(म्हणे) ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रा.स्व. संघ यांना वाचवण्यासाठी शासनाकडून कारवाई !’ – हसीना खान, आवाज-ए-निशाण

  • आता प्रसिद्धीमाध्यमे ‘मीडिया ट्रायल’ चालवणार का  ?
  • माओवाद्यांच्या समर्थकांच्या संशयावरून अटक झालेल्यांचे समर्थन करून सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्याचा पुरोगाम्यांचा प्रयत्न !

मुंबई – ज्यांच्या घरामध्ये बॉम्ब, रिव्हॉल्व्हर, स्फोटके मिळाली, त्या सनातन संस्थेविषयी प्रसारमाध्यमांसह सर्वांना माहिती आहे. सनातन संस्थेचे कार्यालय, घरे यांमध्ये बॉम्ब, रिव्हॉल्व्हर, गन मिळतात, हे देशाला धोकादायक नाही का ? त्यांच्यावर आतंकवादी कारवायांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला जात नाही; मात्र आमच्या साथींच्या घरी केवळ पुस्तके सापडली, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. हे धोकादायक आहे. ही ‘फॅसिस्ट’ कारवाई असून हे शासन हिटलरपेक्षाही धोकादायक आहे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना वाचवण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे, असे बेताल वक्तव्य आवाज-ए-निशाण या संघटनेच्या कार्यकर्त्या हसीना खान यांनी केले. माओवाद्यांना सहकार्य करत असल्याच्या संशयावरून मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अटक केलेल्या ६ पुरोगाम्यांच्या समर्थनासाठी आणि शासनाच्या निषेधासाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील, अधिवक्ता मिहिर देसाई यांसह विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सरकारच्या विरोधात बोलणारे मागासवर्गीय, मुसलमान, पुरोगामी यांना शासन लक्ष्य करत आहे. सध्याचा काळ हा आणीबाणीपेक्षाही धोकादायक आहे. माओवाद्यांच्या नावाखाली पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे, त्यांना नक्षलवाद्यांकडून पैसा पुरवण्यात येत होता, असा आरोप आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीमध्ये ज्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांची नावे पुढे आली; मात्र शासनाने संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिली. त्यांच्यावर सौम्य कलमे लावली; मात्र विविध सामाजिक कार्य करणार्‍या आमच्या साथींवर गंभीर कलमे लावण्यात आली.’’

 

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचा सनातनद्वेष !

(म्हणे) ‘सनातन संस्थेचे साधक रेटून खोटे बोलतात, संविधानाला मानत नाहीत !’

कोळसे पाटील म्हणाले की, सनातन संस्थेमध्ये जे बॉम्ब निघत आहेत, ते पूर्वीपासून चालू आहे. सनातनच्या आश्रमातील प्रमुखांपर्यंत चौकशी व्हायला हवी; मात्र जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे अटकसत्र करण्यात आले. सनातन संस्थेचे साधक खोटे बोलतात आणि रेटून बोलतात. ते संविधान मानत नाहीत. त्यांना हिंदु राष्ट्र आणायचे आहे.

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांची कोल्हेकुई !

(म्हणे) ‘भिडे आणि एकबोटे यांच्या सुटकेसाठी नक्षलवादाशी संबंध लावण्याचा प्रयत्न !’

नक्षलवादाच्या आरोपाखाली ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचा आणि एल्गार परिषद यांचा सुतराम संबंध नाही. एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून पैसा पुरवठा करण्यात आला, हा आरोप १०० टक्के खोटा आहे. केवळ भिडे आणि एकबोटे यांना सोडवण्यासाठी आमचा नक्षलवाद्यांशी संबंध लावण्याचा शासन प्रयत्न करत आहे. एल्गार परिषदेमध्ये आम्ही ‘संघप्रणीत भाजपला मत देऊ नका’, असे सांगितले. आम्ही देशभर असे सांगत फिरतो. त्यामुळेच माझी अपकीर्ती करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात