(म्हणे) सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही ? – राधाकृष्ण विखे पाटील

साखर कारखान्यातील घोटाळे उघड झाले आहेत,
मग राधाकृष्ण विखे पाटील यांचीच चौकशी का होऊ नये ?

कोल्हापूर – राज्यातील सर्वसामान्य मराठी कुटुंबातील तरुणांच्या हातात पिस्तुले, बॉम्ब पोहोचले आहेत. त्यातून विचारवंतांच्या हत्या होत असून सरकार अद्याप गप्प कसे ? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा संशयित मारेकरी सचिन अंधुरे संभाजीनगर येथील कपड्याच्या दुकानात नोकरी करतो. दुसरा आरोपी शरद कळसकर लेथ यंत्रणेवर काम करतो. डॉ. दाभोलकरांच्या विचारधारेशी तसूभरही संबंध नसतांना हे आरोपी थंड डोक्याने त्यांची हत्या करतात. याचाच अर्थ त्यांची डोकी कोणी तरी भडकावली असून तो महागुरु कोण ? असा प्रश्‍न उपस्थित करून या संदर्भात सनातन संस्था आणि त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही ? अशी विचारणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. ३१ ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमा लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला आहे. हैद्राबाद येथील कवी वरवरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देतांना विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या मुलीच्या घराची झडती घेतांना पुणे पोलिसांनी त्यांना तुम्ही हिंदू असतांना घरी देवतांऐवजी फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमा का लावता ?, असा संतापजनक प्रश्‍न केला.

 

(म्हणे) सनातन वरील कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठी डाव्या
विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली ! – खासदार सुप्रिया सुळे

नक्षलवाद म्हणजे काय, हे सुप्रिया सुळे यांना ठाऊक आहे का, याचीच चाचपणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या घोटाळेबाज नेत्यांविषयी सनातनद्वेषाने पछाडलेल्या सुप्रिया सुळे अवाक्षरही बोललेल्या नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई – सनातन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तके वाचायची हेसुद्धा सरकारने ठरवायचे का ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. पुणे पोलिसांनी नक्षली समर्थक असल्याच्या संशयातून देशाच्या विविध भागांमधून ५ जणांना नुकतीच अटक केली होती. या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकार यांना विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी न्यायालयाचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले. या वेळी पुण्याजवळील बोपदेव घाटात खड्ड्यांसमवेत सेल्फी घेऊन प्रसिद्धीमाध्यमांसमोर प्रसिद्धीची हौस भागवून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात