(म्हणे) ‘डॉ. आठवले यांना अटक करा !’ – शाम मानव

शाम मानव यांचे विद्वेषी आणि नेहमीचेच तुणतुणे !

मुंबई – साधकाला अटक केल्यावर त्यांचा नि आमचा काहीही संबंध नसल्याची पुडी सोडणे ही सनातन संस्थेची कार्यपद्धती असल्यामुळे यावर विश्‍वास न ठेवता आतंकवादविरोधी पथकाने मास्टरमाईंड डॉ. जयंत बाळाजी आठवले याना अटक करावी, अशी विद्वेषी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. (आतंकवादविरोधी पथकाच्या प्रमुखांनी या प्रकरणात सनातनचे नाव कुठेही घेतलेले नाही. नास्तिकवाद्यांना सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य सलत असल्यानेच ते सनातनद्वेषापोटी अशी मागणी करत आहेत, असे म्हटल्यास चूक ते काय ? अन्वेषण यंत्रणांपेक्षा आपल्याला अधिक समजते असा आव आणून, स्वत:च न्यायाधीशांच्या भूमिकेत जाऊन शाम मानव दबाव निर्माण करण्याचा आणि तपासाची दिशा भरकटवण्याचा  प्रयत्न करत आहेत ! – संपादक)

शाम मानव पुढे म्हणाले की,

१. कर्नाटक पोलिसांची महाराष्ट्रात धरपकड वाढल्यावर इथले पोलीस वेगवान झाले, हे खरे असले, तरी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक करत असलेल्या तपासाविषयी मी समाधानी आहे. (खरा आरोपी सापडण्यापेक्षा हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्यानंतर समाधान व्यक्त होते, यातूनच शाम मानव यांचा हिंदुद्वेष उघड होतो ! – संपादक)

२. सनातनवर बंदी घालून आठवले यांना अटक करणे याला पोलिसांनी प्राधान्य दिले नाही, तर आगामी काळात सनातन शेकडो व्यक्तींना धर्मद्रोही ठरवून त्यांची हत्या घडवून आणेल. (सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या शाम मानव यांनी लावलेला जावईशोध ! परात्पर गुरु डॉ. आठवले सनातन संस्थेच्या कोणतेही विश्‍वस्त, पदाधिकारी पदावर नाहीत. नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप असणार्‍या अंनिसच्या संस्थापकांनी अशी मागणी करणे हेच मुळी हास्यास्पद आहे ! – संपादक )

३. हे सरकार हिंदुत्वनिष्ठ विचारांचे असल्यामुळे सनातन, हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना यांसारख्या कट्टर आणि देशाला घातक असणार्‍या संघटनांवर कारवाई शक्य आहे.

४. खून करून खुनाचा कट, योजना मारेकर्‍यांच्या मेंदूत रहाणार नाही अशी स्मृती पुसून टाकण्याची कला संमोहनातून केली जाऊ शकते. ४ जणांच्या हत्येत हीच पद्धती वापरण्यात आली. (‘खोटे बोल परंतु रेटून बोल’ या वृत्तीवर दृढ श्रद्धा बाळगणारे मानव ! मानवाला सूचना देऊन त्याच्या संस्कारांच्या विरोधातील किंवा गुन्ह्यासारख्या गोष्टी करवून घेता येऊ शकत नाही. असे काही करता येते, असा अपप्रचार करणे, हीच मोठी अंधश्रद्धा आहे. – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात