गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठाशी सनातनचा संबंध असल्याचे दाखवण्यासाठी ‘पुणे मिरर’कडून धादांत खोटे वृत्त प्रसारित !

सनातनची अपकीर्ती करण्यासाठी ‘पुणे मिरर’सारखी वृत्तपत्रे कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे ! अशी वृत्तपत्रे समाजहित काय साधणार ?

मुंबई – गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमारे हे सनातनशी संबंधित आहेत, हे दाखवण्यासाठी ‘पुणे मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने धादांत खोटे वृत्त प्रसारित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘पुणे मिरर’वर संबंधितांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी विविध चर्चासत्रे, तसेच विविध प्रसिद्धीपत्रके यांच्या माध्यमांतून ‘अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांपैकी सर्वश्री वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर हे सनातनचे साधक नाहीत; परंतु सनातन संस्था अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात’, हे अनेक वेळा स्पष्ट केले आहे. हे सूत्र खोडून काढण्यासाठी आणि ‘हे सर्व सनातनचे साधक आहेत’, हे दाखवण्याच्या अट्टाहासापायी ‘पुणे मिरर’ने २९ ऑगस्ट २०१८ या दिवशीच्या अंकात  सनातन प्रभातमध्ये प्रसारित होणार्‍या दैवी बालकांच्या सदरातील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. आदित्य वाघमारे याच्या लेखाची छायांकित प्रत प्रसारित केली आहे. असे करतांना वृत्तात ‘कु. आदित्य वाघमारे हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारे यांचा मुलगा आहे’, असे धादांत खोटे वाक्यही ‘पुणे मिरर’ने प्रसारित केले आहे. वास्तविक कु. आदित्य आणि श्री. परशुराम वाघमारे यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर कु. आदित्य याचे पालक ‘पुणे मिरर’वर कायदेशीर कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहेत.

‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीचाही खोटारडेपणा उघड !

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीनेही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असणारा कु. आदित्य वाघमारे हा अटकेत असणारे परशुराम वाघमारे यांचा मुलगा आहे, असे धादांत खोटे वृत्त ३० ऑगस्ट या दिवशी प्रसारित केले. (असे वृत्त दाखवण्यापूर्वी ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीने कुणाकडे निश्‍चिती केली होती का ? सनातनद्वेषाने पछाडलेली अशी वृत्तवाहिनी तत्त्वनिष्ठ पत्रकारिता काय करणार ? – संपादक) खोटे वृत्त दाखवल्याप्रकरणी सनातन संस्था ‘टीव्ही ९ मराठी’च्या विरोधात अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात