. हरिश बोक्कपट्ण, दक्षिण कन्नडचे जिल्हाध्यक्ष श्री. जीवन नीरूमार्ग आणि अड्यार येथील प्रमुख श्री. आनंद शेट्टी उपस्थित होते.

१. सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी आणि देशभक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे.

२. नुकतेच श्री. वैभव राऊत यांच्या घरी स्फोटके सापडल्याची कथा रचून त्यांना अटक करण्यात आली; परंतु त्यांच्या घरी किती बॉम्ब सापडले याचा पंचनामा करावा, याचे सामान्यज्ञान आतंकवादविरोधी पथकाला नाही का ?

३. कर्नल पुरोहित यांना अटक करतांनाही त्यांनी ‘आर्.डी.एक्स्.’ पुरवल्याचे नाटक करून त्यांना अटक करण्यात आली होती; परंतु ते आता जामिनावर सुटले आहेत.

४. गौरी लंकेश यांची हत्या श्री. नवीन यांनी केल्याचे सांगण्यात आले. नंतर परशुराम वाघमारे आणि आता सुरेश यांनी हत्या केल्याचे सांगण्यात येते. पोलीस नवनवीन कथा रचत आहेत का ? अन्वेषणाच्या नावाखाली निष्पाप लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे का ?

५. ‘भगवा आतंकवादा’च्या नावाने काँग्रेस बाण सोडत आहे. हिंदूंमध्ये आतंकवाद नाही; परंतु तो निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात