‘सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही !’ – उद्योगपती रवि कामत

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे धर्माभिमान्यांकडून पत्रकार परिषद

डावीकडून श्री. विश्‍वनाथ, अधिवक्ता दिवाकर, श्री. रवि कामत, श्री. परिसरा रमेश आणि श्री. सुधाकर मोगेर

शिवमोग्गा – सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला खोट्या आरोपात अडकवून तिच्यावर बंदी घालणे, हे समाज कधीच खपवून घेणार नाही, अशी चेतावणी उद्योगपती श्री. रवि कामत यांनी येथे ‘समस्त हिंदु ऐक्या’ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला अधिवक्ता दिवाकर, पर्यावरणवादी श्री. परिसरा रमेश, योगशिक्षक श्री. सुधाकर मोगेर आणि ‘वीर शिवप्प नायक अभिमानी बळग’ संघटनेचे श्री. विश्‍वनाथ हे उपस्थित होते.

श्री. रवि कामत पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील लोकांना सण, पूजेमागील शास्त्र, कुलदेवतेची उपासना, हिंदु संस्कृतीतील आचार-विचार यांविषयी धर्मशिक्षण देत आहे. आम्हालाही असे विचार संस्थेकडून समजून घेऊन उत्तम जीवनपद्धती आचरण्यास साहाय्य झाले आहे. अलीकडे काही दिवसांपासून पुरोगामी लोक गौरी लंकेश यांच्या हत्येच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या काही युवकांचा संबंध सनातन संस्थेशी जोडून सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ सिद्ध करून संस्थेवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सनातन संस्थेविरुद्ध एकही पुरावा आजपर्यंत मिळालेला नसतांना तिच्यावर बंदीची मागणी करणे म्हणजे सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट आहे, असे वाटते. सनातन संस्थेवर खोटे आरोप करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेषण निष्पक्षपातीपणे करावे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात