जळगाव येथील मोर्च्यात सनातनवरील बंदीच्या मागणीला हिंदुत्वनिष्ठांचा जोरदार विरोध !

जळगाव येथील सनातनवरील संभाव्य
बंदीच्या विरोधात मोर्च्याला ३५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित

सनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव – डॉ. दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही हिंदुद्वेष्टी मंडळी आणि काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पकडण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांपैकी एकही सनातन संस्थेचा साधक नाही. ‘आतापर्यंतच्या अन्वेषणात कोणत्याही संस्थेचा संबंध असल्याचे उघड झालेले नाही’, असे आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तर गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनीही तपास प्राथमिक अवस्थेत असल्याचे सांगितले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनीही गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना गेल्या २७ वर्षांपासून धर्मप्रसार, धर्मजागृती, धर्माचरण, अध्यात्म, राष्ट्र-धर्माचे कार्य करणार्‍या संस्थेवर खोटे आरोप करून बंदीची मागणी करणे अयोग्य आहे. सनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी येथील मोर्च्याच्या वेळी केले.

जळगाव – १ सप्टेंबर या दिवशी ‘सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती’ या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी भव्य निषेध मोर्चा काढला. यात ३०० हून अधिक जण संघटित झाले होते. ‘आम्ही सारे सनातन, सनातन !’, ‘बंद करा, बंद करा, सनातनची बदनामी बंद करा’ यांसारख्या घोषणा देत रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनवरील बंदीच्या मागणीला जोरदार विरोध केला.

पत्री हनुमान मंदिर येथून श्री हनुमानाच्या पूजनाने मोर्च्याला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता होऊन मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी मान्यवरांनी मोर्च्याला संबोधित केले. शेवटी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने श्री. कुलकर्णी यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. मोर्च्याचे ‘फेसबूक’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याचा ५० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.

दोन दिवसांपूर्वी या मोर्च्याचा प्रसार करण्यासाठी ‘देश का युवा सनातनके साथ’ या विषयावर एक व्हीडिओ फेसबुकवरून प्रसारित करण्यात आला होता. तो ४५ सहस्त्रांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला.

सनातन संस्था ही आध्यात्मिक दृष्टीने हिंदु धर्माला दिशा देण्याचे कार्य करत असून या संस्थेने राष्ट्र आणि धर्मसेवा केली आहे. अशा सनातन संस्थेच्या बंदीचा मी विरोध आणि निषेध करतो.

– ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, जळगाव

हिंदूंवर होणारा अन्याय दूर झालाच पाहिजे. त्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. अन्यथा पुरोगाम्यांच्या बळावर अन्य धर्मीय आपल्यावर अन्याय करतच रहातील. हिंदु धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे.

– ह.भ.प. नाना कुलकर्णी महाराज, प्रिंप्राळा, जळगाव

सनातनला माझा पूर्ण पाठिंबा आहे ! – आमदार सुरेश भोळे, भाजप

व्यक्ती दोषी आढळली म्हणून पूर्ण संस्थेला अपकीर्त करणे अयोग्य आहे. मी या मोर्च्यात आमदार म्हणून नव्हे, तर एक ‘हिंदु’ म्हणून सहभागी झालो आहे. भारत हा हिंदु राष्ट्र होता आणि आहे. सनातनला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

सूर्यरूपी ‘सनातन’वर कोणीही बंदी आणू शकत नाही ! – ह.भ.प.
मुकेश महाराज पारगावकर, अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष

सूर्य हा उगवतांनाही भगवा असतो आणि मावळतांनाही भगवा असतो. त्याप्रमाणे सनातन संस्थेचे कार्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असून सनातनवर बंदी येऊच शकत नाही.

देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठिंब्याचा विचार केल्यास
सनातनद्वेष्ट्यांना निश्‍चितपणे चपराक बसेल ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रसारमाध्यमे पुरेसे पुरावे नसतांनाही सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था एकटी नसून सनातन संस्थेला केवळ जळगावसारख्या एका जिल्ह्यातून ३५ हून अधिक संघटनांचा पाठिंबा लाभलेला आहे. संपूर्ण देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठिंब्याचा विचार केल्यास सनातनद्वेष्ट्यांना निश्‍चितपणे चपराक बसेल.

शिवसेना कालही सनातनच्या पाठीशी होती, आजही आहे
आणि यापुढेही रहाणार ! – गजानन मालपुरे, ग्राहक संरक्षण मंच जिल्हाध्यक्ष, शिवसेना

सनातनवर बंदीची मागणी नवीन नाही. यापूर्वीच्या सरकारने केलेली मागणी पोकळ ठरली. शिवसेना कालही सनातनच्या पाठीशी होती, आजही आहे, यापुढेही रहाणार. श्री. उद्धवजी ठाकरे यांनीही सनातनला पाठिंबा दिला आहे.

क्षणचित्रे

  • मोर्च्यात आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • जळगाव तालुक्यातील आवार, डिकसाई या ग्रामीण भागातून हिंदुत्वनिष्ठ ट्रॅक्टरने येऊन मोर्चात सहभागी झाले होते. त्यात तरुणी अन् महिलांचा मोठा सहभाग होता.

सनदशीर मार्गाने कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर पाळत ठेवणारे पोलीस !

मोर्च्याच्या वेळी साध्या वेशातील पोलीस सहभागी सर्वांचे चित्रीकरण तसेच छायाचित्र काढत होते. मोर्चा संपल्यानंतर एक घंट्यानंतर साध्या वेशातील पोलीस सनातनच्या सेवाकेंद्रापर्यंत येऊन चित्रीकरण करत होते. (आतंकवादी देशात थैमान घातलेले नक्षलवादी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एवढा वेळ दिला असता, तर एव्हाना त्यांची पाळेमुळे खणून काढता आली असती ! – संपादक)

सहभागी संघटना, संप्रदाय, पक्ष

हिंदु विधीज्ञ परिषद, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, शिवसेना, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, भाजप आध्यात्मिक आघाडी, रणरागिणी शाखा, जय माता दी ग्रुप, गोसेवा परिवार, स्वराज्य निर्माण सेना, शिवगंध ढोल पथक, करणी सेना, अखिल भारतीय वारकरी मंडळ, पुरोहित संघ, परशुराम सेवा समिती, शिवतांडव प्रतिष्ठान, संत श्री गजानन महाराज भक्त मंडळ, हिंदु जनजागृती समिती, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, जय लेवा ग्रुप (भुसावळ), जय श्रीराम

सहभागी मान्यवर

आमदार श्री. सुरेश भोळे, श्री. गजानन मालपुरे, ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर, अधिवक्ता दिपक वाघ, श्री. आकाश फडे, श्री. समाधान पाटील, ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, सौ. क्षिप्रा जुवेकर, श्री. विशाल जगदाळे, श्री. राज नागदेव, श्री. रोहित महाले, श्री. परेश शिनकर, श्री. महेंद्रसिंह पाटील, श्री. यश केंग्राणी, श्री. भूषण मुळे, श्री. सागर कापुरे, श्री. नितीन चौधरी, श्री. घन:श्याम तेली, श्री. ललित सोनवणे, श्री. प्रशांत जुवेकर, श्री. दत्तात्रेय वाघुळदे

मोर्च्याच्या अग्रभागी असलेला लक्षवेधी सजीव देखावा !

नक्षलवादी, प्रशासन आणि चोर यांची युती असून ते मोकाट हिंडतात, तर हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना, साधकांना मात्र कारागृहात वर्षानुवर्षे कारागृहात नाहक खितपत रहावे लागते. असा संदेश देणारा जिवंत देखावा मोर्च्याच्या अग्रभागी सादर करण्यात आला होता.या देखाव्याने अनेक व्यक्ती, पत्रकार, छायाचित्रकार यांचे लक्ष वेधून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात