एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात घुसून चित्रीकरण करत खोट्या वृत्ताचे प्रसारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

  • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयीही खोटी माहिती प्रसारित

  • सनातनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्तांकडून एबीपी माझाचे संपादक आणि मालक यांना पत्र पाठवून निषेध !

एखाद्या मशिदीत घुसून तेथील चित्रीकरण करण्याचे धारिष्ट्य या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी केले असते का ? जमीन मऊ लागते; म्हणून कोपराने खणण्याचा हा प्रकार आहे ! इतर वेळी सनातनच्या साधकांना आतंकवादी आणि सनातनच्या आश्रमाला आतंकवाद्यांचे तळ म्हणणार्‍या वृत्तवाहिन्या साधकांच्या सौजन्याचा अपलाभ उठवून सनातनची अपकीर्ती करतात ! असे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्तसंपादक हे पत्रकारितेला कलंक आहेत !

एबीपी माझाचे प्रतिनिधी आश्रमात येणार, हे या वृत्तवाहिनीच्या संपादकांनी कळवले नव्हते. या प्रतिनिधींची डॉ. आठवले यांच्याशी भेटही झाली नाही. तरीही एबीपी माझा वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तामध्ये डॉ. जयंत आठवले यांनी भेटायला नकार दिला, असे धादांत खोटे प्रसारित केले. कहर म्हणजे वृत्तामध्ये आम्ही डॉ. आठवले यांची छबी टिपण्याचा प्रयत्न केला असता, ते आश्रमाच्या चौथ्या मजल्यावर गच्चीमध्ये शतपावली करतांना दिसले, असेही अत्यंत खोटे आणि चुकीचे वृत्त प्रसारित केले. (परात्पर गुरु डॉ. आठवले प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या खोलीतून बाहेरही पडू शकत नाहीत. प्रसारित केलेल्या वृत्तात आश्रमात वास्तव्य करत असलेले एक संत गच्चीत शतपावली करत होते. कोणतीही तसदी न घेता अशी खोटी वृत्ते प्रसारित करणारे पत्रकार सर्वच विषयांचे वृत्तांकन करत असतांना समाजभान राखत असतील का ?, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक)

सध्या सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यात येत असून विरोधकांकडून सनातनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर काही संत आणि हितचिंतक यांनी या काळात सनातनच्या आश्रमात येणार्‍या व्यक्तींविषयी खबरदारी पाळण्याची सूचना केली आहे.

रामनाथी (गोवा) – एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर आणि कॅमेरामन नीलेश यांनी २३ ऑगस्ट या दिवशी कोणतीही अनुमती न घेता येथील सनातनच्या आश्रमात घुसून आश्रमाचे चित्रीकरण केले. चित्रीकरण करू नये, असे  साधकांनी वारंवार विनंती करूनही कॅमेरा बंद आहे, असे खोटेच सांगितले; मात्र प्रत्यक्षात कॅमेरा चालूच ठेवून आश्रम परिसराचे, परिसरातील महिला साधकांचे, तसेच इमारतीच्या गच्चीवर चालत असलेल्या एका संतांचे चित्रीकरण केले. दुसर्‍या दिवशी म्हणजे २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता नमस्कार महाराष्ट्र या कार्यक्रमात याविषयीचे वृत्त प्रसारित केले. हे वृत्त प्रसारित करतांना डॉ. जयंत आठवले यांनी भेटायला नकार दिला, कॅमेरा बंद करण्यासाठी सनातनच्या साधकांनी दबाव आणला, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांची अपकीर्ती करणारी धादांत खोटी माहिती दाखवण्यात आली. याविषयी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी एबीपी माझाचे संपादक आणि मालक यांना पत्र पाठवून या पूर्ण प्रकाराचा निषेध केला आहे, तसेच याविषयी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेही नमूद केले आहे.

साधकांनी दबाव आणल्याचे खोटे वृत्त प्रसारित !

या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी त्यांची गाडी विनाअनुमती सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारातून थेट दुसर्‍या मजल्यापर्यंतच्या परिसरात नेली. छायाचित्रे काढणे आणि ध्वनीचित्रीकरण करणे, यांस मनाई आहे, असा फलक आश्रम परिसरात लावला असतांनाही या प्रतिनिधींनी या परिसराचे ध्वनीचित्रीकरण केले, तसेच सनातनच्या आश्रमात प्रवेश करतांना सनातनच्या साधकांनी प्रतिनिधींवर कॅमेरा बंद करण्यासाठी दबाव आणला, असे अत्यंत खोटे वृत्त प्रसारित केले. या प्रसंगाचे चित्रीकरण वाहिनीवर प्रसारित होत असतांना साधक हात जोडून विनंती करतांना दिसत आहेत. तरीही दबाव आणला, असे चुकीचे प्रसारित केले. वृत्ताच्या अंती आम्हाला आश्रमातून पिटाळून लावले, असेही म्हटले. (साधकांनी अशा प्रकारे दबाव आणला असता, तर एबीपीवाल्यांनी त्याचे चित्रीकरण करून साधकांची गुंडगिरी असे सांगत दिवसभर ब्रेकिंग न्यूज म्हणून हे वृत्त प्रसारित केले असते ! अशा प्रकारे एकांगी आणि खोटे वृत्त प्रसारित करून समाजाची उघडपणे दिशाभूल करणार्‍या वृत्तवाहिन्या कधी तरी समाजहित साधतील का ? – संपादक)

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकारांचा यापूर्वी आलेला कटू अनुभव !

यापूर्वी साधारण वर्ष २०१५ मध्येही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना संपूर्ण आश्रमाचे दर्शन घडवले होते. त्या वेळीही चित्रीकरणास मनाई असतांना या प्रतिनिधीने कॅमेरा चालू ठेवून काही प्रमाणात चित्रीकरण केल्याचे उघड झाले होते. (सनातन संस्थेने दाखवलेल्या सौजन्याचा अपलाभ घेऊन साधक आणि आश्रम यांच्याविषयी कपोलकल्पित कथा अनेक वेळा रचल्याचा कटू अनुभव सनातन संस्थेला आला आहे. याच कारणामुळे नाईलाजाने सनातन आश्रमाच्या विश्‍वस्तांना पत्रकारांना आश्रमात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला ! – संपादक)

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींसमवेत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनीही आश्रमात घुसून आश्रमाचे विनाअनुमती चित्रीकरण केले !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात