छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान भक्त असणारा अविनाश गैरकृत्य करणारच नाही ! – अविनाश पवार यांचे मित्र आणि शेजारी यांचे ठाम प्रतिपादन

नालासोपार्‍याच्या अनुषंगाने अविनाश पवार यांना अटक केल्याचे प्रकरण

मुंबई – घाटकोपर येथून हिंदुत्वनिष्ठ अविनाश पवार यांना अटक केल्यावर ‘धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत नेहमीच पुढाकार घेणारा अविनाश गैरकृत्य करणारच नाही’, असे त्याचे शेजारी आणि मित्र ठामपणे सांगत आहेत. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान भक्त आहे, बॉम्ब बनवणारा नव्हे, असा दावा करतांनाच आतंकवादविरोधी पथकाचे काय चालू आहे ?, असा संतप्त प्रश्‍नही त्यांनी विचारला.

१. अविनाश नेहमी साहाय्याला धावून येणारा, सहकार्य करणारा शेजारी आहे. कुठल्या शेजार्‍याशी त्याचे कधी भांडण होत नसे. विभागातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात तो सहभागी व्हायचा. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर धक्काच बसला. अविनाश असे करूच शकत नाही. ‘एटीएस्’ अधिकार्‍यांकडून अविनाशला या प्रकरणात नाहक गुंतवण्याचा कट रचला असल्याचा आरोप शेजार्‍यांनी केला.

२. अविनाश काही मासांपूर्वी गोवा येथे आयोजित केलेल्या हिंदू संघटनांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. केवळ या गोष्टीवरून त्याचा स्फोटके प्रकरणाशी लावलेला संबंध चुकीचा आहे; कारण त्याला त्याच्या मर्यादा आणि दायित्व ठाऊक होते. एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झाला म्हणून, तो आरोपी होतो का ?, असा प्रश्‍न एका मित्राने केला.

३. ‘एटीएस्’ने अविनाशला फक्त चौकशीसाठी नेत असल्याचे सांगितले; मात्र न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याला गुंतवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेजार्‍यांनी केला. त्याला आणखी अडकवण्यासाठी त्याच्या घरात जाणीवपूर्वक पुरावेही ठेवले जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्याचे घर बंद (लॉक) केले असून त्यावर लक्ष ठेवून आहोत, असे शेजार्‍यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात