सनातनच्या समर्थनार्थ ठाणे येथे एकवटलेल्या हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे षड्यंत्र कदापी यशस्वी होऊ देणार नाही !

ठाणे – डॉ. दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही हिंदूद्वेष्टी मंडळी आणि काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला नामशेष करू पहात आहेत. अध्यात्म आणि हिंदुत्व प्रसारात अग्रणी असल्यामुळेच हिंदूविरोधी शक्ती सनातन संस्थेचे कार्य दडपू पहात आहेत. कोणतीही गुन्हेगार पार्श्‍वभूमी नसलेल्या सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेवरील बंदी आम्ही कदापी सहन करणार नाही. सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली. २८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती या विरोधात काढण्यात आलेल्या या भव्य निषेध मोर्च्यात एकवटलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ही चेतावणी दिली. या मोर्च्यामध्ये विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ शेकडो कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते. येथील गडकरी रंगायतनपासून गोखले रोड, कँब्रिज, बाजी प्रभु देशपांडे मार्ग, राममारुति रोड, गजानन महाराज चौक ते चिंतामणी ज्वेलर्स येथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

 

सनातनद्वेष्टे राजकीय नेते आणि पुरोगामी यांनी चौकशी भरकटवली !
– सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

पुरोगाम्यांच्या हत्येनंतर पुरोगामी गोतावळ्याने हिंदुत्वनिष्ट संघटना, सनातन संस्था यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून अन्वेषणाची दिशा भरकटवली. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ध्या घंट्याच्या आतच गोडसेप्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केल्याचे विधान केले. पृथ्वीराज चव्हाण आणि पुरोगामी गोतवळा यांनी दाभोलकरांच्या हत्यांची दिशा भरकटवल्यानेच खरे मारेकरी मोकाट आहेत. सनातनने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघड केल्यानेच त्यांना तोंड दाखवायला जागा न उरल्याने ते सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत.

 

खोट्या बातम्या पसरवून सनातनची अपकीर्ती करण्यामागे
हिंदूद्वेष्ट्यांचा राजकीय स्वार्थ ! – सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था

राष्ट्र आणि धर्म यांवर गरळ ओकणार्‍या पक्ष, संघटना यांच्यावर बंदीची मागणी केली जात नाही; मात्र धर्म आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीची मागणी केली जाते, हे आश्‍चर्यजनक आहे. सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा पुरोगाम्यांच्या हत्यांशी कोणताच संबंध नाही. अन्वेषण यंत्रणांनीही सनातन संस्था वा अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे नाव घेतलेले नाही, असे असतांना काही पुरोगामी मंडळी आणि काही राजकीय पक्ष राजकीय हेतुने हिंदुत्वाची गळचेपी करण्यासाठी सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करत आहेत. खोट्या बातम्या पसरवून सनातनची अपकीर्ती  करण्यामागे हिंदूद्वेष्ट्यांचा राजकीय स्वार्थ आहे.

मोर्च्यात देण्यात आलेल्या ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘आम्ही सारे हिंदू, अंनिससम नव्हे वैज्ञानिक भोंदू’, ‘जवाब दो अंनिस’, ‘हत्येचा खटला चालवू नये, म्हणून उच्च न्यायालयात जाण्याचे कारण काय’, ‘सत्याची बाजू आम्ही नेहमीच मांडू, आम्ही सारे हिंदू’, असे फलक हिंदुत्वनिष्ठांनी हातात धरले होते. ‘सनातन निर्दोष आहे’, ‘आम्ही सारे सनातन.. सनातन…’ अशा घोषणा देऊन मोर्च्याला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी आम्ही ठामपणे सनातनच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले.

– श्री. अजय संभूस, हिंदु जनजागृती समिती, ठाणे