हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेवर बंदीच्या विरोधात निषेधमोर्चा !

तहसीलदारांना निवेदन देतांना १. श्री. गुरुप्रसाद गौडा आणि मोर्च्यात सहभागी झालेले धर्माभिमानी

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीविरुद्ध ३० ऑगस्ट या दिवशी हुब्बळ्ळी येथे निषेधमोर्चा काढण्यात आला. शहरातील दाजिबान पेठेतील श्री दुर्गादेवी मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता तहसीलदार कार्यालयानजीक झाली. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्च्यामध्ये एस्.एस्.के. समाज, ज्ञानगंगा, बजरंग दल, विजयनगर महिला मंडळ, गीतांजली परिवाराचे सदस्य, श्री. अमित बद्दी यांच्या मातोश्री, श्री. गणेश मिस्किन यांच्या मातोश्रींसह २७५ लोक सहभागी झाले होते.

१. प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी मोर्च्याचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे निघाला. तहसीलदार कार्यालयाजवळ मोर्चा थांबवल्यावर येथे मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले.

२. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथक आणि कर्नाटकातील विशेष अन्वेषण पथक यांच्याकडून होत असलेल्या अन्याय्य कारवाईविषयी उपस्थितांना अवगत केले. तसेच हिंदुत्वनिष्ठांवरील आरोप फेटाळून लावले.

३. या प्रसंगी एस्.एस्.के. हितवर्धक संघाचे अध्यक्ष श्री. हनुमंतसा निरंजन म्हणाले, ‘‘सनातन संस्था समाजाला अध्यात्माचे धडे देऊन चांगल्या मार्गाने जीवन कसे जगावे, हे सांगणारी संस्था आहे. या संस्थेने आजपर्यंत कुणालाही मारहाण करण्यास सांगितलेले नाही. हिंदु धर्माचरणाप्रमाणे जीवन जगल्यास सुंदर आणि आनंदाने जीवन जगता येते, यासाठी संस्था सदैव झटत आहे. आपण विसरत चाललेलो कुंकवाचे महत्त्व, पूजापाठाचे महत्त्व, गणेशोत्सव शास्त्रोक्त पद्धतीने कसा साजरा करावा ?, हे निरंतर सांगत आहे. अशा संस्थेवर आरोप करून त्यावर बंदी घालण्याच्या षड्यंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो.’’

३. त्यानंतर माजी महापौर सौ. सरळा भांडगे यांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीचा निषेध केला, तसेच ‘खोट्या आरोपाखाली हिंदु कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार त्वरित न थांबवल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली.

क्षणचित्रे

१. मोर्च्याला प्रारंभ होण्याच्या १ घंटा आधी आकाशात पुष्कळ ढग होते; परंतु परमेश्‍वराच्या आशीर्वादाच्या रूपात मोर्च्यावर केवळ पावसाचे काही शिंतोडे पडले. तसेच मोर्चा संपतांना भगवंताच्या कृपाशीर्वादाप्रमाणे थोडा पाऊस पडला. सर्व जण शेवटपर्यंत थांबले.

२. एका महिला मंडळाने मोर्च्याच्या आयोजकांना ५ सप्टेंबरला असलेल्या त्यांच्या कार्यक्रमात हा विषय मांडण्यास सांगितले. त्यासाठी अधिक वेळ देण्याची सिद्धता त्यांनी दर्शवली.

३. मोर्च्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी १७ दैनिकांचे, तर १३ वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात