सावंतवाडी येथे निषेध फेरीद्वारे हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय आणि सनातनवरील संभाव्य बंदीचा निषेध !

आम्ही सारे सनातन या घोषणेने परिसर दुमदुमला !

सावंतवाडी शहरातून मार्गस्थ होतांना निषेध फेरी

सावंतवाडी – डॉ. दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही हिंदुद्वेष्टी मंडळी आणि काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला नामशेष करू पहात आहेत. अध्यात्म आणि हिंदुत्व प्रसारात अग्रणी असल्यामुळेच हिंदुविरोधी शक्ती सनातन संस्थेचे कार्य दडपू पहात आहेत. कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेवरील बंदी आम्ही कदापि सहन करणार नाही.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी सावंतवाडी येथे निषेध मोर्च्याद्वारे रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली. या निषेध मोर्च्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्यासह ३५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

१ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सावंतवाडी शहरातून निषेध फेरी काढली. या फेरीच्या प्रारंभी माठेवाडा येथील श्री आत्मेश्‍वर मंदिरात श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घालण्यात आले. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या उपस्थितीत उभाबाजार, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल, पंचम खेमराज महाविद्यालय, नगरपालिका, श्रीराम वाचन मंदिर मार्गे बसस्थानकजवळ आल्यावर येथील प्रांत कार्यालयाजवळ फेरीची सांगता झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दैवेश रेडकर यांनी उपस्थितांना हिंदुत्वनिष्ठांवर होणारा अन्याय आणि सनातनवर बंदी आणण्यासाठी विरोधकांकडून केले जाणारे प्रयत्न यांविषयी अवगत केले.

हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन यांच्या विरोधातील अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

आम्ही सारे सनातन, सनातन !, सनातनवरील बंदीची मागणी बंद करा ! बंद करा !! अशा जोरदार घोषणांनी शहरातील परिसर दुमदुमून गेला होता.

क्षणचित्रे

  • फेरीच्या प्रारंभी पाऊस पडला; मात्र त्यानंतर फेरीची सांगता होईपर्यंत पाऊस पडला नाही.
  • येथील महाविद्यालयाजवळ फेरी आली असता महाविद्यालयातील मुले फेरीचे चित्रीकरण करत होती .
  • पोलिसांनी संपूर्ण फेरीचे चित्रीकरण केले.
  • फेरीच्या सांगतेच्या वेळी सद्गुुरूंचा श्‍लोक म्हणण्यास प्रारंभ झाल्यावर काही पोलीसही हात जोडून उभे होते.
  • या फेरीत डेगवे (सावंतवाडी) गावचे माजी सरपंच श्री. जयंत देसाई, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळकृष्ण देसाई, केसरी येथील शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. राघोजी सावंत आणि सावंतवाडी पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती दीक्षित गुरुजी सहभागी झाले होते.
  • फेरीची सांगता झाल्यानंतर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातनचे श्री. एकनाथ सावंत, श्री. शंकर निकम, श्री. राघोजी सावंत, श्री. खोळंबकर, श्री. चंद्रकांत बिले उपस्थित होते.
  • फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
  • फेरीत सहभागी युवावर्गाने आम्ही सारे सनातनचे फलक हातात घेतले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात