सनातनवरील संभाव्य बंदीला विरोध करून समाजासमोर सनातनविषयीचे सत्य मांडणार्‍या बोलक्या प्रतिक्रिया !

पनवेल – सनातन हा शब्दच अतीप्राचीन आहे. सनातन संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचून धर्मजागृती करण्याचे कार्य करते. या संस्थेचे कार्य अफाट आहे, असे मत येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती पू. भाऊ घरत यांनी व्यक्त केले.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात २८ ऑगस्ट या दिवशी त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद पोशे उपस्थित होते. या वेळी पू. भाऊ घरत यांचे अनेक भक्त उपस्थित होते. त्यांनी भक्तांना ३० ऑगस्ट या दिवशी पनवेल येथे होणार्‍या सनातन बंदीच्या मागणीच्या विरोधात होणार्‍या मोर्च्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

धर्मजागृती झाली की त्याला विरोध करणार्‍या संस्था, पक्ष, संघटना उभ्या रहातात. बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात पैसा येऊन हिंदु धर्माला नष्ट करण्याचे काम केले जात आहे. काही राजकीय पक्षही त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर हिंदु धर्मावर आघात होत आहेत. हिंदु धर्मच आज सर्व लोकांच्या डोळ्यांत का खुपत आहे ? बाकीचे धर्म, हे धर्म नसून पंथ आहेत. त्यांच्या संपण्याची तारीख आहे. हिंदु धर्म ईश्‍वरनिर्मित असल्याने तो नाशवंत नाही. या धर्मात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, धर्माला ग्लानी येते तेव्हा मी पुन्हा येणार; पण आपल्या हृदयातील कृष्ण आपण जागृत केला नाही, तर तो भगवान श्रीकृष्ण तरी काय करणार ? आपल्यातील भगवंताला जागृत करायला हवे. आज आपल्या धर्मावर गदा येत असतांना आपण धर्मरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. ही काळाची आवश्यकता आहे. आपण आपल्यामध्ये धर्मजागृती करून धर्मरक्षण, हिंदु धर्माचे संस्कार आणि संस्कृती टिकवली पाहिजे. त्यासाठी धर्मावर आघात करण्यार्‍यांच्या विरोधात आज रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे. तरच हिंदु धर्म टिकेल.

 

पुणे येथील सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांच्या भावना

आम्ही सनातनच्या पाठीशी आहोत !

पुणे – अन्वेषण यंत्रणांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेनंतर प्रसिद्धीमाध्यमांमधून सनातन संस्थेच्या विरोधात वातावरण कलुषित करण्यात येत आहे. कथित पुरोगामी आणि हिंदुत्वविरोधक यांच्याकडून संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे; मात्र वाचक, हितचिंतक, विद्यापनदाते यांनी मात्र सनातनला खंबीर पाठिंबा दर्शवला आहे.

एवढ्या पावसात तुम्ही आलात, हे पुष्कळ कौतुकास्पद आहे. सध्या जे चालले आहे, ते राजकारण आहे. तुम्ही खंबीरपणे आणि आत्मविश्‍वासाने उभे रहा. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत.

– श्री. समीर कुलकर्णी, उद्योजक, वेळू

प्रथम मी हिंदु आहे. शिवसेनेचा कडवा हिंदु आहे. जे चालले आहे, ते सर्व राजकारण आहे. आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव राहू. काही अडचण आली, तर कधीही या.

– श्री. महेश नलवडे, शिवसैनिक आणि शिवापूर येथील पथकर नाक्याचे व्यवस्थापक

मी रात्रंदिवस सनातनच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. कधीही काही अडचण आली, तर हाक मारा. मी तुमच्या समवेत आहे.

– श्री. रमेशबापू कोंडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

सनातन संस्थेवर शासनाने बंदी न आणता तिच्या विचारांचा
अभ्यास करावा ! – महेश आचार्य उत्पात, सनातन वैदिक धर्म मंडळ, पंढरपूर

सनातनवरील बंदी म्हणजे पवित्र सीतामातेला रावणाने लंकेत बंद केल्याप्रमाणे आहे. सनातन संस्थेवर शासनाने बंदी न आणता तिच्या विचारांचा अभ्यास करावा. सनातनवर बंदी घातल्यास येत्या निवडणुकांमध्ये सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील.

भाजपच्या नगरसेवकांची प्रतिक्रिया

भाजपचे कर्वेनगर येथील नगरसेवक श्री. सुशीलकुमार मेंगडे यांनी स्वतःहून सनातनच्या साधिकेला भ्रमणभाष करून आस्थेने चौकशी केली आणि म्हणाले, सध्या वृत्तपत्रात जे वाचत आहोत, त्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही झाला ना ? काही साहाय्य लागले किंवा अडचण आली, तर कळवा.

सनातन संस्थेवरील बंदीची मागणी म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी द्या,
असे म्हणण्याचा प्रकार ! – रामकृष्ण वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ

भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी गेली १६ वर्षे सातत्याने प्रबोधन आणि प्रयत्न करणारी, प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती स्थापनेचा आग्रह धरून धर्मशास्त्र आणि निसर्ग समतोलाचा समन्वय विचार रुजवण्यासाठी पुढाकार घेणारी, आपली कोणतीही धर्मसभा, प्रचारफेरी कायदेशीर अनुमती पूर्ण करूनच अर्थात कायद्याचे तथा संविधानाचे पालन करत हिंदु धर्मजागृती, प्रथा परंपरा यांचे पालन करणे  यासाठी कार्य करणारी एकमेव हिंदुत्वनिष्ठ संस्था म्हणजे सनातन संस्था आहे. हे कार्य करत असतांना सनातनच्या साधकांची केवळ भगवंताच्या नामसाधनेच्या बळावर भक्कम वाटचाल चालू आहे. अशा देव, देश आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या संस्थेवर काही बुद्धीभेदी लोकांद्वारे होत असलेली बंदीची मागणी म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी द्या, असे म्हणण्याचा प्रकार वाटतो.

सत्यमेव जयते । यावर आमचा दृढ विश्‍वास असून प्रामाणिक आणि निष्काम भावनेने काम करणार्‍या सनातन संस्थेच्या निःस्पृह साधकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात