सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवू नका ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वप्रेमी विचारसरणीमुळेच सनातन संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार्‍या शिवसेनेचा आम्हाला अभिमान वाटतो !

लोकसत्तासारख्या वृत्तपत्राने २९ ऑगस्टच्या अंकात पृष्ठ १ वर कथित नक्षलवादी समर्थकांचे अटकसत्र, अशा मथळ्याखाली नक्षलप्रेमींच्या अटकेचे सूत्र प्रसारित केले, तर त्याच पानावर हिंदु कट्टरपंथीयांच्या घातपाताचे मनसुबे उघड असे वृत्त प्रसारित केले. भारतीय प्रसारमाध्यमांसाठी नक्षलवादी हे तथाकथित असतात आणि हिंदू हे कट्टरपंथी असतात ! यालाच निधर्मी पत्रकारिता म्हणायचे का ?

मुंबई – काँग्रेस राजवटीत ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाने खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदु दहशतवादाची बांग दिल्यावर भाजपने संसद आणि रस्त्यावर थैमान घातले होते. महाराष्ट्र आणि देहली येथे भाजपचे राज्य असूनही ‘हिंदु दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत. त्याविषयी सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका, एवढेच आमचे सांगणे आहे; कारण उद्या देशावर संकट येईल, तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ३० ऑगस्टच्या सामनामधील ‘हिंदु दहशतवादी ?’ अग्रलेखात केले.

अग्रलेखात श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की,

१. सनातन नामक संस्थेने पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी मंडळींचे खून केले आणि त्यासाठी या संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र तशी बंदी आधीच घालून सरकारने या सर्व मंडळींना जेरबंद का केले नाही ?

२. यापूर्वी समीर गायकवाड नामक तरुणास पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आले. त्याच्यावर आरोपपत्रही प्रविष्ट केले गेले. असे आहे, तर त्याच प्रकरणात हे नवे लोक कसे पकडले ? सध्यातरी आतंकवादविरोधी पथक जे सांगेल, तेच खरे असे मान्य करावे लागत आहे.

३. जे नक्षलवादी समर्थक मान्यवर आता पकडले गेले आहेत, त्यांना कथित नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे आणि अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा उल्लेख मात्र थेट हिंदु कट्टरपंथीय असा केला जात आहे. मुळात पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येमागे समान धागा आहे का ?, हे सिद्ध व्हायचे आहे.

४. मुळात हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात विशेष करून मोदी-फडणवीस यांच्या राज्यात दहशतवादी बनावे लागत असेल, तर कमालच म्हणावी लागेल. काश्मीर खोर्‍यातून ज्या हिंदूंना पलायन करावे लागले, त्यांनीही हाती शस्त्र घ्यायला हवे होते, तरच ते टिकले असते; मात्र त्यांना आतंकवादी बनायचे नव्हते. हिंदूंची मानसिकता ही अशी आहे.

५. गुजरात दंगलीतील एक आरोपी अमित शहा यांना हिंदुत्वाच्या प्रकरणात कारावास भोगावा लागला आणि आता ते राष्ट्रीय नेते झाले, म्हणजे हिंदुत्ववाद हा दहशतवाद किंवा कलंक नाही. शमीच्या झाडावरील शस्त्रेही तो १४ वर्षे काढत नाही, तिथे ही मिसरूड फुटलेली पोरे शस्त्रसाठा जमवतील काय ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात