सनातनच्या विरोधात अत्यंत विकृत आणि सडक्या मानसिकतेतून कर्नाटक राज्यातील दैनिक वार्ताभारतीने केलेले लिखाण !

कर्नाटक राज्यातील दैनिक वार्ताभारतीच्या १२ ऑगस्ट २०१८च्या अंकात सनातन संस्थेवर अत्यंत अश्‍लाघ्य भाषेत असंबद्ध टीका करण्यात आली आहे. यामध्ये वर्तिचक्र बेळेसुळी नावाच्या कीर्तनकारांना काही पत्रकार सनातनच्या साधकाकडे बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणी अटक झाल्याचे वृत्त सांगत असतात. त्या वेळी वर्तिचक्र बेळेसुळी यांनी सनातनवर केलेला उपहास आणि वस्तूस्थिती येथे देत आहोत. कोणतेही तथ्य जाणून न घेता या वर्तमानपत्राने अत्यंत विखारी भाषेत केलेल्या टीकेविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

वर्तिचक्र बेळेसुळी पत्रकारांना म्हणतात, बॉम्ब का म्हणता ? तो मेक इन इंडिया योजनेत बनवलेला बॉम्ब आहे. विदेशी आतंकवादी तिथेच बनवलेले बॉम्ब उडवून देशाचा नाश करत असत. आज मोदींच्या राज्यात आतंकवादी देखील स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बॉम्ब बनवायला शिकले आहेत. सनातन संस्थेने मेक इन इंडिया योजनेअंतर्गत संपूर्ण देशात गृहोद्योग चालू केला आहे. तिथे युवकांना स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. बेकारी-बेकारी म्हणून बोंब ठोकणार्‍यांनी सनातन संस्था चालवत असलेल्या या उद्योगाला दाद द्यायची सोडून त्यांच्या डोक्यावर आतंकवादी म्हणून पट्टी बांधण्यात येत असलेले पाहून आतडे पिळवटते.

त्यावर पत्रकार म्हणतात, सर, मग तुम्ही आतंकवादाला उघड पाठिंबा का देत आहात ? मग आतंकवाद्याला अटक झाल्याची बातमी येताच रस्त्यावर का उतरता ?

त्यावर बेळेसुळी उत्तरतात, हे बघा, मी पूर्ण स्वदेशीवादी आहे. खादी धारण करूनच फिरतो. विदेशी चिंतनाचा विरोध करतो. या पार्श्‍वभूमीवर मी विरोध केला; परंतु सनातन संस्था पूर्णतः स्वदेशी आहे. आपण विदेशी आतंकवाद खोडून तिथे स्वदेशी आतंकवाद रुजवायचा आहे. पुराणापासून ते प्राचीन परंपरेत पुष्कळ उग्रवादी चिंतन आहे. त्याचा उपयोग करून स्वदेशी आतंकवाद सनातन संस्थेने साकारला आहे. विश्‍वाला भारताची ही अत्युत्तम देणगी आहे. तसेच विदेशी आतंकवादाला भारतीयतेच्या माध्यमातून सनातन संस्थेने दिलेले हे आव्हान आहे.

– चेळय्या, [email protected]

वास्तविक आतापर्यंत कोणत्याही प्रकरणात सनातन संस्थेचे नाव एकाही अन्वेषण यंत्रणेने घेतले नाही. सनातन संस्थेवर एकही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अध्यात्मप्रसाराद्वारे लोकांना साधना शिकवणार्‍या सनातनचे निर्दोषत्व सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे ! येथे मेक इन इंडिया, स्वदेशी आतंकवाद आदी शब्द वापरून हिंदु आतंकवादालाही हवा देण्याचा लेखकाचा छुपा प्रयत्न आहे ! अशा पूर्वग्रहदूषित कपोलकल्पित कहाण्या रचून हिंदूंची दिशाभूल करणार्‍या अशा पत्रकारांचा निषेध करावा तेवढा थोडा !  

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात